जप्त केलेले धान्य विक्री करण्यास मनाई

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश न्यायालयाने केला रद्द

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th January 2023, 11:48 Hrs
जप्त केलेले धान्य विक्री करण्यास मनाई

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने फोंडा परिसरात तीन ठिकाणी छापा टाकून तांदळाची आणि गव्हाची मिळून १,०१४ पोती जप्त केली होती. तेव्हा जप्त केलेले धान्य विक्रीस काढण्याचा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला होता. हा आदेश दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने रद्द केला आहे.
गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने १४ आणि १५ नोव्हेंबर २०२२ रोजी तीन ठिकाणी छापे टाकून नागरी पुरवठा खात्यातील तांदूळ आणि गव्हाचा काळाबाजार उजेडात आणला होता. त्या कारवाईत कुर्टी-फोंडा, कुंडई येथील औद्योगिक वसाहतीत आणि बोरी येथे स्वस्त धान्य दुकानावर छापा टाकून ७.५२ लाख रुपये किमतीची ७६१ तांदळाची आणि २५३ गव्हाची मिळून १,०१४ पोती जप्त केली होती. या छाप्यामध्ये दोन ट्रक, दोन जीप व एक पिकअपही जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात गुन्हा शाखेने प्रकाश कोरीशेट्टर या व्यावसायिकासह हजरत अली सय्यद, विनय कुमार गुडीमनी, तौसिफ मुल्ला आणि राम कुमार हजम या पाच जणांना अटक केली होती. पाचही संशयितांना फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने नंतर सशर्त जामीन मंजूर केला होता.
दरम्यान, नागरी पुरवठा खात्याच्या कोणत्याच गोदामातून तांदूळ, गहू किंवा इतर धान्य साठा चोरीस गेलेला नाही किंवा गहाळ झालेला नाही. तसेच धान्य साठा कमी झालेला नाही, असा अहवाल खात्याच्या संयुक्त सचिवांनी सरकारला दिला होता. या अहवालाच्या आधारे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन नाईक बोरकर व वीरेंद्र म्हार्दोळकर यांची तिन्ही गुन्ह्यांतून पणजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिनावर सुटका केली आहे.
याच दरम्यान गुन्हा शाखेने जप्त केलेले धान्य विक्रीस काढण्याचा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी १५ डिसेंबर २०२२ रोजी जारी केला होता. या आदेशाला मुख्य सूत्रधार सचिन नाईक बोरकर याने न्यायालयात आव्हान दिले असता, दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. इर्शाद आगा यांनी त्या विक्रीस मनाई केली असून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द केला आहे. तसेच जप्त केलेले धान्य सोडण्यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची मुभा दिली आहे.