घर फोडून बाहेर येताच अट्टल चोरट्यांच्या हातात बेड्या

म्हापशात दोघा चोरांना अटक; गस्तीवरील पोलिसांची कामगिरी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th October 2022, 12:03 am
घर फोडून बाहेर येताच अट्टल चोरट्यांच्या हातात बेड्या

आकय येथील घरफोडी प्रकरणात अटक केलेल्या संशयितांसोबत पोलीस निरीक्षक परेश नाईक व पोलीस कर्मचारी.

म्हापसा : आकय-पेडे येथील डॉ. पुरूषोत्तम पेडणेकर यांचे बंद घर फोडून आतील मुद्देमाल चोरून बाहेर पडलेल्या दोन चोरट्यांना गस्तीवरील पोलिसांनी रंगेहाथ पकडले. मूळ कर्नाटक येथील साहील इसाक सयानावाले (२२, रा. करासवाडा) व मूळ सांगली येथील रझाक अस्लाम मुजावर (२३, रा. तीनमाड कामुर्ली) अशी संशयितांची नावे आहेत. चोरीची ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली होती.

डॉ. पेडणेकर हे घर बंद करून पत्नीसोबत विदेशात पर्यटनासाठी गेले होते. रविवारी पहाटे या बंद घराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून संशयित घरात घुसले होते. घरातील कपाटात एक पाऊच होता. त्यामध्ये बनावट दागिने होते. तीन बांगड्या, एक साखळी, एक हार, एक घड्याळ, एक चाव्यांचा गुच्छ व एक रूद्राक्ष तसेच दोनशे रुपयांची रोकड होती. हा सर्व मुद्देमाल उचलून चोरटे आपल्या दुचाकीजवळ आले होते. त्याचवेळी गस्तीवरील पोलिसांनी त्यांना पकडले.
पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळील बॅगमध्ये स्क्रू ड्रायव्हर, दरवाजांवरील कुलपाच्या कड्या व हूक तोडण्यासाठी वापरली जाणारी लोखंडी छिन्नी व इतर अवजारे, चप्पलाच्या दोन जोड्या, कापडी हातमोजे सापडले. घरफोडीसाठी वापरल्या जाणाऱ्या या साहित्यासोबत घरातून चोरलेला मुद्देमाल सापडला.
त्यानंतर रात्री डॉ. पेडणेकर यांच्या चिखली-वास्को येथील मुलीने म्हापसा पोलीस स्थानकात येऊन वडिलांचे घर फोडल्याची रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही संशयित चोरट्यांच्या विरोधात घरफोडी व चोरी केल्याप्रकरणी भा.दं.सं.च्या ४५४, ४५७ व ३८० कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली.
पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौरव नाईक, हवालदार सुशांत चाडणकर, कॉन्सटेबल राजेश कांदोळकर, प्रकाश पोळेकर, अभिषेक कासार, अक्षय पाटील व आनंद राठोड यांनी ही कामगिरी केली.

संशयित साहील व रझाक हे दोघेही अट्टल चोरटे अाहेत. राज्यातील अनेक भागांतील घरफोडींमध्ये त्यांचा हात असल्याचे पोलीस चौकशीतून स्पष्ट झाले आहे. दक्षिण गोव्यासह उत्तर गोव्यातील पोलीस त्यांच्या भागातील चोऱ्यांच्या प्रकरणांत संशयितांना ताब्यात घेणार आहेत.