फिफा विश्वचषकासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावावी


02nd October 2022, 10:39 pm
फिफा विश्वचषकासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावावी

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : देशात ११ ऑक्टोबरपासून फिफाच्या १७ वर्षांखालील महिलांचा फुटबॉल विश्वचषक खेळवला जाणार आहे. गोव्यातही काही सामने आयोजित करण्यात आले आहेत. या सामन्यांसाठी विद्यार्थी, युवक व युवतींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावावी असे आवाहन क्रीडा खात्याचे संचालक अजय गावडे यांनी केले आहे.

शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत अजय गावडे बोलत होते. स्पर्धेचे उद्घाटन भुवनेश्वर येथे होणार आहे. अंतिम सामना नवी मुंबई येथे होणार आहे. राज्यात स्पर्धेच्या ठिकाणांसह अॅथलेटिक मैदान बांबोळी, बाणावली फुटबॉल मैदान व टिळक मैदान वाडे, मुरगाव या ठिकाणी सराव केला जाणार आहे. स्पर्धकांची राहण्याची व्यवस्था झाली आहे. या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर राज्यात २ कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते. जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रमही राबविले गेले आहेत, असे गावडे म्हणाले.

२०१७ मध्ये १७ वर्षांखालील पुरुषांचा विश्वचषक गोव्यात झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा ही संधी मिळाली आहे. यानिमित्ताने राज्यात फिफाकडून ८ हायब्रीड पीच तयार करून दिले गेले आहेत. ८ देशांचे संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी राज्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले. सर्वांना सामने पाहता येणार असून फिफाकडून तिकीट विक्री सुरु झाली आहे असेही गावडे म्हणाले. या स्पर्धेसाठी जवळपास ३ कोटी खर्च आला आहे, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेसाठी प्रशिक्षण संचालक अर्जुन पुरस्कार विजेते ब्रुनो कुतिन्हो व फिफाचे प्रकल्प संचालक अंकुश अरोरा उपस्थित होते.

या दिवशी होणार सामने

१० ऑक्टोबर रोजी श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर राज्यशासनातर्फे स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. दि. ११, १२, १४, १५, १७, १८ रोजी सामने होतील. २२ रोजी उपांत्यपूर्व व २६ रोजी उपांत्य फेरी होणार आहे. दररोज सायंकाळी ४.३० वाजता व रात्री ८ वाजता सामने होणार आहेत. 

उत्तर गोव्यातील विद्यार्थ्यांना सायंकाळच्या व दक्षिण गोव्यातील आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना रात्रीच्या सामन्यासाठी आणले जाणार आहे. प्रत्येक सामन्याला किमान ५-६ हजार विद्यार्थी उपस्थित राहतील अशी माहिती अजय गावडे यांनी दिली.