पूर्वीच्या कामगारांना खाणींवर सामावून घ्या !

पुती गावकर : आश्वासन पाळण्याचे सरकारला आवाहन


01st December 2022, 12:00 am
पूर्वीच्या कामगारांना खाणींवर सामावून घ्या !

प्रतिनिधी । गोवन वार्ता

फोंडा : खाणी बंद झाल्यानंतर कामगारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. सरकारने खाणींचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. खाणी सुरू झाल्यानंतर पूर्वीच्या कामगारांना पुन्हा कामावर घेऊन सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करावे, असे आवाहन गोवा मयनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी केले.                   

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वी खाणी सुरू झाल्यानंतर पूर्वीच्या कामगारांना सामावून घेण्याचे आश्वासन विधानसभेत दिले होते. त्या आश्वासनानुसार सरकारने लिलाव प्रक्रिया सुरू केलेल्या खाणींवर पूर्वीच्या कामगारांना नोकरीत सामावून घेण्याची अट घालण्याची आवश्यकता आहे, असे पुती गावकर यांनी सांगितले.                   

गोवा डेअरीमध्ये ६-७ वर्षांपासून काम करणाऱ्या सुमारे १० कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. गोवा डेअरीमध्ये कित्येक कामगार सध्या निवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे कामगारांना घरी पाठवण्यापेक्षा त्यांना त्याठिकाणी सामावून घेण्याची आवश्यकता असल्याचे पुती गावकर यांनी सांगितले.                   

केंद्र सरकारने यापूर्वीच किमान वेतन ५५३ रुपये देण्याचे जाहीर केले आहे. मात्र गोवा सरकारतर्फे कामगारांना अजूनही ३०७ रुपये किमान वेतन दिले जात आहे. कामगारमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असेही पुती गावकर यावेळी म्हणाले.