स्रीस्वातंत्र्याची गळचेपी का?

अलीकडील काळात महिलांसंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍यांची संख्या वाढताना दिसत आहे. कुंकू, टिकली, पेहराव, पोषाख, हिजाब यांसारख्या मुद्दयांना धार्मिकतेचे कोंदण देऊन स्रियांना बंधनांच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रतिष्ठेची, धनसंपत्तीची, सरकारी पाठिंब्याची, सरकारी मर्जीची, धार्मिक व्यवस्थेची सत्ता असणार्‍यांकडून स्रियांवर अशा प्रकारची बंधने लादली जात असतील तर तो सरळसरळ सत्तेचा दुरुपयोग आहे. समानतेच्या मूलभूत अधिकारांचे ते उल्लंघन आहे. किंबहुना, वैचारिकदृष्ट्या मागासलेपणाचे हे लक्षण आहे. हा मागासलेपणा सोडायचा असेल तर एक व्यक्ती म्हणून महिलांचा आदर केला गेला पाहिजे.

Story: लेखाजोखा | अ‍ॅड. रमा सरोदे |
03rd December 2022, 09:06 pm
स्रीस्वातंत्र्याची गळचेपी का?

अलीकडील काळात महिलांसंदर्भात आक्षेपार्ह टिप्पण्या करण्याचे जणू पेवच फुटले आहे. या टिप्पण्यांमधून एकीकडे आपला पुरुषी वर्चस्ववाद गाजवतानाच मुक्त आकाशात झेपावू पाहणार्‍या स्रियांना पुन्हा एकदा पाशात, बंधनात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. महिलांचा पेहराव कसा असावा, त्यांनी कोणते कपडे घालावेत, त्यांची वेशभूषा कशी असावी, टिकली लावावी की नाही, हिजाब परिधान करावा का, तिने कसे वागावे यांसारख्या विधानांपासून ते थेट जाहीरपणाने शिवीगाळ करण्यापर्यंत  समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरवणार्‍या तथाकथित मंडळींची मजल गेली आहे. अर्थात, असे प्रकार आत्ताच घडताहेत असे नाही. वर्षानुवर्षांपासून ते सुरू आहेत. याच्या मुळाशी काय आहे हे तपासले असता आपल्या समजाव्यवस्थेत आणि पारंपरिक मानसिकतेत याची बीजे आढळतात. स्रीने कसे राहावे यासाठीची बंधने अनादी काळापासून आपल्याकडील पुरुषसत्ताक व्यवस्थेने लादलेली आहेत. या बंधनांमुळे लोक काय म्हणतील, याची भीती सदोदित स्रियांच्या मनामध्ये घालून दिली आहे. स्रियांना बंधनात अडकवताना पुरुषांसाठी मात्र बंधने नाहीत. त्यांना अमर्याद स्वातंत्र्य असल्यासारखी स्थिती आहे. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, धूम्रपानासारखी गोष्ट व्यसन म्हणून वाईटच आहे. तिचे फुफ्फुसावर होणारे प्रतिकूल परिणाम हे स्री असो वा पुरुष दोघांवरही सारखेच असतात. परंतु एखादी तरुणी अथवा महिला सिगारेट ओढत असेल तर तिला अख्खा समाज दूषणे देताना दिसतो. पण तीच बाब एखाद्या तरुणाने-पुरुषाने केल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते. हा भेदभाव एकविसाव्या शतकात समानतेचे गोडवे गाणार्‍या समाजव्यवस्थेत आजही कायम आहे. आपल्या धर्मात, जातीत, समाजात स्रिया अशा वागत नाहीत, यासारखे विचार मुलींवर अगदी लहानवयापासून लादले जात असतात. ते जणू कायदेशीर नियम असल्यासारखे पाळण्यास भाग पाडले जातात. यामध्ये तिला काय हवे आहे, तिला काय आवडते आहे, तिची एखाद्या गोष्टीबाबत काय मते आहेत याचा विचारच केला जात नाही. यामध्ये व्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा अक्षरशः पायदळी तुडवला जातो. 

