भटक्या प्राण्यांची ‘बडदास्त’ नको!

खरे तर कुत्री किंवा गुरे हे पाळीव प्राणी. मात्र हे प्राणी मोकाट सोडण्यासाठीच असतात, असा समज बळावतो आहे. कुत्री आणि गुरांमुळे अपघात होऊन शेकडो जण जायबंदी होतात. काहींना प्राणही गमवावे लागतात. याला जबाबदार त्या प्राण्यांच्या मालकांसोबतच त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेणारे बेफिकीर लोकही आहेत.

Story: विचारचक्र । सचिन खुटवळकर |
30th November 2022, 11:28 pm
भटक्या प्राण्यांची ‘बडदास्त’ नको!

राज्यात गेल्या आठवड्यात भटके कुत्रे आणि गुरांमुळे दोघांना जीव गमवावा लागला. गवळीवाडा - बेतूल, केपे येथे दुचाकीसमोर एक कुत्रा अचानक आला आणि चालकाने ब्रेक दाबला. पण त्याच्या मागे बसलेली त्याची आई उसळून रस्त्यावर पडली आणि डोक्याला मार लागून तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत कुंकळ्ळीतील एक उद्योजक दुचाकीने घरी परतत असताना अचानक एका गुराने धडक दिल्याने ते रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध झाले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. भटक्या प्राण्यांमुळे या दोघांना हकनाक जीव गमवावा लागला. 

खरे तर कुत्री किंवा गुरे ही पाळीव प्राणी. मात्र हे प्राणी मोकाट सोडण्यासाठीच असतात, असा समज बळावतो आहे. अनेक जण मनाला येईल तेव्हा कुत्र्यांना आणि गुरांना मोकळी सोडून देतात. पर्वरीसारख्या शहरी भागात तर काही महाभाग भल्या पहाटे आणि कातरवेळी आपली गुरे शोधून त्यांचे दूध काढून नेतात. ही गुरे भररस्त्यात अगदी हायवेवरसुद्धा ठाण मांडून वेळीअवेळी बसलेली आढळतात. जे भटक्या गुरांच्या बाबतीत, तेच कुत्र्यांच्याही बाबतीत. अनेकांना कुत्र्यांची पिल्ले पाळायचा मोह होतो. मात्र जसजशी ती मोठी होतात, तसतसा त्यांचा त्यातील रस कमी होत जाताे व ते कुत्र्यांना मोकळे सोडू लागतात. कालांतराने ही कुत्री बेवारस बनतात. मग ती जगतात कशी? याचे उत्तर आपल्याच समाजातील काही बेजबाबदार लोक देऊ शकतात. भूतदयेपोटी अनेक जण बेवारशी कुत्र्यांना खाऊ घालतात. अनेक जण हे काम उत्साहाने आणि श्रद्धेने करतात. बेवारशी कुत्र्यांना खाऊ घालून म्हणे पुण्य मिळते! पण हे करत असताना या कुत्र्यांमुळे पादचाऱ्यांना आणि दुचाकीस्वारांना काय त्रास होतो, याचा मुळीच विचार करत नाहीत. कुत्री आणि गुरांमुळे अपघात होऊन शेकडो जण जायबंदी होतात. काहींना प्राणही गमवावे लागतात. याला जबाबदार हे बेफिकीर लोक आहेत. उघड्यावर अन्नपदार्थ फेकणारे गाडेवाले, रेस्टॉरंटमालक आणि काही नागरिकही या स्थितीला तितकेच जबाबदार आहेत.   

पशुसंवर्धन खात्याच्या निरीक्षणानुसार, राज्यात गेल्या साडेआठ वर्षांत भटक्या कुत्र्यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत ६ टक्क्यांनी वाढली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत भटक्या कुत्र्यांची संख्या ९ टक्के असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. याचा अर्थ भटक्या कुत्र्यांची संख्या दीड लाखाच्या आसपास आहे. म्हणजेच सरकार राबवत असलेली निर्बिजीकरणाची मोहीम सपशेल फसलेली आहे. पण पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. आगुस्तिन मिस्किता यांच्या मते, पाळीव कुत्र्यांमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते. पाळीव कुत्र्यांचे १०० टक्के निर्बिजीकरण होत नसल्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणणे शक्य झालेले नाही. भटकी गुरे आणि कुत्र्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी वर्षाकाठी ​जवळपास २० कोटी रुपये खर्च येत असूनही या समस्येवर तोडगा निघत नाही, अशी कबुलीच पशुसंवर्धन खात्याने दिली आहे. स्मार्ट सीटीचे तुणतुणे सातत्याने वाजत असणाऱ्या पणजीसारख्या शहरातही भटक्या कुत्र्यांची स्थिती हाताबाहेर गेलेली आहे.          

