नव्या समितीवर काँग्रेस नेत्यांकडूनच प्रश्नचिन्ह!

प्रामाणिक बाहेर, पात्रता नसलेल्यांना संधी दिल्याची टीका

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd December 2022, 10:39 Hrs
नव्या समितीवर काँग्रेस नेत्यांकडूनच प्रश्नचिन्ह!

पणजी : चार दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या नव्या प्रदेश काँग्रेस समितीवरून पक्षातीलच काही नेत्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. पक्षासाठी प्रामाणिक काम करणाऱ्यांना नव्या समितीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आले. केवळ निवडणुकांच्या दिवसांत उगवणाऱ्यांच्या मात्र महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप नाराज नेत्यांकडून केला जात आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ उपाध्यक्ष, खजिनदार, पाच उपाध्यक्ष, १४ सरचिटणीसांचा समावेश असलेली नवी प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी अखिल भारतीय काँग्रेसने चार दिवसांपूर्वी जाहीर केली. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या, स्थानिकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्यांना मात्र समितीत स्थान देण्यात आलेले नाही. उलट काँग्रेस कार्यालयात कधीही न जाणाऱ्या, कोणत्याही आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी न होणाऱ्यांना मात्र मोठी पदे देण्यात आलेली आहेत. उपाध्यक्ष, सरचिटणीसपदाची जबाबदारी दिलेल्यांतील अनेकांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून कधीही काँग्रेस कार्यालयाचे तोंड पाहिलेले नाही, राज्यातील एकाही प्रश्नावर आवाज उठवलेला नाही, तरीही त्यांच्याकडे महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. राजकीयदृष्ट्या आपापल्या मतदारसंघांत वजन असलेले बाहेर आणि डिपॉझिट वाचवण्याइतपत मते मिळवण्याची पात्रता नसलेल्यांना थेट उपाध्यक्ष, सरचिटणीसपदी बसवण्यात आल्याने ग्रामीण भागांतील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षावरील विश्वास उडाला आहे, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
अडीच महिन्यांपूर्वी आठ आमदार भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचे कार्यकर्तेही भाजपवासी झाले. त्यामुळे सद्यस्थितीत काँग्रेसकडे पुरेसे कार्यकर्तेही नाहीत. अशा परिस्थितीत पक्षाची नव्याने बांधणी करताना प्रभारी, प्रदेशाध्यक्षांनी संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून प्रामाणिकपणे पक्षासाठी कार्य करीत असलेल्यांना नव्या समितीत स्थान देणे अपेक्षित होते. त्यामुळे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असती. अशा नेत्यांनी पुढील पाच वर्षांत चांगली कामगिरी करून काँग्रेसला नवसंजीवनी दिली असती. परंतु, पक्षांतर्गत शिस्त लावणारा, ठाम निर्णय घेणारा नेताच नसल्यामुळे प्रदेश काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, असेही या नेत्याने सांगितले.

पक्षात थेट दोन गट!

प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या विद्यमान प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर असे दोन गट पडले आहेत. त्यामुळेच गिरीश चोडणकर यांच्या मर्जीतील नेत्यांना नव्या समितीतून वगळण्यात आले आहे, असा दावा काही जणांकडून केला जात आहे. याबाबत अमित पाटकर यांच्याशी चर्चा केली असता, नव्या समितीतील पदा​धिकाऱ्यांच्या नेमणुका दिल्लीतील नेत्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. तर या विषयावर आपल्याला कोणतेही भाष्य करायचे नाही असे गिरीश चोडणकर म्हणाले.

नेतृत्व विजय सरदेसाईंकडे द्या : उदय

प्रदेश काँग्रेसला पुन्हा बळकटी द्यायची असेल तर काँग्रेस श्रेष्ठींनी विजय सरदेसाईंशी चर्चा करून गोवा फॉरवर्ड काँग्रेसमध्ये विलिन करून घ्यावा आणि पक्षाची धुरा सरदेसाईंवर सोपवावी, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस नेते तथा माजी महापौर उदय मडकईकर यांनी केली आहे. नवी समिती काँग्रेसला बळकट करण्यास सक्षम नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.