ग्राम स्वराज संकल्पनेतूनच ‘स्वयंपूर्ण गोवा’चा जन्म

मुख्यमंत्री डॉ. सावंत : जयंतीनिमित्त महात्मा गांधींना आदरांजली


03rd October 2022, 12:40 am
ग्राम स्वराज संकल्पनेतूनच ‘स्वयंपूर्ण गोवा’चा जन्म

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘ग्राम स्वराज’ संकल्पना मांडली होती. गावाची प्रगती झाली तरच राष्ट्राचीही प्रगती होते, असे त्यांचे ठाम मत होते. या ग्राम स्वराज संकल्पनेतूनच ‘स्वयंपूर्ण गोवा’ मोहिमेचा जन्म झाला आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. जुने गोवा येथे गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सर्वप्रथम त्यांनी गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. त्यानंतर त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांच्यासह मान्यवर उप‌स्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रविवारी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गांधी जयंतीनिमित्तचा मुख्य सोहळा जुने गोवे येथे पार पडला.

कार्यक्रमात सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यासाठी भगवद् गीता, कुराण आणि बायबल या धार्मिक ग्रंथांतील श्लोकांचे वाचन झाले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, देशात भेदभाव नसेल, संघटितपणा असेल तर शांती आणि प्रगती सहजसाध्य होऊ शकते, असे महात्मा गांधींचे मत होते. समाज एकसंध रहावा यासाठी त्यांनी जीवन वेचले. माणुसकी हाच सर्वांत मोठा धर्म आहे, असेही ते नेहमी म्हणत. महात्मा गांधी यांची शिकवण कृतीत आणली पाहिजे.

महात्मा गांधींनी स्वच्छतेचा मंत्र दिला. गांधींच्या विचारातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ मोहीम सुरू केली. गोव्यात २ ऑक्टोबर २०२० रोजी ‘स्वयंपूर्ण गोवा’ मोहीम सुरू झाली. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासह धार्मिक बंधूभाव अखंड राहावा, हे गांधींचे स्वप्न होते. दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन, स्वदेशी चळवळ, अशी बरीच आंदोलने गांधी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाली. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्यासह अनेकांनी गांधींना आपले आदर्श मानले. गांधींचे विचार आचरणात आणून देशात बंधूभाव वाढवण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

काँग्रेस पक्षातर्फे पणजीतील काँग्रेस भवन येथे जयंतीनिमित्त महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहण्यात आली.