बायणातील पालिका उद्यानाचे रूप पालटणार

आमदार दाजी साळकर : गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाकडून पुढाकार


04th December 2022, 12:32 am
बायणातील पालिका उद्यानाचे रूप पालटणार

बायणा उद्यानाच्या पाहणीप्रसंगी आमदार दाजी साळकर. सोबत दीपक नाईक, नगरसेवक दामोदर नाईक व इतर. (अक्षंदा राणे)


प्रतिनिधी । गोवन वार्ता

वास्को : अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या बायणातील पालिका उद्यानाचा विकास गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. या उद्यानामध्ये व्यायामशाळा, फुटबाॅल मैदान, लहान मुलासांठी झोका, घसरगुंडी व इतर गोष्टी, ज्येष्ठांना हवेशीर जागा याचा विचार करण्यात येणार असल्याचे वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी सांगितले.

बायणातील पालिका उद्यानाच्या पाहणीवेळी दाजी साळकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज, गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व नगरसेवक दीपक नाईक, नगरसेवक रामचंद्र कामत, नगरसेवक दामोदर नाईक, उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, महामंडळाचे अधिकारी, सल्लागार व इतर उपस्थित होते.

केल्यावर साळकर म्हणाले की, तेथे बायणावासियांसाठी अनेक गोष्टी विकसित करण्यात येणार आहेत. ज्याचा लाभ लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत होणार आहे. दीपक नाईक यांनी या उद्यानाचा विकास खासगी एजन्सीमार्फत करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, काही कारणास्तव प्रस्ताव मान्य झाले नाहीत. सदर उद्यानाचा विकास साधनसुविधा विकास महामंडळातर्फे करण्यात यावा, असा प्रस्ताव मी ठेवला होता. त्या प्रस्तावाला नाईक यांनी तत्काळ मान्यता दिली. त्यामुळे काही महिन्यांमध्ये बायणा उद्यानाचे रुप बदलणार आहे. या उद्यानाच्या बाहेरील बाजूस दुकाने आहेत. त्या दुकानाच्या वर एक हॉल बांधण्याचा विचार आहे. जेणेकरून पालिकेला महसूल मिळेल. या उद्यानात स्टेज आहे. त्याचा वापर विनायक कला संघाचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, इतर सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी होऊ शकतो.

सदर गार्डनाचा विकास होणार असल्याने नगराध्यक्ष रॉड्रिग्ज यांनी समाधान व्यक्त केले. सदर उद्यानाची बायणावासियांना खरी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

अाश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न!

दीपक नाईक म्हणाले की, या उद्यानाशी बायणावासियांचे भावनिक नाते आहे. या उद्यानाचा वापर सर्व वयोगटांसाठी कसा करता येईल; याचा विचार केला जाईल. या उद्यानाचा विकास करण्यात येईल असे आश्वासन मी पालिका निवडणुकीच्या वेळी दिले होते. ते आश्वासन पुर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. यासाठी आमदार साळकर यांचे योग्य सहकार्य लाभत आहे.