गेल्या सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. भटक्या कुत्र्याने एखाद्या व्यक्तीला चावा घेतला, तर रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालणाऱ्याला त्यासाठी जबाबदार धरले जाईल, अशा स्पष्ट शब्दांत कोर्टाने निरीक्षण नोंदविले आहे. इतकेच नव्हे, तर भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यास सदर रुग्णाच्या उपचाराचा खर्चही कुत्र्यांना खायला देणाऱ्यांंनी उचलावा, असे न्यायालयाने नूमद केले आहे. विशेष म्हणजे गोव्याचे रॅबिज प्रतिबंधक मॉडेल राबविण्यास उत्सुक असलेल्या केरळमधून ही याचिका दाखल करण्यात आली होती. केरळमध्ये ऑगस्ट महिन्यात कुत्र्याच्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला. यात एका १२ वर्षीय मुलीसह महिलांचा सामावेश आहे. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिल्यामुळे श्वानप्रेमींनी आता तरी आपल्या भूतदयेला थोडी मुरड घालायला हवी . मुक्या प्राण्यांना खाऊ घालणे ही गोष्ट स्वागतार्हच, परंतु त्यामुळे सर्वसामान्यांना समस्या निर्माण होऊ नये. भटक्या कुत्र्यांमुळे चोऱ्यांचे प्रकार घडत नसल्याचा काही जण दावा करतात. त्यात तथ्य असले, तरी अशा कुत्र्यांमुळे ज्यांना त्रास सहन करावा लागतो, त्यांचाही विचार व्हायला हवा. श्वानप्रेम खूपच उफाळून येत असेल, तर स्वत:च्या खासगी जागेत त्यांचे पालनपोषण करण्याची तयारी ठेवणे याेग्य. भटक्या कुत्र्यांना दोन वेळचे अन्न घालून इतरांचा जीव धोक्यात घालणे चुकीचेच आहे.                   

हाच प्रकार गुरांच्या बाबतीतही दिसून येतो. भरदिवसा आणि रात्रीही गुरांमुळे अपघात होऊन जायबंदी झालेल्यांची मोजदाद सरकारी​ यंत्रणेने करून पहायला हवी, म्हणजे या समस्येची दाहकता लक्षात येईल. रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी गुरे अतिशय धोकादायक ठरतात. गुरांनाही अपघातांमुळे इजा होतात. दुचाकीची धडक बसली असेल तर गुरांचे किरकोळ दुखापतीवर निभावले जाते आणि दुचाकीस्वार जबर जखमी होतो. मात्र वाहन मोठे असेल, तर गुरांचा हकनाक जीव जातो. अशा घटना घडल्यानंतर आपण माणुसकीच्या नात्याने हळहळतो. मात्र त्यावर ताेडगा काढण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही. राज्य सरकारतर्फे भटक्या गुरांची समस्या निकाली काढण्यासाठी निधी पुरवला जातो. त्याला स्थानिक स्वराज्य संस्था किती प्रतिसाद देतात, ते रस्त्यावरची भटकी गुरे पाहिल्यानंतर कळून येते. दक्षिण गोव्यातील एका नगरपालिकेने तर अशा गुरांच्या देखभालीची ब्याद टाळण्यासाठी सरकारी निधीतून मिळणारे वाहन घेण्याबाबत चालढकल चालवली आहे. त्यासाठी लोकांनी पाठपुरावा करूनही पालिका मंडळ त्यात स्वारस्य दाखवत नाही. ही स्थिती बदलण्याची गरज आहे. गुरांची शीरगणती करण्यासह त्यांच्या मालकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे धाडस सरकारी यंत्रणेने दाखवायला हवे. 

जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा आपल्याला वैयक्तिक पातळीवर त्रास होत नाही, तोपर्यंत त्यातील गांभीर्य कोणाच्याच लक्षात येत नाही. पण इतरांच्या वेदना पाहून आपण नक्कीच शहाणे होऊ शकतो. तो शहाणपणा भटक्या प्राण्यांवर भूतदया दाखवणाऱ्यांनी शिकण्याची गरज आहे. त्यातून काही प्रमाणात तरी या समस्येवर तोडगा निघू शकतो.