सेव्ह म्हादई सेव्ह गोवा

कर्नाटक राज्यातील भीमगड येथे उगम पावून खळाळत वाहत कर्नाटकची सीमा पार करून गोव्यात येणारी आमची म्हादई माय. आमची जीवनदायिनी. वाटेत तिला अनेक छोट्या मोठ्या नद्या मिळतात आणि गोव्यात पोहचेपर्यंत तिचे पात्र विशाल बनत जाते गोवेकरांचे जीवनच म्हादईवर अवलंबून आहे.

Story: मनातलं । शुभदा मराठे |
20th January 2023, 09:45 pm
सेव्ह  म्हादई सेव्ह गोवा

म्हादईैच्या काठावर सत्तरीतील अनेक गावे वसली आहेत. समृद्ध झाली आहेत. तिच्या अंगाखांद्यावर खेळत आमचे बालपणही समृद्ध झाले आहे. तिच्या काठावर बहरलेली शेती, वेळूची बने, विविध फळभाराने लवलेले वृक्षवेली, हिरवेगार डोंगर पाहून मन शांत तृप्त तर होतेच शिवाय सुखानंदाने मोहरून जाते. कडतरी गावात मिशाळाची  कोंड, झरीची कोंड( इथे तिच्या काठावर वाळूतून येणारा थंडगार पाण्याचा झरा आहे म्हणून झरीची कोंड) त्यामध्येच खळाळत वाहणारी नदी, संपूर्ण पाषाणी कातळाचा तळ गोल गोल पाषाण दगड, शेरणीच्या झाडांनी झालेले दोन प्रवाह पुन्हा खाली एकत्र येऊन मिळतात हे सगळे चित्र खूपच विलोभनीय आणि पहात रहावे असे आहे काठावरची हिरवीगार शेते एका बाजूला आणि वेळूची बने दुसऱ्या बाजूला मधोमध शांत वाहणारी म्हादई नदी. आमचे सर्वस्व.

कर्नाटक सरकारने म्हादईला मिळणाऱ्या दोन उपनद्या कळसा व भंडुरा, यांचे पाणी वळवून ते आपल्या राज्याचा फक्त विकास करू पाहतात अर्थात एकाचा फायदा होत  असताना तितक्याच किंबहुना त्याच्या दस पटीने दुसऱ्याचे नुकसान होत आहे याचा विचार कोणी करायचा? यात या सरकारचा कोणता स्वार्थ दडलेला आहे किंवा केवळ विरोधासाठी विरोध चालला आहे हे समजणे कठीण आहे.

खरे पाहता नदीचा प्रवाह ही निसर्गाची देणगी आहे निसर्ग मानवाला आणि सर्व प्राणीमात्राला वृक्षवल्लींना जे हवे ते जिथे पाहिजे तिथे निर्माण करून देत असतो हे करत असताना तो कोणताही भेदभाव करत नाही. चराचरातील प्राणी पक्षी झाडे मानवेतर आहेत ते सगळे निसर्गनियमानुसारच आपले आचरण आणि जीवन सुखाने जगतात. माणूस मात्र स्वार्थ द्वेष अहंकार गर्व चढाओढी यातच गुरफटलेला आहे. स्वतःच्या स्वार्थापलीकडे त्याला दुसऱ्या चांगल्या गोष्टी दिसतच नाहीत.

नेमके कर्नाटक सरकारने ही हेच केले. स्वतः पुरताच विचार केला आणि नद्यांचे पाणी वळवण्यास सुरुवात केली. या नद्या जिथवर वाहत जातात तेथील लोकांचे जीवनही या नदीच्या  पाण्यावर  अवलंबून आहे हा साधा विचारही केला नाही निदान या लोकांचे मत विचारात घ्यावे असेही त्याला वाटले नाही. तिही माणसेच आहेत, त्यांच्याही काही गरजा आहेत, फक्त सीमेपलीकडे आणि अलीकडे एवढाच काय तो भेद तरीसुद्धा एवढा अहंगड, ताणतणाव कशासाठी? याबाबत दोन्ही राज्यांनी, पाणी वळवल्यामुळे त्याचा या पाण्यावर अवलंबून असणार्‍या जनजीवनावर काय परिणाम होईल याचा विचार करून  संयुक्तपणे यावर तोडगा काढला असता तर चित्र फार  वेगळे निष्पन्न झाले असते.

पण नाही, वातावरण तापवायचे आणि राज्याराज्यात द्वेष पेरून देशात अराजक  माजवायचे हे कोणाच्या सुपीक डोक्यातले विष आहे हे कळायला मार्ग नाही.

आता तो विचार करायची ही वेळही नाही. कर्नाटक सरकारने पाणी वळवण्याचा चंग बांधला आहे त्या पार्श्वभूमीवर आपले सरकार दिल्ली दरबारात आवाज उठवेल का याचा विचार करत बसण्यापेक्षा जनआंदोलन उभे करणे ही आजच्या घडीला योग्य अशी कारवाई ठरेल आणि नेमकी गोव्याची जनता हेच करत आहे. केवळ म्हादई पीडितच नाही तर संपूर्ण गोवाभर जागृती सभेतून भाषणे विचार आणि सत्य सबंध गोमंतकीयापर्यंत पोहोचविण्याच्या स्तुत्य कार्याला सुरुवात  झाली आहे.

गोवेकरांनी एकदा मनात आणले तर ते मागे हटणार नाहीत कोणत्याही प्रकारच्या दबावाला भीक न घालता नेटाने म्हादई बचावासाठी सर्वतोपरी कार्य करतील. शेवटी विजय हा सत्याचा होईल कारण, " अजीब है ये गोवा के लोग " हे प्रत्यक्ष दाखवतील.

माय म्हादईला तिचे मूळ स्वरूप प्राप्त करून देऊन निसर्गाचे आशीर्वाद घेण्यासाठी हा लढा सर्वांनी कोणताही राजकीय, पक्षीय अडसर बाजूला सारून एक दिलाने लढावा. यश आपलेच आहे.नमन म्हादई तुला नमन