नात्यातील संवाद

Story: मर्मबंधातली ठेव | कविता प्रणीत आमोणकर |
27th January 2023, 10:42 pm
नात्यातील संवाद

दाेन व्यक्ती जेव्हा एकमेकांशी बोलतात, आपल्या मनातले विचार आदानप्रदान करतात, आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांना सांगतात तेव्हा संवाद सुरू होतो. हा संवाद आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी, आपल्या कामाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असणार्‍या व्यक्तींशी तसेच आपल्या मित्र मैत्रिणींशी मुख्यत्वे होत असतो.

जेव्हा हा संवाद होत असतो, तेव्हा मनातील भावना एकमेकांशी व्यक्त होत असतात. त्यामुळे मनात साचलेले विचार मोकळे होतात. कधी कधी रोजच्या जीवनातील असह्य ताणामुळे मनात अनेक विचारांची गर्दी झालेली असते. हे विचार व्यक्त न झाल्याने मनात साचून राहिलेले असतात. त्यामुळे साहजिकच त्यांचा ताण आपल्या नाजूक मनावर पडत असतो. आपल्या आवडत्या किंवा जवळच्या व्यक्तींबरोबर आपण जेव्हा एकत्रित येतो, तेव्हा साहजिकच आपल्या मनातले विचार त्यांच्यापाशी व्यक्त करतो. मनातली ही साचलेली विचारांची गर्दी आपण जेव्हा मोकळी करतो, तेव्हा मन हलके होते. प्रवाही बनते. आणि मन परत एकदा नवीन विचार करण्यास प्रवृत्त होते. हा झाला संवादाचा सकारात्मक परिणाम.

हा संवाद आहे, तिथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा या संवादातला “ स “ जेव्हा हरवतो, तेव्हा उरतो तो फक्त वाद. आज रोजच्या जीवनात वावरताना आपण जर नीट डोळे उघडून पाहिले तर संवाद कमी आणि वाद जास्त अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते. एकमेकांना समजून घेऊन त्यांच्याशी जुळवून घेणे तर काही काही वेळेस महाकठीण होऊन बसलेले दिसते. संवाद मधील जेव्हा “ स “ हरवतो, तेव्हा वादाची ठिणगी पडते. आणि ही ठिणगी केव्हा उग्र स्वरूप धारण करेल, याचा काही नेम नसतो.

नको त्या निरर्थक  गोष्टींवर विनाकारण वाद घातला, की वाद हा होणारच. कधी कधी असेही होते, की दोन व्यक्तींमधील संवाद सुरळीत चालू असेल, तर काही व्यक्तींच्या डोळ्यांत ते खुपते. आणि त्या दोन व्यक्तींमधील संवाद संपुष्टात  आणून त्यांच्यात वादाची ठिणगी कशी लावून द्यायची, या विषयात काहींनी जणू पीएचडी प्राप्त केलेली असते. या दोन व्यक्ती कुटुंबातील व्यक्ती असू शकतात किंवा मित्र मैत्रीणी ही असू शकतात. काही बरे चाललेले असताना त्यांचे बरेपण हे काही नतद्रष्ट लोकांना सहन होत नाही. आणि मग या दोन नात्यातल्या चालत आलेल्या संवादातील “ स “ पद्धतशीरपणे काढून त्यांच्यातल्या नात्यातली दरी वाढवण्याचे काम पद्धतशीरपणे चालू होते.

अशी ज्यांची वृत्ती असते, ही वृत्ती समाजासाठी फार घातक असते. अशी वृत्ती असणार्‍या व्यक्ती या समाजात एकलकोंडी असतात. त्यांचा मित्रपरिवार मोठा नसतो. स्वत: भोवती चौकट आखून ते जगत असतात. कुटुंबातील इतर व्यक्तींशी त्यांना काही देणे घेणे लागत नाही. समाजाशी संवाद साधणे तर त्यांना जमात नाही. त्यांना फक्त  स्वत:च्या सुखाची पर्वा असते. इतरांना तुच्छ लेखण्यात त्यांना परमानंद वाटतो.

आपण ज्या समाजात निर्भीडपणे राहतो, सुरक्षितपणे फिरतो, आपले विचार व्यक्त करतो, त्या  समाजाचे आपल्यालाही काही देणे लागते.  समाजाशी जुळवून घेताना त्या आधी आपल्या कुटुंबाशी जुळवून घेणे गरजेचे असते. ही जुळवून घेण्याची क्षमता अंगी बाणवली की मग आपण कुठेही सामावून जातो. एकमेकांशी जुळवून घेण्याची सवय नसते, त्यांना फक्त आपले काम साधण्यापालीकडे काही विचार नसतो.

संवाद आणि वाद होत असताना त्यातील सत्य आणि असत्य, समज आणि गैरसमज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे लक्षात घ्यावयास हवे. जेव्हा संवाद चालू असतो, तेव्हा एका हृदयाचा दुसर्‍या हृदयाशी संवाद होत असतो , परंतु जेव्हा त्यातील “ स “ हा लुप्त होतो, तेव्हा होणारा वाद हा नकारात्मक गोष्टींनी भारलेला असतो. दोन व्यक्तींमधील वर्षानुवर्षे चालत असलेल्या संवादातील  “ स “ काढण्याचे कटकारस्थानाचे  काम काही हितशत्रू किंवा आपलीच माणसे अगदी पद्धतशीरपणे आखणी करून करत असतात. दोन नात्यांमध्ये वितुष्ट आणण्याचे काम करण्याचा जणू अशांनी चंग बांधलेला असतो.

दोन नात्यातली वीण ही संवादाच्या धाग्यात गुंफलेली असते. जशी वर्षे उलटतात, तशी ही त्यांच्या नात्यातली वीण ही अधिकाधिक घट्ट होत असते. त्यांच्यातील प्रेम हे वृद्धींगत होत असते. जेव्हा नात्यातली ही वीण घट्ट होत असते, तेव्हा ही वीण उसवण्याचे काम आपल्या जवळचीच माणसे करत असतात, तेव्हा आपल्याला त्याची कल्पना ही येत नसते. चेहर्‍यावर शांततेचा बुरखा पांघरून या अशा व्यक्ती आपले काम अगदी बिनबोभाटपणे निभावत असतात.

दोन नात्यांमध्ये एकदा का द्वेषाची ठिणगी लावून दिली, की मग अशांना समाधान लाभते. नात्यातली घट्ट वीण जेव्हा अशा घातक व्यक्तींमुळे उसवली जाते, तेव्हा उरते ती भयाण शांतता....... कारण जेव्हा संवादातले शब्दच जिथे मुके होतात, तिथे भावना, प्रेम, ममता या मौल्यवान गोष्टी खोट्या वाटू लागतात आणि भावनेचा, प्रेमाचा ओलावा नाहीसा होतो. खोट्यानाट्या गोष्टींनी कान भरल्यामुळे एकमेकांवरचा विश्वास उडतो.  मग सुखाचे चित्र विस्कटायला वेळ लागत नाही आणि होत्याचे नव्हते होऊन जाते. त्यासाठी आपल्या जवळपास असणार्‍या व्यक्तींना ओळखायला शिकणे ही कला आत्मसात करताना गोड बोलण्याच्या मागे किती कटुता भारलेली आहे, हे समजून चुकले की मग दोन नात्यामधला संवादातील “ स “ आपण कसा जपून ठेवावा , याची प्रचिती नक्कीच येईल.