वास्तविक इतरांच्या हक्कांचे उल्लंघन न करता, त्यासंदर्भातील मर्यादा सांभाळून जर एखादी व्यक्ती वागत असेल आणि ती वर्तणूक  आपल्या पारंपरिक विचारचौकटींमध्ये बसत नसेल तरीही व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग म्हणून तो स्वीकारलाच पाहिजे. तो न करता धर्मरक्षक म्हणून, समाजरक्षक म्हणून आक्रमकपणा दाखवत त्या व्यक्तीस्वातंत्र्यावर दडपण आणले जात असेल तर ते खरोखरीच समाजहितैषी आहे का, हे आधी तपासले गेले पाहिजे. उदाहरणच घ्यायचे झाल्यास मध्यंतरी एका महिलेने  फेसबुकवरुन एक मोहीम चालवली होती आणि त्यामध्ये दसरा-दिवाळीसारख्या हिंदू धर्मियांच्या सणांना टिकली लावणार्‍या महिलेकडूनच वस्तू खरेदी करा असे आवाहन केले गेले होते. वैयक्तिक मत म्हणून त्याविषयी आक्षेप असण्याचे कारण नाही; परंतु प्रपोगंडा म्हणून हा विचार पुढे रेटताना हिंदू संस्कृतीमध्ये विधवा महिलांना टिकली लावण्याची परवानगी दिली जात नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच धर्माच्या नावावर एकाला विरोध दर्शवताना आपल्या धर्मातीलच काहींना आपण वगळतो आहोत, याचा साधा विचारही कसा केला जात नाही? दक्षिण भारतातील एका मुस्लिम समुदायातील महिला कपाळावर  टिकली लावत असल्याचे सांगितले जाते.  त्याचा विचार आपण करणार की नाही? मुळात कोणत्याही स्रीने तिच्या कपाळावर कुंकू लावावे, टिकली लावावी, गंध लावावे की कपाळ तसेच ठेवावे हा पूर्णतः तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. याबाबत तिला समाज म्हणून किंवा एखादा गट बनवून सक्ती करुच शकत नाही. कारण तो तिचा घटनादत्त अधिकार आहे. संस्कृती आणि परंपरेच्या पगड्याखाली तिच्या या अधिकारांवर गदा आणण्याचा ठेका इतरांना कोणी दिला? मध्यंतरी, संभाजीराव भिडे यांनी एका पत्रकार तरुणीला टिकली न लावल्यामुळे प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचे प्रकरण समोर आले. त्याहीवेळी समाजातील धार्मिकतेचा ठेका घेतलेले लोक लागलीच स्रीत्व, परंपरा, धार्मिक आचरण यांचे डोस देताना दिसले. परंतु हा सर्वार्थाने त्या तरुणीचा वैयक्तिक मुद्दा आहे. तिच्यावरच नव्हे तर अन्य कोणाही महिलेवर जबरदस्तीने आपली मते लादण्याचा अधिकार कोणालाही नाहीये. राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे हनन करण्याचा हा प्रकार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. 

काही दिवसांपूर्वी योगगुरू म्हणून नावारुपाला आलेल्या रामदेवबाबांनी  तर या सर्वांचा कळस गाठणारी टिप्पणी केली. साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये देखील त्या चांगल्या दिसतात. मात्र, माझ्या नजरेने पाहिले, तर काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात, असे विधान एका योग शिबिरात जाहीर व्यासपीठावरुन त्यांनी केले. धक्कादायक बाब म्हणजे, अमृता फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती व्यासपीठावर असताना त्यांनी हे विधान केले. तरीही अमृता यांनी त्याचा निषेध न करता सारवासारव करणारी भाषा केली. हे धक्कादायक आहे. रामदेवबाबा स्वतःला संन्यासी म्हणून घेतात. पण त्यांनी केलेले विधान हे सन्यासीपणाच्या कोणत्या व्याख्येत अथवा निकषात बसणारे आहे? कोणत्या संस्कृतीत बसणारे आहे? उलटपक्षी हे विधान म्हणजे एक प्रकारे लैंगिक अत्याचार आहे. कारण ३५४ अ या कलमानुसार ही अश्लील टिप्पणी आहे. त्यावर महिला आयोगाने कारवाई केली पाहिजे. कारण ते कोणा एका महिलेसंदर्भात केलेेले नसून समस्त महिलावर्गाला उद्देशून केलेले आहे. अशा बेजबाबदार विधानांना चाप लावला गेला पाहिजे. मध्यंतरी हिजाबचे प्रकरणही असेच गाजले होते. व्यक्तिशः मी त्याच्या विरोधातील आहे. परंतु डोक्यावर पदर घ्यायचा की नाही, घुंगट घ्यायचा की नाही हा जसा हिंदू धर्मातील स्रियांचा निवडीचा हक्क आहे, तशाच प्रकारे  मुस्लिम धर्मातील तरुणींनी-महिलांनी हिजाब घालावा की नाही हा पूर्णतः त्यांच्या आवडीचा भाग आहे. हिजाब हा इस्लाम धर्माचा भाग नाही, ते मुस्लिम स्रियांवर लादलेले बंधन आहे, ही बाब स्पष्ट आहे. परंतु व्यापक प्रमाणात विचार करता केवळ हिजाबमुळे मुलींचे शिक्षण बंद झाले तर त्याला जबाबदार कोण? समाजामध्ये कायदे-नियम ठरवताना अधिक चांगले काय याचा विचार प्राधान्याने करणे अभिप्रेत असते. मग यामध्ये हिजाब काढणे अधिक चांगले ठरेल की त्या स्रियांनी शिक्षण घेणे? कदाचित शिक्षण घेतल्यानंतर त्या महिला या रुढीवादी परंपरेला विरोध करु शकतात आणि हिजाबला नकार देऊ शकतात. परंतु  यासाठीचा संघर्ष करण्यासाठी, स्वतःच्या पायामध्ये बळ येण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे हिजाबपेक्षा शिक्षण अधिक महत्त्वाचे असल्याने ते मिळणे गरजेचे आहे, हा साधा सरळ विचार आहे. पण एकदा धार्मिक द्वेषाचे विष मनात शिरले की विवेकबुद्धी, विवेकनिष्ठ विचार मागे पडतात. त्यातूनच अशा मुद्दयांवरुन अकारण संघर्ष होतो. खेदाची बाब म्हणजे या सर्वांमध्ये सातत्याने स्रियांचे नुकसान होत आहे. त्यांना त्रासाला, अपमानाला, अवहेलनांना सामोरे जावे लागत आहे. 

