बळी..!!

Story: तिची कथा | उमा प्रभू |
27th January 2023, 10:29 pm
बळी..!!

आज ती काहीशी बिथरली होती, कामात तिचं लक्ष नव्हतं. सकाळी पोळ्या करताना भाजलं होतं,भाजी चिरताना बोटं चिरलं होतं आणि आता टाईप करतानाही कितीतरी चुका करत होती. सरांनी डिक्टेशन थांबवलं. "निला चल चहाला जाऊन येऊ." सर म्हणाले. "नको सर हे एवढं पूर्ण करूया. नंतर तुम्ही जा, मला नको." "नको काय. चल मघापासून त्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसलयसं, जरा ब्रेक घे." सरांनी आग्रह केला म्हणून ती त्यांच्या सोबत गेली. सरांनी स्वतःसाठी कडक चहा आणि तिच्यासाठी तिच्या आवडीची स्ट्राँग कॅपचिनो मागवली. काॅफीचे दोन घोट पोटात गेल्यावर तिला जरा बरं वाटलं पण तो विचार मनातून जात नव्हता, काल रविवार असल्याने ती मिनुला घेऊन आईकडे गेली होती तेव्हा वाटेत तो भेटला पण असा भेटेल याची कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती तिने. मळकट कपडे, रापलेला चेहरा, कृश शरीर, राकट केस, खोल गेलेले भावशुन्य डोळे आणि साथीला दारू. ती सामोरी आली तरी तिला ओळख पटेना पण त्याच्या डोळ्यात मात्र क्षणभर ओळखीच्या खुणा तरळल्या आणि तत्क्षणी विरल्या. तिने निरखून त्याला पाहिलं आणि तिचं लक्ष त्याच्या छातीवर गेलं त्यावर धुसर गोंदण दिसत होतं, "निला" ती तीनताड उडाली. त्याच तंद्रीत ती घरी आली, मिनुला आईकडे दिलं आणि बरं वाटत नाही जरा आत जाऊन पडते म्हणत आपल्या खोलीत आली, दार लावलं आणि तिला रडू कोसळलं. 

        तो नितीन होता… तिचा "नितू". काॅलेजचे गुलाबी दिवस आणि त्याचवेळी जुळलेलं त्यांचं प्रेम, सोबतीने कैक ठिकाणी भटकंती, एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं पण आपापल्या मर्यादा सांभाळून. एकत्र भविष्याची स्वप्न रंगवणं असं एकंदरीत गोडी गुलाबीने सारं चाललं होतं आणि शेवटच्या वर्षाला असताना बाबांना कुणकुण लागली आणि त्यांनी जमदग्नींचा अवतार धारण केला. आईने समजावण्याचा प्रयत्न केला पण ते कुणालाही वदले नाहीत, त्यांच्या कडाडून विरोधाला कारणीभूत होती नितीनची खालची 'जात'. निला कशीबशी शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊ शकली आणि तिला काही करण्याआधीच बाबांनी तिच्या लग्नाचा घाट घातला आणि या निर्दयी खेळात तिच्या प्रेमाचा बळी गेला. ती कु.निलम भावे ची सौ.निलम बर्वे झाली, अगदी नितीनची शेवटची भेट सुध्दा तिच्या नशिबी नव्हती. तिचा नवरा खूप प्रेमळ आणि समंजस होता. चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होता. त्याने तिच्या भुतकाळाविषयी काहीही विचारलं नाही, उलट तिला तिचा वेळ घेऊ दिला आणि मगच त्यांच्या संसाराला सुरुवात झाली, त्याने तिला पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त केलं, ती ही नेटाने शिकली. एक चांगली जर्नालिस्ट म्हणून नावारूपाला आली. काही वर्षांनी मिनुच्या रूपाने तिच्या कुशीत मातृत्व खेळलं. ती एक कर्तव्यदक्ष लेक, पत्नी, आई म्हणून सिद्ध झाली होती. सारं चांगलं चाललं होतं पण कधीमधी निलाला नितीनची आठवण तीव्रतेने अस्वस्थ करायची पण तेव्हा टिपं गाळण्यावाचून तिच्याकडे पर्याय नव्हता.

