टाकीचे घाव

टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही असे म्हटले जाते. टाकीचे घाव हे दगडावर सतत बसत असतात. हे घाव झेलण्याची क्षमता त्या दगडामध्ये असली, तर त्या दगडाला आपण आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो. त्या दगडातून सुंदर शिल्प तयार होते. परंतु त्या दगडामध्ये जर हे घाव झेलण्याची क्षमता नसेल, तर एक घाव बसताच त्या दगडाचे क्षणार्धात शंभर तुकडे होतात.

Story: मर्मबंधातली ठेव । कविता प्रणीत आमोणक |
20th January 2023, 09:51 Hrs
टाकीचे घाव

सुवर्ण म्हणजेच सोने या धातूलाही आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागते. उरावर अनेक घाव सोसावे लागतात. खाणीतून मिळालेल्या कच्च्या सोन्याला आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तप्त अग्निचे चटके ही सहन करावे लागतात. असंख्य घाव उरावर झेलून धगधगत्या अग्नीचे चटके सहन केल्यावरच अस्सल सोन्याला सुवर्णमय झळाळी प्राप्त होते. आणि त्याचे खरे मोल काय आहे ते समजते.  दगड काय किंवा सुवर्ण काय जेव्हा असंख्य घाव, प्रहार त्यांच्यावर होतात, तेव्हाच त्यातील  श्रेष्ठ  गुण सर्वांसमोर येतात. आणि त्याची महती समजून येते. मनुष्याचे ही असेच काहीसे आहे. जेव्हा मनुष्यावर नियतीचे, परिस्थितीचे असंख्य घाव होतात तेव्हा तो तावून सुलावून निघतो. त्याच्यातले सुप्त गुण जागृत होतात. आणि आलेल्या प्रसंगावर मात करण्यासाठी तो जिकिरीने आलेल्या कठीण प्रसंगाचा सामना करण्यास सज्ज होतो.

जेव्हा मनुष्य आलेल्या कठीण प्रसंगाशी सामना करण्यास सज्ज होतो, तेव्हा त्याची मनस्थिती ही खंबीर बनलेली असते. त्यामुळे आलेले कोणतेही संकट तो हसत झेलू शकतो. त्याच्यावर मात करू शकतो. आयुष्य जगत असताना कुठेतरी आपला विश्वासघात केला जातो. आपले नातलग, आपल्या कुटुंबातले विक्षिप्तपणे वागू लागतात.  जेव्हा आपल्याला मदतीची गरज असते, तेव्हा ढकलून दिले जाते, जेव्हा नातेसंबंधात फसवले जाते, कधीतरी कुठेतरी आपल्या स्वाभिमानाला तडा जातो, कोणाकडून फसवणूक होते किंवा  जाणूनबुजून केलेल्या अपमानाला सामोरे जावे लागते. अशा संकटांवेळी  मन उद्विग्न होते. हताश होते. जेव्हा कोणतेही संकट येते, तेव्हा ते एकटे येत नाही. जणू काही संकटांची मालिका आपल्यावर कोसळली आहे, असे वाटते. जीवनात येणारी ही संकटे अगदी बेसावधपणे आपल्या जीवनात येतात.  अगदी अचानक अशी संकटे उद्भवल्याने या संकटाशी सामना करण्यासाठी आपण पूर्णपणे तयार नसतो. त्यामुळे आपली पूर्णपणे भंबेरी उडते. मग आपली झोप उडते. कुठेही लक्ष लागत नाही. मनातल्या वेदना कोणाला सांगता येत नाहीत, त्यामुळे त्या वेदना सहन करताना मनाची प्रचंड घालमेल होते. एकांतात असताना कधी कधी रडू फुटते. धाय मोकलून रडल्याने डोळे सुजून लालेलाल होतात. डोके प्रचंड प्रमाणात दुखायला लागते. मन सैरभैर होते. मनाची निर्णयक्षमता कमी होते. योग्य निर्णय कोणता आणि अयोग्य निर्णय कोणता याचे भान रहात नाही.

हीच वेळ असते नवीन काही घडण्याची !..... जीवन आपली परीक्षा घेत असते. अशा संकटांचे घाव जेव्हा मनावर पडतात, तेव्हा मन अधिकच कणखर होते. बेसावधपणे आलेल्या संकटाशी सामना करताना आधी मन हताश होते खरे, पण काही वेळाने मन सावरते, तेव्हा एकंदरीत परिस्थितीचा विचार केल्यावर आलेल्या संकटाशी सामना करण्यासाठी मन सज्ज झालेले असते. आलेल्या संकटाशी झुंजताना आपले मन एकापरीने अग्निपरिक्षाच देत असते. अशा वेळेस मनावर असंख्य टाकीचे घाव बसले जातात. त्यामुळे आपले मन ही त्यात तावून सुलावून निघते. ही अग्निपरीक्षा दिल्यावर मनावर आलेली मरगळ, निराशा झाडून मन परत एकदा नव्या उभारीने सज्ज होते. आणि मग अशा वेळी स्वत:वरचा विश्वास अधिकच दुणावत जातो आणि काहीतरी अचाट, अफाट करण्याची उर्मी मनात प्रसवली जाते.  मग उरत नाही कोणाचीही आणि कशाचीही भीती... कसलेही भय मनात उरत नाही की येणार्‍या कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. कोणीही कितीही अपमान केला तरी त्याचे वैषम्य वाटत नाही. कारण असल्या जाणूनबुजून केलेल्या घटना आहेत याची खात्री पटलेली असते. आपल्या प्रगतीमध्ये येणारे हे सर्व अडथळे बाजूला सारून पुढे चालत राहण्याची जिद्द आपल्यामध्ये निर्माण झालेली असते. जीवनात आलेल्या संकटांचे हे टाकीचे घाव सोसल्याने, संकटांशी दोन हात करताना दिलेल्या अग्निपरीक्षेमुळे आपल्या जीवनाला सुवर्णासारखी झळाळी प्राप्त होते. हीच वेळ असते ती काहीतरी भव्य दिव्य करण्याची !!....