झुआरी पूल डिसेंबर अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुले

मंत्री नीलेश काब्राल : नियम मोडणाऱ्यांचे फोटो काढणारी सिग्नल यंत्रणा बसविणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st December 2022, 12:10 am
झुआरी पूल डिसेंबर अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुले

पणजी : नवीन झुआरी पुलाची लोड चाचणी सुरू करण्यात आली आहे. पुलाची एक बाजू डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले. झुआरी पुलावर लोड चाचणीवेळी त्यांनी ही माहिती दिली.

लाल सिग्नल असताना काही जण गाडी न थांबवता पुढे जात वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. सिग्नलाच्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे फोटो काढणारी सिग्नल यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मेरशी जंक्शन येथे ही यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.

कला अकादमी, सांतइनेज सर्कल, पर्वरी कोकेरो जंक्शन, साखळी हॉस्पिटल, दिवचल शांतादुर्गा हायस्कूल सर्कल अशा ठिकाणी सिग्नल यंत्रणा आहे. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. सिग्नल असले तरी काही जण पुढे जात वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. याठिकाणी बऱ्याच वेळी पोलीस नसतात. त्यामुळे त्यांना दंड करता येत नाही. यावर उपाय म्हणून मेरशी जंक्शनवर नियम मोडल्यावर त्याचा फोटो काढणारी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामुळे पोलीस नसले तरी नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावता येणार आहे.

डिसेंबरात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येणार आहेत. यावेळी वाहनांच्या प्रमाणात वाढ होणार आहे. झुआरी पुलावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून व्यवस्था ठेवली जाणार आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने पोलीस असणार आहेत.

१४३६ कोटी रुपयांच्या आठ पदरी झुआरी पुलाचे काम दिलीप बिल्डकॉन कंपनी करीत आहे. पुलाच्यावर टॉवर उभारण्यासह रेस्टॉरंट आणि आर्ट गॅलरी उभारण्याचा प्रस्ताव आहे.

झुआरी पुलाचे लोड चाचणी

झुआरी पुलाची लोड चाचणी सुरू झाली आहे. यावेळी मंत्री नीलेश काब्राल आणि अधिकाऱ्यांनी यावेळी पाहणी केली. दिवसभर ट्रक उभे करुन लोड चाचणी करण्यात येणार आहे. याला एक आठवड्याचा वेळ जाणार आहे. पूल डिसेंबर अखेरपर्यंत चाचणीसाठी खुले करण्यात येणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले.