एक खात्रीचं विसावा देणारं ठिकाण

Story: घराबद्दल बरेच काही । गौरी भालचंद्र |
02nd December 2022, 09:12 Hrs
एक खात्रीचं विसावा देणारं ठिकाण

घरातील माणसांप्रमाणेच घरातील वस्तूही आपुलकीनं जपून सांभाळल्या जातात, त्यांच्याकडेही पुरेसे लक्ष दिलं जातं. घराच्या भिंतींना आवडता रंग दिला जातो. दाराला, खिडक्यांना सुंदर रंगांचे व नक्षीदार पडदे लावले जातात. झुंबरे, भिंतींवरील पेंटिंग्ज, मूर्ती जशी आवड असेल आणि मुख्य म्हणजे जसे शक्य होईल त्याप्रमाणे घराचं सौंदर्य वृद्धिंगत केलं जातं.

घरात देवघरासाठी जागा असते, जिथे भक्तीचा ओघ वाहत असतो. आपल्या घराबरोबरच त्याला अंगण असेल तर तेथे किंवा नसेल तर बाल्कनी असल्यास फुलझाडे लावून आपली आवड जोपासून घराला आणखी शोभाही आणली जाते व आपल्या मनाप्रमाणे  घराला सजवण्याचा तसेच साकारण्याचा प्रयत्न केला जातो. घर एकमेकांना धरून ठेवतं, घर ही दोन अक्षरे, पण आपल्या प्रत्येकाच्याच 

जीवनात त्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं. केवळ चार भिंती आणि छप्पर म्हणजे घर नव्हे. तिथे राहणारी माणसं, तिथले वातावरण, त्यातून निर्माण होणारे प्रेम, सुख, आनंद म्हणजे घर. 

कामांसाठी बाहेरगावी जाताना घरातील व्यक्तींना हुरहुर लागते व बाहेर गेल्यावर हेच घर परत येण्यासाठी खुणावत असतं. घराबद्दल एक अनामिक ओढच असते. आपलेपणा असतो, एक खात्रीचं विसावा देणारं ठिकाण असतं घर. म्हणजे विश्रांतीगृह, हॉलीडे होम, वसतिगृह यांना घराची सर कधीच येत नाही. तिथे बऱ्याच सोयी असतीलही पण आपल्या घरात आपल्या माणसात दोन मिनिटंसुद्धा बसल्यावर जसं मोकळं मोकळं वाटतं ना तसं नसतं बरं तिथे. तिथे असतो एक वागण्यातला नकलीपणा आणि ऍडजस्टमेन्ट. आपल्या घरातही ऍड्जस्टमेन्ट करत असतो आपण पण तिथे मनाला मोकळेपणा लाभतो असे मला वाटते.

आपल्या स्वतःची, आपल्या भावभावनांची आणि आपल्या दैनंदिन जगण्याची कशी रचना करतो हे म्हणजे एखाद्या जागेत परकं वाटणं किंवा आपलंसं वाटणं हे ठराविक काळ, अवकाश किंवा रूपावर नसतं अवलंबून तर ते कपडे, मित्र-मैत्रिणी, आजूबाजूचे अनुभव, हवापाणी, झाडं-झुडुपं यासारख्या गोष्टीतून ठरत जातं आणि ते ठरतं, मला वाटतं आपण घरात कसं वसतो, राहतो आणि घरं सतत कशी उभारली, साकारली जात असतात या दोन्हीच्या अधेमध्ये घर आणि घरपण यांचा विचार होत असतो. दररोजच्या जगण्याची तालबद्धता ठरवणारे ठिकाण म्हणजे आपले घर. 

घर म्हणजे साचलेल्या कामांची यादी? घरपण म्हणजे गॅस कनेक्शन असतं का? किंवा विजेचं मीटर? मसाल्याच्या बरण्यांची मांडणी? बसायची आणि लिखाण करण्याची एखादी जागा, नाश्ता करण्याची किंवा दिवसा डुलक्या काढायची जागा? की घरपण म्हणजे लग्न? नातेवाईकांचं जाळं, मित्राचं वर्तुळ…?

काही लोकं तुम्हाला सांगतील की जिथं चूल मांडलेली असेल – स्वयंपाक करायची जागा असेल, एखादा स्टोव्ह किंवा गॅस शेगडी असेल ते घर परिपूर्ण होतं. काहीजणांना कपाटात कपडे नीट घडी करून लावले, त्यात पार्‍याच्या गोळ्या टाकल्या की घराला घरपण आल्यासारखं वाटतं आणि काहीजणांना त्यांच्याकडच्या कुंड्यांसाठी बाल्कनीत पुरेशी जागा मिळाली की, घर आपलसं वाटायला लागतं. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते . 

कोणीही काहीही बोललं तरी जो माणूस आपल्या कष्टाने घर घेतो, ते सजवतो, त्याला घरपण देतो त्याला त्याचं घर एखाद्या महालापेक्षा कमी वाटत नाही. कारण त्याच्याकडे त्याच्या हक्काचं असं स्वतःचं घर असतं जे कोणीही हिरावून घेणार नाही. त्याच्या कुटुंबासाठीची ती हक्काची जागा असते जिकडे दिवसभर कामानिमित्त घराबाहेर राहिल्यावर संध्याकाळी घरी परत येण्याची ओढ असते. तुमच्या मेहनतीतून जे जे साकारता ते तुमचं ड्रीम होम बनत जातं. घरात सुविधा कमी असल्या तरी चालतील पण घरात शांतता मिळणं आवश्यक आहे.