देशात ५जी क्रांतीचा श्रीगणेशा!

तंत्रज्ञान ही एक नशा आहे आणि त्याचा योग्य वापर व्हायला हवा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात तेव्हा त्यांनी या सेवेच्या दुसऱ्या बाजूबाबतही इशारा दिला असावा, परंतु योग्य वापर केल्यास देश एका वेगळ्याच उंचीवर नेणे शक्य आहे, हेच त्यांनी अधोरेखित केले आहे.

Story:  विचारचक्र।वामन प्रभू (लेखक ज्येष्ठ |
03rd October 2022, 12:24 Hrs
देशात ५जी क्रांतीचा श्रीगणेशा!

आज कोणत्याही शाळकरी वा महाविद्यालयीन विद्यार्थ्याला तुम्ही जीवनावश्यक वस्तूंबाबत विचाराल तर अन्न , वस्त्र आणि निवारा हे नेहमीचेच घासून गुळगुळीत झालेले उत्तर त्यांच्याकडून ऐकायला  मिळेल अशी अपेक्षा कोणी करूच नये असा हा काळ आहे. अन्न वस्त्र निवारा यास आता शंभर टक्के मोबायलचीही जोड दिली जात आहे, किंबहुना तीच आज पहिली गरज ठरू लागली आहे. बदलत्या युगाबरोबर रहायचे झाल्यास मोबाईलही आजकाल जीवनावश्यक वस्तुंमधील एक वस्तू बनली आहे हे मान्य करावेच लागेल. देशात परवा शनिवारपासून तेरा प्रमुख शहरात ५जी  सेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केल्याने एका नव्या डिजिटल युगात आपल्या देशाने प्रवेश केला आहे असे मानता येईल. देशातील ५जी  क्रांतीचा हा श्रीगणेशा आहे आणि पुढील एक दीड वर्षातच खऱ्या अर्थाने ही क्रांती पूर्ण होणार आहे.आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात भारताला अत्युच्च शिखरावर जाण्यापासून आता कोणीही रोखू शकणार नाही आणि या जागेवर आमचाच हक्क असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सेवेचा शुभारंभ करताना सांगितले, यावरूनच ही सेवा प्रत्येक क्षेत्रात भारताला नवनवे मार्ग खुले करणार हेच त्यांना अभिप्रेत आहे .

चीनसारखे काही देश वायरलेस तंत्रज्ञानाच्या सहाव्या पिढीकडे डोळे लावून बसले असताना आपल्या देशात आताच कोठे ५जी सेवा सुरू होत आहे, यावर काहीजण बोट ठेवतील हे खरे असले तरी दोन तीन दशकांआधी आपण नेमके कोठे होतो याचा विचार केल्यास ५जी  सेवेच्या शुभारंभाने आपण खूप मोठी झेप आज घेतली आहे, असाच निष्कर्ष काढावा लागेल. देशात दळणवळण क्षेत्रातील या क्रांतीमुळे नजिकच्या काळात त्याचे फार मोठे फायदे होतील  हे सांगताना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व  करेल असा जो विश्वास प्रकट केला आहे तो खूप महत्वाचा म्हणता येईल. पहिल्या टप्प्यात  मुंबई पुण्यासह अहमदाबाद,  बेंगळुरू, चंदिगढ,  दिल्ली, चेन्नई,  हैदराबादसह तेरा प्रमुख शहरात ही सेवा सुरू होणार असून वर्षभरातच लाख सव्वा लाख गावात ही सेवा पोचवण्याचा निर्धार केल्याने आजची युवा पिढी तर याहून अधिक काही मागत आहे असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. नव्या तंत्रज्ञानामुळे देशात शैक्षणिक क्रांतीही अपेक्षित आहे की ज्यामुळे आपण अत्युच्च शिखरावर पोचण्यास अधिकच मदत होऊ शकेल, ५जी सेवेचे होणारे फायदे आजच्या शिक्षित युवा पिढीला नव्याने सांगायची गरज आहे असे वाटत नाही, परंतु आज मिळणाऱ्या इंटरनेट सेवेचा विचार करता अपेक्षाही करता येणार नाही एवढी सुधारणा त्यात होणार 

आहे.

देशातील ग्रामीण भाग सोडाच , काही शहरांतही आज अशी परिस्थिती आहे की इंटरनेट सेवा विनाअडथळे मिळणे अत्यंत मुश्कील आहे अशावेळी आता मिळणाऱ्या सेवेच्या तुलनेत त्याच्या दहापट वेगाने इंटरनेट सेवा मिळणार असेल तर आणखी तक्रार तरी कोणी का करावी. अगदी सोप्या शब्दात  सांगायचे झाल्यास एखादा चित्रपट ५जी  सेवेमुळे अवघ्या दहा सेकंदांच्या डाऊनलोड करता येईल.  यावरूनच नव्या सेवेने होऊ घातलेल्या डिजिटल क्रांतीची कल्पना करता येईल.  येथे लक्षात घ्यायला हवे की २०१४ पर्यंत आपण मोबाईल आयात करत होतो, परंतु आठ वर्षांत भारतातील मोबाईल उत्पादनात एवढी वाढ झाली आहे की मोबाईलच्या ऊत्पादनात जगात आपला आता दुसरा क्रमांक लागतो. डिजिटल भारताचे हे मोठे यश असून नव्या सेवेमुळे शिक्षणापासून अनेक क्षेत्रात आकाशाला गवसणी घालण्याची मनीषा बाळगून आम्हाला काम करता येईल. तंत्रज्ञान ही एक नशा आहे आणि त्याचा योग्य वापर व्हायला हवा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात तेव्हा त्यांनी या सेवेच्या दुसऱ्या बाजूबाबतही इशारा दिला असावा परंतु योग्य वापर केल्यास देश एका वेगळ्याच उंचीवर नेणे शक्य आहे, हेच त्यांनी अधोरेखित केले आहे. 

५जी  सेवेच्या माध्यमातून एकविसाव्या शतकातील सर्वात मोठी शक्ती आता आपल्या हातात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. तंत्रज्ञानाच्या सहाव्या पिढीचे वेध चीनसह काही देशांना आताच लागून राहिले आहेत हे खरे असले तरी पाचव्या पिढीच्या तंत्रज्ञानाचा स्तरही बराच प्रगत असल्याने त्याचा सर्वच क्षेत्राला फायदा होणे अपेक्षित आहे. आत्मनिर्भर भारताचा शिक्काही नव्या तंत्रज्ञानावर असल्याने ५जी सेवा भारतासाठी एका नव्या पर्वाची  साद घालत आहे असेही म्हणता येईल. ५जी  ची सुरूवात ही निश्चितच  भारताच्या दूरसंचार इतिहासातील तशी साधी घटना  नाही. डिजिटल भारतासाठी विकासाच्या दिशेने थोडंसं उशिरा का होईना, उचललेले एक मोठे पाऊल आहे. आज देशात दोनशेहून अधिक मोबाईल कंपन्या आहेत, याचा विचार केल्यास हे तंत्रज्ञान आपल्याला नक्कीच इच्छित अशा जागी घेऊन जाईल अशी अपेक्षा बाळगता येईल. इलेक्ट्राॅनिक युगाच्या आरंभापासून म्हणजे मागील सुमारे चारेक दशकात सर्वाधिक वेगाने विकसित होत बदलत गेलेले उपकरण म्हणजे मोबाईल होय आणि या उपकरणासमोर सार्‍या जगाने  अक्षरशः लोटांगण घातल्याचे चित्र आज दिसते. ५जी सेवेने आता संगणकांवरही अडगळीत पडून रहाण्याची वेळ आणली आहे.