वत्सला किर्तनी

गोव्याच्या इतिहासातील अनेक सोनेरी पाने ज्यांच्या कर्तृत्वाने झळाळून निघाली आहेत. येणाऱ्या प्रत्येक पिढीला जगण्याची प्रेरणा देणाऱ्या गोमंतकीय रणरागिणींच्या आठवणींना उजाळा देण्याच्या हेतूने ‘यशोगाथा रणरागिणींची’ हे सदर आजपासून सुरु होत आहे.

Story: यशोगाथा रणरागिणींची | युवराज्ञी नाईक |
27th January 2023, 10:27 pm
वत्सला किर्तनी

गाेवा मुक्त हाेऊन ६१ वर्षे पूर्ण झाली. आकाशात फडकणारा ताे झेंडा पाहिला की भलतीच ऊर्जा आणि समाधान मिळते. हा झेंडा फडकवण्यासाठी शूरवीरांनी आणि रणरागिणींनी अमाप त्रास साेसले. गाेव्याचा इतिहास वाचला की अंगावर शहारे येतात. पाेर्तुगीज राजवटीखाली एक दिवससुद्धा काढणं कठीण, ४५१ वर्षे तर दूरच. काेणास ठाऊक कसे आपल्या बंधू-भगिणींनी सगळे सहन केले. कित्येक पिढ्यांना आपलं बहुमूल्य जीवन एक अत्यंत जुलमी राजवटीत व्यतीत करावं लागलं. 

काही सळसळत्या रक्ताचे शूरवीरही हाेते, ज्यांना ताे अन्याय पहावला गेला नाही. आपल्या मायभूमीसाठी त्यांनी आवाज उठवला आणि हाेईल त्याप्रकारे याेगदान दिले. अर्थातच स्वातंत्र सैनिक म्हटले की आपल्यासमाेर येतात ते म्हणजे माेहन रानडे, टि. बी. कुन्हा, जुलियाव मिनेझिस, विश्वनाथ लवंदे, हिरवे गुरुजी, बाळा राया मापारी इत्यादी. पण या सर्वांबराेबर अनेक स्त्रियांनीही आपले पुरेपूर याेगदान दिले. जे अनेकवेळा सहजपणे आपल्या नजरेआड जातं. बराेबर आहे म्हणा, त्याकाळात समाजात बाईच्या शिक्षणाला फारसं महत्त्व नव्हतच मुळी. त्यात आपण पारतंत्र्यात. पण अशा परिस्थितीतही मात करुन शिक्षण घेऊन काही रणरागिणी गाेवा मुक्तीसाठी लढल्या. दु:ख फक्त एवढंच की कित्येक शूर स्त्रियांची नाेंद मात्र माेजक्याच महिलांपर्यंत सीमित राहिली. 

गाेवा मुक्ती लढ्यात अनेक स्त्रिया सहभागी झाल्या. काही प्रत्यक्ष मैदानावर उतरल्या तर काही पडद्यामागून, पण प्रत्येकीचं याेगदान मात्र बहुमाेलाचं हाेतं. काही स्वतत्रंपणे तर काही आपल्या वडिलांना किंवा पतीला हाेईल त्या प्रकारे स्वातंत्र्याच्या चळवळीत मदत करुन आपल्या मातृभूमीविषयी असलेल्या तळमळीला व्यक्त करायच्या. 

कित्येक वर्षे पाेर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेल्या गाेव्यात काेणीतरी स्वातंत्र्याच्या चळवळीची चिंगारी पेटवण्याची नितांत गरज हाेती. ताेच, १८ जून १९४६ राेजी डाॅ. राम मनाेहर लाेहिया यांनी मडगावच्या आझाद मैदानावर सरकारची परवानगी नसतानाही धाडसाने सभा भरवली आणि भाषण दिले. धाे-धाे पडणाऱ्या पावसात अचाट गर्दी जमवून भाषण देण्याचे साहस केल्याबद्दल लाेहियांना अटक करण्यात आली. 

त्याचवेळी असंख्य लाेकांच्या गर्दीतून एक ओल्याचिंब भिजलेल्या २२ वर्षीय मुलीने पुढे येऊन ‘जय हिंद’ अशी घाेषणा दिली. ती मुलगी दुसरी तिसरी काेणी नसून १८ जूनची नायिका मानल्या जाणाऱ्या ‘वत्सल्य किर्तनी’ हाेत्या. ०८ मे १९२४ मध्ये मडगाव शहरात या धाडसी मुलीचा जन्म झाला. १०वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करुन त्यांनी हिंदी विषयात पदवी ग्रहण केली हाेती. किर्तनींचा क्रांतीकारी स्वभाव पाहून पाेर्तुगीज अधिकारी कॅप्टन फिगवेरीदाेला प्रचंड राग आला. पण किर्तनी घाबरल्या नाहीत उलट त्यांनी त्यावर खंबीरपणे म्हटले, ‘जर सालाझार तुम्हाला अभिमानास्पद भावना देतं, तर ‘जय हिंद’ मला माझ्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचे बळ देतं.’ त्यांना या सरकार विराेधी चळवळीत भाग घेतल्याबद्दल ताबडताेब अटक करण्यात आली. ही खबर कळताच साै. प्रमिला जांबावलीकर ज्या ‘गाेवा सेवा संघात’ कार्यरत हाेत्या, त्यांनी मडगाव पोलीस स्टेशनवर महिलांचा माेर्चा नेत वत्सला किर्तनीला साेडण्याचा हट्ट धरला. या माेर्चात विमल वागळे, कृष्णा आणि विठा हेगडे, रतन देसाई, ललिता कंटक, मुक्ता आणि जीवन कारापूरकर इत्यादि सहभागी झाल्या हाेत्या. त्यांनी साै. प्रमिला ताईंना खंबीर पाठिंबा दिला. 

प्रचंड संख्येने जमा झालेल्या रणरागिणींना पाहून पाेर्तुगीज अधिकारी दचकले व दबावाखाली त्यांनी किर्तनी यांना जाण्यास सांगितले. किर्तनी बाहेर पडण्यास तयार नव्हत्या. शेवटी पाेर्तुगीज अधिकाऱ्यांना त्यांना तिथून हाकलावे लागले. अशा हाेत्या ‘वत्सला किर्तनी’ आमच्याच राज्यात येऊन आम्हालाच गुलाम केलेल्या पाेर्तुगीजांना त्यांनी त्यादिवशी नामाेहरम केले म्हणूनच त्यांना १८ जूनची नायिका असेही संबाेधले जाते. 

आपल्या पुढील आयुष्यात त्यांनी हिंदी विषयाच्या शिक्षिका म्हणून समाजास आपले बहुमूल्य याेगदान दिले. आजन्म अविवाहित राहून त्यांनी आपल्या कुटुंबाबराेबरच देशाचीही सेवा केली. जेव्हा मी मडगावच्या आझाद मैदानावर भेट दिली त्यावेळेस माझ्या डाेळ्यासमाेर १८ जून क्रांती दिनाचे चित्र उभे राहिले. त्या कार्यकर्तृत्वाला आठवून अंगावर शहारे येतात. या शूर स्त्रीच्या पराक्रमी याेगदानासाठी आपण नेहमीच त्यांच्या ऋणात राहू.