‘प्रचंड’ हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात दाखल

राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत १० हेलिकाॅप्टरची तुकडी रवाना

|
04th October 2022, 12:30 Hrs
‘प्रचंड’ हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात दाखल

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

दिल्ली : भारतीय हवाई दलाला नवीन ताकद मिळाली असून भारतीय हवाई दलात स्वदेशी बनावटीचे लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच ) दाखल झाले आहे. ‘प्रचंड’ असे या हेलिकॉप्टरचे नाव आहे. राजस्थानमधील जोधपूर येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या १० हेलिकॉप्टरची पहिली तुकडी भारतीय हवाई दलात सामील झाली आहे.

यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी म्हणाले की, अनेक दिवसांपासून या हेलिकॉप्टरची प्रतिक्षा होती. १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धातही या हेलिकॉप्टरची कमतरता भासली. ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर हे दोन दशके करण्यात आलेल्या संशोधनातून निर्माण झाले आहे. शत्रूला चकमा देण्यासाठी हेलिकॉप्टर सक्षम आहे. मोठ्या प्रमाणात दारुगोळा घेऊन ते तत्काळ घटनास्थळी दाखल होऊ शकते, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

‘प्रचंड’ हेलिकॉप्टरची वैशिष्टे

प्रचंड हेलिकॉप्टरची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने केली आहे. अन्य लढाऊ हेलिकॉप्टरच्या तुलनेत प्रचंड हलक्या वजनाचे आहे. त्याचे वजन ५.८ टन एवढे असून, अनेक हत्यांरासह त्याचे परिक्षण करण्यात आले आहे. हे हेलिकॉप्टरचा वेग ताशी २७० किलोमीटर असा आहे. त्याची लांबी ५१.१ फूट असून, उंची १५.५ फूट आहे. प्रचंड हेलिकॉप्टरमध्ये ‘स्टेल्थ’ नावाची आधुनिक प्रणाली आहे. त्यामाध्यमातून शत्रूच्या रडारवर देखील हे हेलिकॉप्टर दिसू शकत नाही. त्याचप्रमाणे रात्रीच्यावेळी हल्ला करण्याची क्षमताही यात आहे. प्रचंड हेलिकॉप्टर १६,४०० फूट उंचीवरून सुद्धा शत्रूवर हल्ला करू शकते.