हनीप्रीतकडे डेरा सच्चा सौदाचा एकाधिकार

Story: राज्यरंग | प्रसन्ना कोचरेकर |
04th October 2022, 12:34 am
हनीप्रीतकडे डेरा सच्चा सौदाचा एकाधिकार

राम रहीमचे संपूर्ण कुटुंब परदेशात स्थायिक झाल्याने हनीप्रीतला आता हरियाणातील सिरसा येथील डेरा सच्चा सौदाचा एकाधिकार प्राप्त झाला आहे. राम रहीमच्या दोन मुली अमरप्रीत आणि चरणप्रीत कौर आणि मुलगा जसमीत कुटुंबासह लंडनमध्ये स्थायिक झाले आहेत. डेराप्रमुखाची आई नसीब कौर आणि पत्नी हरजित कौर मात्र भारतातच राहणार आहेत. त्यामुळे हनीप्रीत आता डेरा सच्चा सौदाचा कारभार पाहणार आहे.             

डेरा सच्चा सौदाची स्थापना १९४८ मध्ये शाह मस्ताना यांनी केली होती. आज पूर्ण देशात यांचे ५० पेक्षा जास्त आश्रम आणि लाखो अनुयायी आहेत. डेराचे प्रमुख कार्य हे सामाजिक, रक्तदान आणि गरीबांना मदत करणे हे होते. डेराप्रमुख झाल्यानंतर राम रहीम मात्र अनेक विवादांत फसले होते.                   

राम रहीमच्या डेरा सच्चा सौदाची अब्जावधी रुपयांची मालमत्ता ट्रस्टच्या नावावर आहे. सिरसा येथेच डेऱ्याजवळ सुमारे ९०० एकर जमीन आहे. याशिवाय, पूर्ण देशभरात मालमत्ता आणि निवासी खोल्या आहेत. राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर डेरा प्रमुखाची मुले, मुली आणि जावई यांच्यावर कोणतीही जबाबदारी नव्हती.                        

राम रहीम २०१७ पासून साध्वी लैंगिक शोषण प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पत्रकार छत्रपती आणि रणजित हत्या प्रकरणातही तो दोषी ठरला आहे. यंदाच्या पंजाब निवडणुकीपूर्वी ७ फेब्रुवारीला राम रहीमला २१ दिवसांची सुटी मिळाली होती. याच काळात बदलांची संपूर्ण स्क्रिप्ट लिहिली गेली. यानंतर २७ जून रोजी राम रहीमला तीस दिवसांचा पॅरोल देण्यात आला आणि तो उत्तर प्रदेशातील बागपत आश्रमात राहिला. त्याच्यासोबत हनीप्रीतही होती. डेराचा कारभार तिच्याकडे येणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. डेरा प्रमुखाचे कुटुंब परदेशात गेल्यानंतर आता हनीप्रीत ही डेरा प्रमुखाची सर्वात जवळची आहे. राम रहीमचे कुटुंब परदेशात स्थायिक होण्याचे कारण हनीप्रीतसोबत कुटुंबातील सदस्यांचे मतभेद होते. काही काळापूर्वी कुटुंबाने अनुयायांना एक पत्रही जारी केले होते. परमार्थ (डेरा सच्चा सौदामध्ये उभारण्यात येणारी देणगी) त्यांच्या नावावर गोळा केले जात असल्याचे कुटुंबियांना समजले होते. कुटुंबाच्या नावाने कोणी देणगी जमा करत असेल तर त्याची माहिती कुटुंबाला द्यावी, असे आवाहन कुटुंबीयांनी पत्रात केले होते. २०१६ मध्ये दोषी ठरल्यानंतर राम रहीमच्या कुटुंबीयांनी प्रथमच त्यांच्या अनुयायांना असे पत्र जारी केले होते. त्यांच्या नावाचा गैरवापर थांबलाच पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते.             

राम रहीम यांनी अनुयायींना पत्र लिहिले होते. पत्रात डेरा व्यवस्थापनात काही बदल झाल्याची चर्चा होती. हनीप्रीतच्या समर्थकांना नवी जबाबदारी देण्यात आली होती. सर्व सेवादार, अॅडमिन ब्लॉक सेवेदार, जसमीत, चरणप्रीत, हनीप्रीत, अमरप्रीत आमच्या शब्दांचे पालन करतात. तुम्ही कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार आता हनीप्रीत डेराचा कारभार पाहणार आहे.