       या साऱ्यामध्ये दहा वर्षाचा काळ लोटला होता आणि तिचं लग्न झाल्या दिवसापासून नितीनचा काहीच पत्ता नव्हता. सुरुवातीला तिनं आडून आडून त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला होता पण तिच्या हाती काही आलं नव्हतं आणि आज अचानक अशा अवतारात तिला सामोरा आला होता. आता काय करावं हेच तिला समजत नव्हतं, तिच्यातली हरलेली प्रेयसी तिला स्वस्थ बसू देत नव्हती. इतकी वर्ष तिने साऱ्यांची सारी कर्तव्ये पार पाडली होती आता तिच्या जिवलगाच्या बाबतीतलं कर्तव्य पार पाडण्याची वेळ आली होती असं तिला राहून राहून वाटत होतं पण एकीकडे नैतिकतेच्या चौकटीत अडकलेलं तिचं मन तिला अडवत होतं यामध्ये तिची अगदी द्विधा मनस्थिती झाली होती. "काय गं, कुठे हरवली?? काॅफी गार झाली की." सरांच्या आवाजाने तिची तंद्री भंगली, तिने तसाच काॅफीचा मग तोंडाला लावला. "निला, काय झालयं, सांगशील का?? तू कधीपासून अस्वस्थ आहेस. मी काही मदत करू शकतो का??" सर आपुलकीने विचारत होते. ते वयाने मोठे होते, अनुभवी होते. कदाचित ते तिला या द्विधा मनस्थितीतून बाहेर काढू शकले असते. तिने आपल्या मनातल्या साऱ्या व्यथा मांडल्या. सारं ऐकल्यावर सर शांतपणे म्हणाले, "हे बघ निला. आपण सगळी शेवटी माणसं आहोत, आपल्याला मनं आहेत, भावना आहेत. जगाच्या नैतिकतेच्या व्याख्या दर क्षणाला बदलत असतात. तू तुझ्या मनाचा कौल स्वीकार!!" सरांच्या शब्दांनी तिला धीर आला आणि तिचं ठरलं.

      सरांनी त्याची माहिती काढली आणि त्याची भेट घेतली आणि एक दिवस भर दुपारी. सर नितीनला घेऊन आले. निलम त्यांना भेटली. सरांनी एक चावी, पत्ता आणि नितीनला तिच्या हवाली केलं नि ते आपल्या मार्गाने मार्गस्थ झाले. ती त्याला घेऊन त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आली. दाराला कडी पडली आणि कितीतरी काळापासून अडवून ठेवलेल्या भावनांचा बांध फुटला होता. दोघांची वस्त्रे गळून पडली आणि ती आवेगाने त्याच्या कुशीत शिरली. त्यानेही तिला अतीव प्रेमाने कुरवाळलं आणि कितीतरी वेळ सर्वांगावरून हात फिरवत पडून राहिला. तो ज्या अवतारात होता ते पाहून कुणालाही भीती वाटली असती पण ती आनंदाने त्याच्या बाहुपाशात विसावली होती. तो पुढाकार घेत नाही ते पाहून तिनेच विचारलं, "काही करायचं नाही?? तो हक्क आहे तुझा, तुझं दान तुझ्या ओंजळीत द्यायला आलेय मी." "पिल्लू माझं प्रेम वासनेच्या पलिकडे आहे. ज्या दिवशी तुझ्या भाळी दुसऱ्याने त्याच्या नावाचं कुंकू रेखलं त्याच दिवशी माझा हक्क संपला आणि मी माझ्या वासना मारून टाकल्या. काहीही झालं तरी पर्यायाने तुझ्यावर दुसऱ्याने हक्क प्रस्थापित केला, मला तुला कलंकीत करायचं नाही. तुला मला माझं म्हणून काही द्यायचं असेलच तर अशीच कधीतरी माझ्या कुशीत ये, तुझा सहवास लाभू दे. या जन्मी माझी मर्यादा इथेच संपते." त्याचे शब्द ऐकताना तिच्या डोळ्यांना धार लागली होती आणि त्याच्या छातीवरच्या त्या धुसर गोंदणाला गुंजारव ती त्याच्या आत्याम्याशी अधिकाधिक अद्वैत होत होती!!