कदंब बस अभावी सुर्लतील विद्यार्थ्यांचे हाल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st December 2022, 12:15 am
कदंब बस अभावी सुर्लतील विद्यार्थ्यांचे हाल

म्हापसा : सुर्ल, सत्तरी ते पणजी मार्गावरील कदंब बस सेवा गेल्या काही महिन्यांपासून वारंवार खंडित होत आहे. मागील तीन दिवस बस येत नसल्याने विद्यार्थी वर्गासमोर मोठी समस्या निर्माण झाली असून कदंब महामंडळाने बस सेवा सुरळीत करून ही समस्या दूर करावी, अशी मागणी पालक वर्गाने केली आहे.

या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पर्ये आणि साखळीमध्ये यावे लागते. गावात येणारी कदंब बस हिच या विद्यार्थ्यांचे मुख्य वाहतुकीचे साधन आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून ही बस सेवा बेभरवशाची ठरली आहे. बहुतेकवेळा कदंब बस कर्मचारी सुर्लाला न जाता केरी सत्तरीमध्ये बसचा रात्रीचा शेवटचा थांबा घेतात. आणि सकाळी तेथूनच पुढच्या मार्गावर बस सोडली जाते.

ही बस न आल्यामुळे विद्यार्थी वर्गाला शाळेत जाण्यासाठी चोर्ला - बेळगाव मुख्य रस्त्यावर यावे लागते. सध्या कदंब महामंडळाने पणजी ते बेळगावला जाणाऱ्या सर्वच कदंब बस सेवा खंडीत केलेली आहे. कर्नाटक एसटी सेवाही वेळेत मिळत नाही. शिवाय एसटी बसमधील प्रवास विद्यार्थ्यांना परवडणारा नाही.

त्यामुळे या मुलांना जीव धोक्यात घालून मालवाहू ट्रकमधून प्रवास करावा लागतो. सध्या चाेर्लाघाट रस्त्यावर मालवाहू वाहनांना वारंवार अपघात घडत आहेत, अशा स्थितीतही या मुलांना शिक्षणासाठी या गाड्यांमध्ये चढावे लागते.

या बसवर सुमारे ३० विद्यार्थी अवलंबून आहेत. त्यात मुलींचा जास्त भरणा असून या मुलींना विद्यालयांत जाण्यासाठी ट्रकच्या टपावर चढून प्रवास करावा लागतो.

गेल्या सोमवारपासून कदंब बस सुर्लात फिरकलेलीच नाही. ग्रामस्थांनी कदंब महामंडळाकडे संपर्क साधला तेव्हा पुरेसा कर्मचारी नाही, असे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. महामंडळाच्या या वेळकाढूपणामुळे सर्लतील विद्यार्थी वर्गाचे मात्र मोठे नुकसान होत असून सरकारने याकडे लक्ष द्यावे व या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.