देशातील पहिला ‘ट्रान्सजेंडर डॉक्टर’ तेलंगणात!

प्राची राठोड, रुथ जॉनपॉल यांनी रचला इतिहासात; सरकारी सेवेत दाखल

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
03rd December 2022, 07:23 pm
देशातील पहिला ‘ट्रान्सजेंडर डॉक्टर’ तेलंगणात!

हैदराबाद : तेलंगणातील दोन तृतीयपंथीयांनी सर्व आव्हानांना तोंड देत त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि राज्यातील सरकारी सेवेत सामील होणारे पहिले ‘ट्रान्सजेंडर डॉक्टर’ बनून इतिहास रचला. प्राची राठोड आणि रुथ जॉनपॉल अशी दोन्ही ट्रान्सजेंडर डॉक्टरांची नावे आहेत. या दोन्ही डॉक्टरांनी नुकताच शासकीय उस्मानिया सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. प्राची राठोड हिला तृतीयपंथी असल्यामुळे शहरातील एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने नोकरीवरून काढून टाकले होते.
प्राची राठोडने २०१५ मध्ये आदिलाबादच्या मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले आहे. लहानपणापासून सामाजिक कलंक आणि भेदभाव याच दृष्टीने लोक आमच्याकडे पाहायचे. मी डॉक्टर झाल्यानंतरही अनेक लोकांनी भेदभाव केला, असे त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. प्राची राठोड पदव्युत्तर शिक्षणासाठी दिल्लीला गेली होती, पण प्रतिकूल परिस्थितीमुळे तिला पुन्हा हैदराबादला परतावे लागले.
हैदराबाद येथील रुग्णालयात कार्यरत असताना प्राचीने इमर्जन्सी मेडिसिनचा डिप्लोमा केला. शहरातील एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तीन वर्षे काम केले. पण प्राची तृतीयपंथी असल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊ शकते, असे हॉस्पिटलला वाटले. त्यामुळे प्राचीला रुग्णालयातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर एक गैर-सरकारी संस्था तिच्या मदतीसाठी पुढे आली आणि प्राचीला या संघटनेच्या क्लिनिकमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर आता प्राचीला स्मानिया सामान्य रुग्णालयात नोकरी मिळाली.

तृतीयपंथीयांच्या व्यथा...

- लहानपणी डॉक्टर होण्याचे स्वप्न होते, पण इतर विद्यार्थ्यांच्या टोमण्यांवर मात करत बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि आता स्वप्न पूर्णही झाले.
- ती खरंच खूप वाईट वेळ होती. डॉक्टर होण्याचा विचार करण्याऐवजी आयुष्य कसे जगायचे आणि या गोष्टींवर मात कशी करायची, हा मोठा प्रश्न होता.
- तृतीयपंथीयांना जगताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. नोकरी आणि शिक्षणात काही आरक्षण दिल्यास या समाजाला जीवनात पुढे जाण्यास मदत होईल.