पंधरा वर्षांनंतर मिळाली शांत झोप

पेडणे किनारपट्टीवरील स्थानिक सुखावले : रात्री दहानंतर किनारे सुनेसुने


03rd December 2022, 12:14 am
पंधरा वर्षांनंतर मिळाली शांत झोप

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पेडणे : मुंबई उच्च न्यायालयाने किनारी भागातील खुल्या जागेत रात्री १० नंतर कसल्याच प्रकारचे संगीत वाजले तर स्थानिक पोलीस अधिकारी, तालुका उपजिल्हाधिकारी यांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा आदेश दिला होता. त्यानंतर पेडणे पोलिसांच्या सूचनेप्रमाणे व्यावसायिकांनी त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे तब्बल पंधरा वर्षानंतर किनारी भागात रात्री १० नंतर संगीताचा आवाज न झाल्याने स्थानिकांना हक्काची झोप मिळाली.

हरमल येथील उदय वायंगणकर यांनी सांगितले की, किनारी भागात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या पार्ट्यांचा अनुभव जवळून घेतला; मात्र पंधरा वर्षानंतर आम्हाला १ डिसेंबर रोजी नीट झोप मिळाली. यापूर्वी ती कधी मिळाली नव्हती. हे असेच चालू राहिले तरच स्थानिक सुखाने झोपू शकतात.

मोरजी येथील सदानंद शेट्ये यांनी सांगितले की, १५ वर्षांपासून मोरजी किनारी भागात धांगडधिंगा सुरू होता. १० नंतर सुरू झालेल्या पार्ट्या पहाटेपर्यंत चालायच्या आणि सर्वत्र ध्वनी प्रदूषण, पार्किंग व्यवस्थेचे तीनतेरा, वाहतुकीची कोंडी आणि स्थानिकांची झोपमोड होत होती. मात्र १ डिसेंबर रोजी रात्री १० नंतर कसल्याच प्रकारचे संगीत ऐकायला आले नाही.

मोरजी येथील मारिया गिल्बर्ट फर्नांडिस यांनी सांगितले की, १०-१२ वर्षापासून किनारी भागात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या पार्ट्या सुरू होत्या. त्या कायमस्वरूपी बंद करायला हव्यात. जे काही असेल ते कायदेशीरपणे करावे.

अविनाश चौधरी यांनी सांगितले की, केवळ ध्वनी प्रदूषण नियंत्रित करून पर्यटन हंगाम व्यवस्थित होणार नाही. कचरामुक्ती हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे.

संदेश शेटगावकर यांनी सांगितले की, सरकारने यापूर्वीच ही कार्यवाही आणि अंमलबजावणी करायला हवी होती. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सरकारी यंत्रणेला जाग येऊन काही होणार नाही. त्याअगोदर जर पोलीस आणि उपजिल्हाधिकारी अधिकारी यांनी दखल घेतली असती, तर ही वेळ आलीच नसती.

मांद्रे किनाऱ्यावरील नाईट क्लबव्यावसायिकांचे धाबे दणाणले

उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा परिणाम : मुभा देण्याची पोलिसांकडे मागणी

मांद्रे मतदारसंघातील मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल या किनारी भागातील नाईट क्लब, हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिक जे सलगपणे आठवड्यातून तीन दिवस संगीत रजनी आयोजित करत होते, त्यांचे धाबे दणाणले आहेत. ते सध्या पेडणे पोलिसांच्या हातापाया पडू लागले आहेत. ‘आम्हाला कशातरी पद्धतीने या संगीत पार्ट्या आयोजनासाठी मुभा द्यावी’, अशी मागणी ते करत आहेत. परंतु पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी कडक भूमिका घेतल्यामुळे या व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
रविवार ४ रोजी मोठ्या प्रमाणात किनारी भागात जंगी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे फलक ठिकठिकाणी लावल्याचे दिसून येते. परंतु हे फलक उच्च न्यायालयाच्या आदेशाअगोदर लावण्यात आल्यामुळे या पार्ट्या बंद होणार की काय, यामुळे अनेक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
या पार्ट्यांमुळे एका रात्रीत करोडो रुपयांची उलाढाल होणार होती, परंतु रात्री १० वाजल्यानंतर कुठल्याच ठिकाणी जर ध्वनी प्रदूषण करणारे संगीत किंवा स्पीकर लावून आवाज केला असेल तर त्यांची पूर्ण जबाबदारी ही पेडणे पोलीस आणि तालुक्याचे अधिकारी यांच्यावर असेल, असे उच्च न्यायालयाने सांगितल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.

उद्या काय होणार याकडे स्थानिकांचे लक्ष
काही जणांनी संगीत रजनीसाठी ऑनलाइन बुकिंग अगोदरच करून ठेवलेले आहे. दीड हजार ते तीन हजार प्रवेश शुल्क आकारण्यात येत आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला आहे. मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात रविवार ४ रोजी जंगी पार्ट्यांचे आयोजन केल्याचे फलक ठिकठिकाणी दिसत आहेत. त्या पार्ट्यांचे काय होणार, पुन्हा ध्वनी प्रदूषण होऊन आमची झोपमोड होणार नाही ना, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.