आशिया चषक : भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय

मलेशियाचा ३० धावांनी पराभव


03rd October 2022, 11:47 pm
आशिया चषक : भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
सिल्हेट :
महिला आशिया चषकात भारतीय महिला संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. सिल्हेट आऊटर क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारताने मलेशियाचा ३० धावांनी पराभव केला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय महिला संघाने २० षटकांत चार विकेट्स गमावून मलेशियासमोर १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशियाने ५.२ षटकांत २ गडी गमावून १६ धावा केल्या. यानंतर पावसामुळे सामना होऊ शकला नाही आणि भारतानं डकवर्थ लुईसच्या नियमानुसार हा सामना ३० धावांनी जिंकला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताने २० षटकांत ४ गडी गमावून मलेशियासमोर बलाढ्य १८१ धावांचे लक्ष्य ठेवले. भारतकडून सलामीवीर सबभीनें मेघनाने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. शेफाली वर्माने ४६ धावांचे योगदान दिले. तर, ऋचा घोषने १९ चेंडूत ३३ धावांची स्फोटक खेळी केली. मलेशियाकडून दुराईसिंघम आणि नूर दानिया यांना प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले.
भारताची भेदक गोलंदाजी
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मलेशियाच्या संघाची सुरुवात खराब झाली. मलेशियाच्या संघाने पॉवर प्लेमध्ये दोन विकेट्स गमावल्या. कर्णधार दुराईसिंघम (० धाव) आणि वान जूलिया (१ धाव) स्वस्तात बाद झाले. मलेशियाचा संघ ५.२ षटकांत १६ धावांवर असताना पावसाने सुरुवात केली. त्यानंतर सामना थांबवण्यात आला. मलेशियाची मास एलिसा नाबाद १४ आणि एल्सा हंटर नाबाद एक धावा करून पव्हेलियनमध्ये परतली. भारताकडून दीप्ती शर्मा आणि राजेश्वर गायकवाड यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताचा विजय
पावसामुळे सामन्याच्या निकाल लागू शकला नाही. ज्यामुळे डेकवर्थ लुईसच्या नियमांतर्गत भारताला विजयी घोषित करण्यात आले. आशिया चषकात भारताची सुरुवात चांगली झाली. या स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. या स्पर्धेत पुढील सामन्यांतही भारतीय महिला संघ चांगली कामगरी बजावेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ४ बाद १८१ धावा
मलेशिया : ५.२ षटकांत २ बाद १६ धावा (डकवर्थ लुईस नियम)
सामनावीर : सबभीनें मेघना