सहावी ते आठवीपर्यंत अभ्यासक्रमांत रस्ते सुरक्षेसंदर्भातील पाठ

सरकारकडून प्रक्रिया सुरू; उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st December 2022, 12:13 am
सहावी ते आठवीपर्यंत अभ्यासक्रमांत रस्ते सुरक्षेसंदर्भातील पाठ


पणजी : राज्यातील रस्ते अपघात टाळण्यासाठी इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात रस्ते सुरक्षेसंदर्भातील पाठांचा समावेश करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केलेली आहे. शालेय पातळीपासूनच विद्यार्थ्यांना वाहतूक नियम आणि रस्ते सुरक्षेसंदर्भातील माहिती देण्यात येणार आहे, असे उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी बुधवारी सांगितले.
रस्ता सुरक्षा समितीच्या बुधवारी झालेल्या दुसऱ्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. गेल्या काही वर्षांत राज्यातील रस्ते अपघातांत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यावर आळा घालण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानेही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मंत्रालयाने राज्यातील २४ अपघातप्रवण क्षेत्रे अधिसूचित केली असून, पुढील काळात तेथे आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्यात येणार आहेत, असे त्या म्हणाल्या. रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारने वाहतूक सेल, पीडब्ल्यूडी, अबकारी खाते आणि स्वयंसेवी संस्थांचा समावेश असलेली समितीही स्थापन केली आहे. रस्ते सुरक्षासंदर्भातील पुस्तिका गोव्यातील सर्वच शाळांना वितरित केल्या जाणार आहेत, असेही जिल्हाधिकारी मामू हागे यांनी नमूद केले.
दरम्यान, राज्यात गेल्या काही वर्षांत रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झालेली आहेत. यात अनेकांचे बळी गेलेले आहेत. तर, काहीजण कायमस्वरूपी अपंगही झालेले आहेत. त्यामुळे अपघातास कारण ठरत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्यावर मात करण्याचे प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकारने सुरू केलेले आहेत.