मुळात आपल्या सर्वांची जडणघडण पितृसत्ताक व्यवस्थेत झाली आहे. त्यामुळे या व्यवस्थेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणार्‍या स्रियांना समाजातील बहुतेकांकडून आदराचे स्थान दिले जाते. मग ते हिजाब घालणे असो, बुरखा घालणे असो, टिकली लावणे असो, घुंगट घालणे असो किंवा वटसावित्रीची पूजा करणे असो; या सर्वांचे निमूटपणाने पालन केल्यास ती स्री चांगली आणि या परंपरांना विरोध करणारी, झुगारून देणारी स्री वाईट अशी सरळसरळ विभाजनवादी मांडणीच आपण केली आहे. त्यातून स्रियांमध्येही एक प्रकारची स्पर्धा निर्माण झाली आहे. एकीकडे या सर्व चालीरिती, परंपरांचे पालन करून आपण कशा धर्माचरणी आहोत,  आदर्श आहोत याचे प्रदर्शन मांडणार्‍या स्रिया एकीकडे दिसतात; तर दुसरीकडे प्रगतीशील विचारांचे अनुसरण करणार्‍या स्रिया आहेत. गंमत म्हणजे स्रियांमध्ये ही विभागणीदेखील पुरुषसत्ताक मानसिकतेचा पगडा असणार्‍या समाजव्यवस्थेमुळेच निर्माण झाली आहे. लहानपणापासूनच मुलींवर ही रुढीवादी विचासरणी मनावर बिंबवली जाते आणि त्याविरोधात प्रश्नही विचारण्याचा अधिकार दिला जात नाही. वास्तविक, प्रश्न विचारणे आणि दुसर्‍यांच्या मतांचा आदर करणे हा लोकशाहीचा गाभा आहे. महात्मा गांधींनीही लोकशाहीबाबत बोलताना असे म्हटले होते की,  ९९ टक्के लोकांचे एकमत असेल आणि एक टक्का लोकांचे मत वेगळे असेल; तर मी त्या एक टक्का लोकांचे म्हणणे ऐकून घेईन. हीच खरी लोकशाही आहे. पण आपल्याकडे एकंदरीतच लोकशाहीपेक्षा दडपशाहीकडे जाणारे वातावरण दिसत असून ते धोकादायक आहे. प्रतिष्ठेची, धनसंपत्तीची, सरकारी पाठिंब्याची, सरकारी मर्जीची, धार्मिक व्यवस्थेची सत्ता असणार्‍यांकडून स्रियांवर अशा प्रकारची बंधने लादली जात असतील तर तो सरळसरळ सत्तेचा दुरुपयोग आहे. समानतेच्या मूलभूत अधिकारांचे ते उल्लंघन आहे. किंबहुना, वैचारिकदृष्ट्या मागासलेपणाचे हे लक्षण आहे. हा मागासलेपणा सोडायचा असेल तर एक व्यक्ती म्हणून महिलांचा आदर केला गेला पाहिजे. तिचे म्हणणे, विचार, वर्तणूक पटत नसेल त्याबाबत आपले मत जरुर मांडावे; पण ते लादून तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणता कामा नये. कुठलेही स्वातंत्र्य किंवा अधिकार हे अमर्याद नसतातच. इतरांच्या हक्कांचे-अधिकारांचे उल्लंघन न करण्याच्या जबाबदारीची चौकट त्यांना असते. ती चौकट पाळून जर स्वातंत्र्याचे पालन केले जात असेल तर त्यावर आक्षेप असण्याचे कारणच काय? 

जाता जाता शेवटचा मुद्दा म्हणजे, स्रियांवर कुंकू, टिकली, पेहरावाची बंधने घालताना थोडा विचार करुन पहा. पूर्वीच्या काळी समजा ब्राह्मण समाजातील व्यक्ती केवळ धोतर, जानवे आणि शेंडी अशा रुपात दिसायचे. आज तशा स्थितीत ते ऑफिसला जाऊ शकतात का किंवा जातात का? नाही. कारण काळानुसार त्यांच्यात बदल झाला. त्याबाबत आक्षेप नाही. पण मग तसाच काळानुरुप बदल स्रियांनीही अंगिकारला तर त्यात गैर काय?