अशा श्रद्धा आणखी नकोत...

श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटले आणि काळजाला हादरवणार्‍या या घटनेमुळे एकच संतापाची तीव्र लाट जनमानसात उमटली. प्रसारमाध्यमांवरील या घटनेच्या बातम्या पाहून अनेकांनी आपला संताप वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्त केला. आपल्या संतप्त प्रतिक्रिया देत श्रद्धाला श्रद्धांजली दिलीच पण या तिच्या विचारसरणीला, आफताबने केलेल्या क्रूर हत्येच्या विचारसरणीला श्रद्धांजली कधी मिळणार? हा अनुत्तरित प्रश्न आहे.

Story: मर्मबंधातील ठेव | कविता प्रणीत आमोणकर |
26th November 2022, 12:45 am
अशा श्रद्धा आणखी नकोत...

श्रद्धा वालकर आणि आफताब हे दोघे लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्रित राहत असताना त्याने श्रद्धाचा प्रथम गळा दाबून खून केला आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते मेहरोलीच्या जंगलात फेकून दिले. किती भयावह प्रकार आहे हा. अशा घटना पाहता आज मरण इतके स्वस्त झाले आहे का? असा प्रश्न साहजिकच पडतो.

अशा अनेक श्रद्धा कित्येक आफताबच्या वासनेला, त्याच्या कौर्याला नाहक बळी पडल्या आहेत. कोणतीही स्त्री ही प्रथम कोणाची तरी मुलगी असते, बहीण असते. आपल्याच मुलीची अशी निर्दयतेने हत्या करून तिच्या मृतदेहाची झालेली अशी परवड पाहताना तिच्या कुटुंबीयांची, तिच्या मित्रपरिवाराची परिस्थिती काय झाली असेल? श्रद्धाला मरतेवेळी ज्या यातना सहन कराव्या लागल्या, त्याचे दु:ख कोणाला कळणार?

श्रद्धा हत्या अतिशय क्रूरपणे करण्यात आली. समस्त मानवजातीला काळीमा फासणारी ही घटना आहे. या आधीही अशाच क्रूरपणे कित्येक मुलींची हत्या सुनियोजितपणे करण्यात आलेल्या आहे. समाजातील निकिता, अंकिता, निधी, काजल, शिवानी, मानसी, नैना, एकता, प्रिया, दीक्षा, बबली, वर्षा, प्रिया, तनिष्का यांना एसिड अंगावर फेकून, गळा कापून आदी अत्यंत निर्दयपणे मारण्यात आले आहे. या सर्वांची हत्या पाहता जगात मानवता आता शिल्लक उरली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.

स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली आता जी मुक्ताफळे उधळली जात आहेत, त्याचा गैरफायदाही होताना आज स्पष्ट दिसतो आहे. या जगात असे क्रूर लांडगे वावरत असतात आपल्या आजूबाजूला असलेल्या कोवळ्या मुली किंवा समाजात एकट्या पाडलेल्या स्त्रीचा शोध घेत असतात. त्यांच्या वखवखलेल्या नजरेला असे एखादे सावज दिसल्यास त्यांची पाशवी नजर चाळवते आणि मग तिच्या शरीराचा उपभोग घेऊन मग सापळा रचून थंड डोक्याने सुनियोजितपणे तिच्या हत्येचा कट रचला जातो.

समाजात वावरणारे हे पाशवी लांडगे इतके करून ही थांबत नाहीत. हत्या केलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना त्या कौर्यालाही लाजवेल अशातर्‍हेने त्या मृतदेहाची विटंबना केली जाते, ते पाहताना अशा नराधमांना शिक्षा देताना अजिबात दयामाया न दाखवता त्यांनाही अशाच पद्धतीने क्रूर शिक्षा द्यावी, असे खरेतर प्रत्येकाच्या मनात असते. परंतु हे उघड बोलू धजावण्यास कोणी पुढे नाही.

या नराधमांची ही अशी मानवतेला काळीमा फासणारी कृत्ये उजेडात आल्यावर असे भयावह प्रकार घडत आहेत, हे आजच्या तरुण मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. स्त्री स्वातंत्र्याच्या वल्गना न करता आपल्या सुरक्षिततेची काळजी घेताना, समाजात वावरताना आपले डोके ठिकाणावर ठेवून वागावे. प्रेम हे आंधळे असते असे म्हणतात. त्यानुसार प्रेमात आंधळे होऊन खाईत पडण्यापेक्षा आपल्या सोबत घडणार्‍या रोजच्या घडामोडी आपल्या कुटुंबीयांसोबत शेअर कराव्यात. आंधळ्या प्रेमाला सामोरे जाऊन आपल्या शरीराची कुतरओढ न करता व्यावहारिक नजरेने जगाकडे पाहायला शिकावे.

पालकांनी ही आपल्या मुलींवर तितक्याच जागरुकतेने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आपल्या निरागस स्वभावाच्या मुलीचा कोणी हैवान फायदा तर घेत नाही ना किंवा आपली मुलगी एखाद्या लांडग्याच्या बुभुक्षित वासनेला बळी तर पडली जात नाही ना, यासाठी आपल्या मुलींकडे रोज संवाद साधताना तिच्याशी दिवसभरात काय काय घडले याची नोंद घेताना तिच्या हातून काही चुकीचे घडल्याचे लक्षात आल्यास तिला वेळेप्रसंगी रागवा, तिला समजावून सांगा. आपले संस्कार, शिस्त, परंपरा, कुटुंब याचे महत्त्व तिला पटवून द्या. ती जर चुकीच्या रस्त्यावर जात असेल, तर तिला समजावून सांगा. कारण प्रकरण पुढे गेल्यावर आपल्या मुलीला फ्रीजमध्ये ३५ तुकड्यात पाहायला कोणत्याही आई वडिलांना किंवा तिच्या कुटुंबीयांना आवडणार नाही.

कारण प्रत्येक आई वडिलांची मुलगी ही हिर्‍यासारखी मौल्यवान आहे. आपल्याकडे हिरा असतो, तो आपण असा बाहेर कुठेही ठेवत नाही. त्या हिर्‍याला आपण तिजोरीत ठेवतो. का? तर तो मौल्यवान आहे म्हणून... त्यावर कोणा चोराची, नजर पडू नये म्हणून. प्रत्येक आई वडिलांची मुलगी ही सुद्धा त्या हिर्‍यासारखीच मौल्यवान आहे. तिचे मोल जपण्यासाठी तिलासुद्धा आपण असेच जपायला हवे. हो ना ?