चेडवा..समईतल्या ज्योती

गुलबीच्या वडिलांनी तिला जवळ घेतलं. तिच्या केसांवरून हात फिरवीत म्हणाले, "बाबा, इत्तेत्ते नाच रे मोरा म्हना ना, म्हननारा माजा गुलब्या केदा मोठा झाला. वयानेच नाय तर इचारांनीव मोठा झाला. किती ती काळजी आवशीबापाशीची माज्या चेडवांका.

Story: गजाल | गीता गरुड |
01st October 2022, 10:33 Hrs
चेडवा..समईतल्या ज्योती

पहाट होत आली तशी मागीलदारच्या घुडासून कोंबड्यांची खुडबुड सुरू झाली. थोरला कोंबडा मान ताठ करून बांग देऊ लागला. गुलबीने बांग ऐकू येऊ नये म्हणून गोधडी डोक्यापर्यंत ओढून घेतली.

गुलबीची आई, सीताई मात्र लगबगीने उठली होती. आज तिची थोरली लेक नि जावई येणार होते आणि तिची दोन वर्षांची नात येणार होती. सीताईने भराभरा अंथरुणाच्या घड्या घालून फळकुटावर रचून ठेवल्या. 

"गुलबी बाय उठ आता, ताई येया झाली. पावनामानूस काय म्हणील!" असं गुलबीला ओरडत ती आपल्या कामाला लागली. सुर्याची कोवळी किरणं वळईत आली तशी गुलबी कंटाळतच उठली. पण मग ताई, भावोजी आणि चिंगी येणार हे ध्यानात येताच ती खुदकन हसली.

अंथरुणा पांघरुणाची घडी करून गुलबी मागीलदारी गेली. घुडाचं दार उघडून तिने एकेक झाप उघडताच कोंबड्या कल कल कल कल करत बाहेरच्या दिशेने पटापटा चालत सुटल्या. "जशा काय हफिसात जाव्क ट्रेन पकडूक धावतहत.” गुलबी कंबरेवर हात ठेवत म्हणाली. थोरला कोंबडा कठड्यावर चढला आणि सारं अंग ताठवून त्याने एखादी लकेर सोडावी तशी बांग दिली. 

तिथेच बाजूला ठेवलेल्या डालड्याच्या डब्यातली कणी तिने मुठभर घेऊन मागील बाजूस फेकली. कोंबड्या नि पिल्लं त्या विखुरलेल्या कण्या वेचू लागली. कोंबडा अजून इथेतिथे उभा राहून अंग ताठ करून बांग देत हिंडत होता.

 गुलबी पाणचुलीजवळ गेली. तिथे अंगाची गुठली करून बसलेली भाटी अंग झाडीत बाहेर आली. थोडीशी कुरकुरली. आळस देण्यासाठी तिने पाठ उंचावून कमान केली. गुलबीने रखा बाजूला करून चुलीत दोन लाकडं, गोवऱ्या सारल्या. जरासं घासलेट त्यावर ओतून पेटती माचीसची काडी त्यात टाकली नि फुंकणीने आग फुंकू लागली. लाकडातसून ज्वाळा येऊ लागल्या तशी भाटी तिच्या पायापाशी जावून बसली. "काय गो, भायर जा वायच. चार पावला फिरान ये. तवसर न्हाउन घितय. जा वाड्यात आई, चंद्रीचा दूध काढीत आसतली. आई दुधाची धार सोडतली तुझे तोंडात." असं म्हणताच भाटी वाड्याकडे पळाली. पाणी तापेपर्यंत गुलबीने वाडवण घेऊन मागील दार झळझळीत केलं. घुड साफसुफ केलं नि दांडीवरलं टॉवेल, म्याक्सी नेऊन मोरीत भिताडावर ठेवली. बादलीत तपेल्यातलं हुनहुनीत पणी ओतून घेतलं नि अंग ओलं केलं. हमामाची हिरवी वडी ती गोऱ्यापान अंगावर फिरवू लागली.

"आवर गो बाय लौकर. तायग्या येऊ झाला." असं ओरडत सीताई लगबगीने स्वैंपाकघरात गेली. वायलावर तिने दूधाचा टोप तापत ठेवला. चहाला आधण ठेवलं. स्टोव्ह पेटवून त्यावर बिडा ठेवला नि घावणे काढायला बसली. पांढरेशुभ्र सच्छिद्र घावणे तिच्या तायग्याचे खूप आवडीचे त्यासोबत एकीकडे नारळ खवून तिने दूध काढलं त्याला गुळ लावलं तोवर गुलबीने आपले कपडे वाळत घातले नि आईचं लुगडं वयच्या दांड्यांना लावलं. 

गुलबीचे वडील चार कापायला गेले होते. गुलबीने देवपूजा केली.  माटवाला लोंबकळत असलेली दोडकी काढून आणली. ती स्वच्छ धुऊन चिरली. सिताईने ती फोडणीला टाकली नि डाळ उकडत ठेवली. इतक्यात मावशी अशी साद ऐकू आली. हातातला चहाचा कप तसाच खाली ठेवत गुलबी चिंगीला घ्यायला धावली. चिंगीला उचलून घेऊन तिने तिच्या गालांचे पापे घेतले. चिंगीने तिला हातावर काढलेले मेंदीचे ठिपके दाखवले. कौतुकाने ते बघत गुलबीने विचारलं,"कोणी काढली गं?" "बाबा" आपल्या बाबांकडे बोट दाखवत चिंगी म्हणाली. 

