खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेप खंडपीठाकडून रद्द

कोलवा येथील २०१८ मधील बॅप्टिस्टो उर्फ बाटू डिकॉस्टा खून प्रकरण


03rd October 2022, 12:35 am
खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेप खंडपीठाकडून रद्द

प्रतिनिधी । गोवन वार्ता                        

पणजी : कोलवा येथील बॅप्टिस्टो उर्फ बाटू डिकॉस्टा यांचा दि. २० जानेवारी २०१८ रोजी मध्यरात्री बेतालभाटी समुद्र किनाऱ्यावर गळा कापून खून करण्यात आला होता. या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी अमन कविटीया याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द करून त्याची सुटका केली. याबाबतचा आदेश न्या. महेश सोनक आणि न्या. भारत देशपांडे या द्विसदस्यीय खंडपीठाने जारी केला आहे.                   

या प्रकरणी कोलवा पोलिसांनी १९ एप्रिल २०१८ रोजी मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपी अमन कविटीया याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार, दि. २० जानेवारी २०१८ रोजी रात्री १०.३० ते दि. २१ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ७.१५ या काळात कोलवा येथील बॅप्टिस्टो डिकॉस्टा याचा गळा कापून खून करण्यात आला होता. त्यावेळी डिकॉस्टा यांचा मोबाईल, रोख रक्कम आणि सोनसाखळी यांचीही चोरी झाल्याचे दिसून आले होते. या प्रकरणी कोलवा पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक फिलोमिना कोस्टा यांनी  प्रथम अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलिसांनी आरोपी अमन कविटीया या चालकाला अटक केली होती. या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्या. विन्सेंट डिसिल्वा यांनी दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी निवाडा जारी करून आरोपी अमन कविटीया याला दोषी ठरवून जन्मठेप आणि १ लाख रुपये दंड व इतर शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला  आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा रद्द करून त्याची सुटका केली आहे.


हेही वाचा