डिचोलीत परप्रांतीय भाजीविक्रेते भिडले

दोन गटांमध्ये तुफान हाणामारी : स्थानिक व्यापाऱ्यांकडून कारवाईची मागणी


02nd December 2022, 12:12 am
डिचोलीत परप्रांतीय भाजीविक्रेते भिडले

डिचोली बाजारात लमाणींकडून झालेल्या भांडणानंतर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती.

प्रतिनिधी। गोवन वार्ता

डिचोली : डिचोली बाजारात आठवडा बाजाराला भाजी विक्री करणाऱ्या लमाणी विक्रेत्यांनी आपापसातील वाद बाजारात आणत पुन्हा एकदा दहशत माजवली. बुधवारच्या बाजारात रात्रीच्या वेळी दोन गटांमध्ये खुली फ्रीस्टाईल फाईट लोकांनी अनुभवली. हातात दंडुके, लोखंडी सळ्या घेऊन झालेल्या या हाणामारीत बाजारात आलेल्या लोकांची मात्र बरीच धावपळ उडाली. या दहशतीमुळे बाजारात वातावरण तंग झाले होते. या प्रकारामुळे डिचोली बाजारात यापुढे लमाणी भाजी विक्रेत्यांना बसूच देऊ नये, अशी मागणी बाजारातील विक्रेत्यांनी केली आहे.       

  गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अशाच प्रकारे डिचोली साप्ताहिक बाजारात या लमाणी भाजी विक्रेत्यांमधील गटांमध्ये हाणामारी झाली होती. त्याहीवेळी दंडुके, लोखंडी सळ्या हातात घेऊन मारामारी झाली होती. लोखंडी वजनेही भिरकावून मारली होती. या मारामारीत काही लोकांनाही मार लागला होता. किरकोळ जखमी झाले होते. त्यानंतर डिचोली बाजारात लमाणी भाजी विक्रेत्यांना डिचोली आठवडा बाजारात बसायला देऊ नये, अशी मागणी झाली होती. नगरपालिकेनेही गंभीर दखल घेत लमाणींना बाजारात बसण्यास मज्जाव केला होता. परंतु त्यानंतर हळू हळू या लमाणींनी बाजारात आपले बस्तान बसविले व ते पुन्हा बाजारात बसू लागले होते.       

या लमाणी भाजीविक्रेत्यांमध्ये अधूनमधून खटके उडतच होते. त्यामुळे बाजारात भांडणे, मारामारी होतच होती. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत होते. बुधवारी मात्र पुन्हा मोठ्या प्रमाणात हाणामारी झाल्याने लोकांमध्ये भीती पसरली होती. मारामारी करणाऱ्यांच्या हातात दंडुके व लोखंडी सळ्या पाहून लोकांची धावपळ उडाली.       

या प्रकरणाची माहिती नगराध्यक्ष कुंदन फळारी यांना मिळताच ते पोलिसांसह बाजारात दाखल झाले. मारामारी करणाऱ्यांनी तोपर्यंत बाजारातून धूम ठोकली होती. ते हाती लागू शकले असते. त्यांची माहिती पोलिसांना इतरांकडून देण्यात आली होती. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सर्व लमाणी भाजी विक्रेत्यांना बैठकीसाठी बोलावले होते. या बैठकीस मारामारी करणारे आलेच नाहीत. आम्ही शांततेत आमचा धंदा करतो, जे कोणी बाजारात भांडणे व मारामारी करून दहशत पसरवतात, अशा विक्रेत्यांना बाजारात बसू देऊ नये, अशी मागणी काही भाजी विक्रेत्यांनी नगराध्यक्षांसमोर केली.       

या प्रकारामुळे डिचोली बाजारात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या लमाणी भाजीविक्रेत्यांचे हे खटके दर दोन आठवड्यांनी सुरूच असतात. त्याचा त्रास लोकांना होतो. त्यासाठी त्यांना बाजारात जागाच देऊ नये, अशी मागणी करण्यात येत आहे.