गुलबीने वर मान करून पाहिलं. समोर भाऊजी, ताई आणि ..आणि एक उमदा हसतमुख तरुण उभा होता. 

"आई, भाऊजी नि ताई इली गे," म्हणत चिंगीला घेऊन ती मागिलदारी गेली. तिच्या पाठोपाठ ताईही मागिलदारी गेली.

"आई, रवो असा मा घरात. हातपाय धुतय नि करूक घितक. तू चिंग्याक घी आनि गुलबी तू न्हालस मा. पटकरून साडी नेस. ती आईची जांभळी साडी सोनेरी किनारीवाली बरी दिसता तुका, तीच नेस नि ह्यो अबोलीचो वळेसर माळ."

"माका कित्याक नटाक सांगतहस?" गुलबीने विचारलं.

"गे माजे आवशी, तो झिलगो इलो हा न्हय आमच्या वांगडा, तो काय हय निसती चाय पिऊक नाय इलो हा. म्हापस्यात काजीच्या बागा आसत तेचे. काजीचो कारखानो देखूल आसा. लय मोठो बिझनेसमन हा. हेंचो मित्र असा. आमच्या घराकडे इललो. हेंनी तुजो फोटू दाखवल्यानी तर पाठच सोडीना. घेऊनच चला म्हनाक लागलो पोरग्या बघुक. म्हनान इलाव आमी."

गुलबी चक्क लाजली.

"गे बाय. आता लाजीत रवा नुको." गुलबी चिंगीला आईकडे देऊन साडी नेसायला पळाली. निऱ्या घालताना तिच्या हातांची लांबसडक बोटं नुसती थरथरत होती. तिला असं बघायला म्हणून आलेलं हे पहिलंच स्थळ. मुलाला तिने ओझरतं पाहिलं होतं पण ताईने आणलाय म्हणजे गुणांनीही चांगलाच असणार, ती स्वत:च्या आरशातल्या प्रतिबिंबाला म्हणाली. केसांची सैलसर वेणी घालून तिने त्यात भरगच्च अबोलीचा वळेसर माळला नि ताईने साद घालताच बाहेर आली. वळईत खुर्चीवर भाऊजी, त्यांचा मित्र, मित्राचे वडील बसले होते. 

"गावात रव्हाचा लागतला चलात तुका बाय?" मुलाच्या वडलांनी विचारलं. गुलबी 'हो' म्हणाली

"आमचो याप बरोच आसा. तुया ग्रेजुएट आसस तवा तुकाव लिखापढीत मदत करूची लागतली. धंदो म्हटल्यार आठवडी रजा गावना नाय. काय तो इचार कर. धा मानसांचा कुटुम हा. तेंच्यात मिळूनमिसळून रव्हाचा लागतला तुका. मिया नि माझो घो ह्या गनित जमुचा नाय. सपष्ट सांगतय."

"माझेव काय अटी आसत." गुलबी बोलली तसे गुलबीचे वडील हबकले. 

पण नवरामुलगाच म्हणाला,"सांगा तुमच्या अटी."

"त्याचा काय आसा. आमचे आईबाबांका आमी दोन चेडवा. आता माझा लगीन झाल्यार तेंका घर खाऊक उठतला तवा माजा लगीन झाल्यावर माज्या सासरवाडीक ती दोघाव चारआठ दिस येऊन रवतली अधनामधना. तेंका बरा नसला तर मिया हय येतलय. तेंची देखभाल करतलय. मिया जा काय कमवतलय तेतुरलो खारीचो वाटो का होयना, माज्या मर्जीन माज्या आवशीबापाशीसाठी खर्च करतलय."

"जा बाय आता बेगिन चाय नि रवो घेऊन ये.  तुज्या सगळ्या अटी आमका मान्य आसत. पोरी, काळजाचो तुकडो आसस तू आवशीबापाशीच्या. लगीन केलस म्हनान ही जन्माची नाती थोडीच लांब व्हतत!" गुलबी सासऱ्यांचे विचार ऐकून खूष झाली आणि चहा आणायला स्वैंपाकघरात गेली.

चहा नि रवा सर्वांना देऊन ती वडिलधाऱ्यांच्या पाया पडली. पाहुणेमंडळी गेली तशी गुलबीच्या वडिलांनी तिला जवळ घेतलं. तिच्या केसांवरून हात फिरवीत म्हणाले, "बाबा, इत्तेत्ते नाच रे मोरा म्हना ना, म्हननारा माजा गुलब्या केदा मोठा झाला. वयानेच नाय तर इचारांनीव मोठा झाला. किती ती काळजी आवशीबापाशीची माज्या चेडवांका. थोरला चेडू धाकल्या भयनीसाठी स्थळ घिऊन इला तर धाकला चेडू डायरेक्ट सासऱ्यांका सांगताहा, माज्या आवशीबापाशीर मिया लक्ष ठेवतलय म्हनान.  देवा रामेश्वरा, माज्या संसाररुपी समईतल्या ज्योती अशाच तेवत रव्हांदेत रे बाबा."समाप्त