सीटूएस महत्त्वाकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम गोव्यात लवकरच

केंद्र सरकारची मंजुरी : मंत्री खंवटे


02nd December 2022, 12:14 am
सीटूएस महत्त्वाकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम गोव्यात लवकरच

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

पणजी : गोवा लवकरच एनआयटी आणि आयआयटी संस्थांमार्फत सीटूएस (चीप टू स्टार्टअप) हा महत्त्वाकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करणार आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला या कार्यक्रमासाठी मंजुरी देण्यात आली असून हा उपक्रम पाच वर्षांसाठी असेल, अशी माहिती पर्यटन तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.       

मंत्री खंवटे पुढे म्हणाले की, पुढील सहा महिन्यांत या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण सुरू होईल. भारताला सेमीकंडक्टर हबमध्ये बदलण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांच्या अनुषंगाने, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्रालयाने सीटूएसअंतर्गत १०० शैक्षणिक संस्था, आर अँड डी संस्था, स्टार्ट-अप आणि एमएसएमई यांच्याकडून अर्ज मागवले होते. गोव्यातून एनआयटी आणि आयआयटीने त्यासाठी अर्ज केला होता व त्याला केंद्राची मंजुरी मिळाली आहे.      

मंत्री खंवटे पुुढे म्हणाले की,  अलीकडेच दिल्ली भेटीदरम्यान केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. त्यात सीटूएसवर सविस्तर चर्चा झाली आणि दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारने त्याला मंजुरीही दिली. सध्याचे युग तंत्रज्ञानावर आधारित आहे. उपलब्ध साधनांचा वापर करत तंत्रज्ञानाच्या मार्गाने पुढे जाण्यासाठी तयार राहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.       

आजची तरुण पिढी हे भारताचे भविष्य आहे. कोविड काळात राज्याच्या दुर्गम भागात कनेक्टिव्हिटीची समस्या सरकारच्या लक्षात आली. हा मुद्दा सरकारने वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची संधी म्हणून घेतला आणि संसाधने उपलब्ध करून देण्यात मदत केली. गोवा लवकरच डिसेंबरमध्ये पहिला थ्रीडी प्रिंटर तंत्रज्ञान सुरू करेल, अशी घोषणाही मंत्री खंवटे यांनी केली.