सेंटोसा

Story: प्रवास | भक्ती सरदेसाई |
01st October 2022, 10:28 pm
सेंटोसा

हॉस्टेलमध्येच नाश्ता करून आम्ही दोघंही निघालो सेंटोसाचं बेट पाहायला. शहरी मध्यभाग ते बेट असा प्रवास वीस पंचवीस मिनिटांचा होता, पण तो मेट्रो वापरल्याने अजूनही कमी झाला. सिंगापूरची मेट्रो ही मी त्या काळी अनुभवलेल्या मेट्रोंपैकी सर्वोत्तम मेट्रो सिस्टम वाटली. अगदी सरळ पद्धतीने, सोप्या शब्दात आणि रंगांचा आधार घेऊन ही सिस्टम प्रवाशांसाठी अगदी सोपी केली होती. आता मुंबई दिल्लीत सुद्धा अश्या ‘colour coded’ मेट्रो लाईन्स दिसू लागल्या आहेत. पण त्या काळी त्या नव्हत्या. त्यामुळे मला सिंगापूर मेट्रो फारच आवडली. फक्त एक ‘day pass’ काढा नि हवं तेवढं भटका. प्रवाश्यांना उपयुक्त आणि वेळ वाचवणारं याहून आणखी काय? आणि खुद्द मेट्रोस् आतून एकदम ऐसपैस, सगळ्यांना बसायची सोय असलेल्या. त्यामुळे पूर्ण सिंगापूर फिरणं अगदी सोपं झालं होतं. पण सेंटोसाची मेट्रो मात्र इतर मेट्रोंच्या तुलनेत खचाखच भरली होती. आदित्य आणि मी जागा मिळते तिथे बसलो. खरंतर सुदैवाने आम्हाला जागा मिळाली असं म्हणावं लागेल इतकी गर्दी होती. यावरूनच लक्षात येतं की सेन्टोसा किती पॉप्युलर आहे ते. त्यात आणि तो रविवार होता, त्यामुळे सगळ्यांनाच सेंटोसा गाठायचं होतं.

सेंटोसाची खासियत ही की हे पूर्ण बेट एक ‘amusement park’ आहे. इथे लोक फक्त मजा करायलाच जातात. मुलांसाठी तर हे डिस्ने वर्ल्डपेक्षा कमी नाही. भरीस इथे युनिव्हर्सल स्टुडिओ आहे. म्हणजे त्या बॅनरखाली बनल्या गेलेल्या अनेक चित्रपटांशी संबंधित वस्तू, खेळ, राईडस् इथे उपलब्ध आहेत. मघाशी म्हटल्याप्रमाणे ‘अम्युस्मेंट पार्क’. लोक आवर्जून युनिव्हर्सल स्टुडिओला भेट देतात. आपल्या आवडीच्या चित्रपटाला वेगळ्या ढंगात परत एकदा अनुभवतात. इथे उभारलेल्या त्या त्या चित्रपटाच्या सेट्समुळे स्वतः त्याच दुनियेत असल्याचा भास होतो. 

इथे आत शिरता शिरता पाहिलं डाव्या हाताला होतं ते ‘madagascar’चं जंगल. इथे त्या चित्रपटात दाखवलेली सगळी पात्रं होती. म्हणजे खरे प्राणी नाहीत हा! माणसांनी प्राण्यांचे मोठे मोठे कॉस्ट्यूम्स घातले होते. आम्हाला बघून ते आमच्या जवळ आले. आमच्या भोवती नाच केला. आम्हाला फोटो काढून दिले. अशी मजा मस्ती झाल्यानंतर त्यांनीच आम्हाला ‘जंगल राईड’कडे नेलं. काहीकाळ रांगेत उभं राहावं लागलं खरं, पण वेळ वाया गेल्यासारखं नाही वाटलं. कारण ही जंगल राईड नावाला शोभेल अशी एकदम ‘वाइल्ड’ होती. आमच्या ह्या स्टुडिओ टूरची सुरुवातच इतकी धूमधडाक्यात झाल्याने हा पूर्ण दिवस घालवायची नवी ऊर्जा मिळाल्यासारखी वाटली.

‘मादागास्कर’ झाल्यानंतर आम्ही गेलो ‘इजिप्त’मध्ये. इजिप्तचा सेट इतका हुबेहूब बांधला होता की खरोखर सिंगापूर सोडून विमान पकडून ह्या देशात आलो की काय असं वाटायला लागलं. आणि अगदी ‘mummy’ ह्या सिनेमातल्या आठवणी ताज्या करणारी राईड आम्ही अनुभवली. आजपर्यंतची सर्वात भीतीदायक राईड जर कोणती असं मला कोणी विचारलं तर मी डोळे मिटून युनिव्हर्सल स्टुडिओ मधली मम्मीवाली राईड असं सांगेन. ह्या दहा मिनिटांच्या राईडमध्ये मी खराखूरा थरार अनुभवला. आणि “परत नको” असं ह्याच राईडला परत एकदा जाऊ पाहणाऱ्या आदित्यला सांगत जुरासिक वर्ल्डकडे वळले.

ठिकठिकाणी डायनासोरच्या आकाराची अंडी दिसू लागली तसं कळलं की पोहोचलो जुरासिक पार्कला. ह्यातली काही अंडी फुटलेली होती, जणू डायनोची पिल्लं नुकतीच त्यांच्या कोषातून बाहेर निघाली असावीत. पाठीमागे धोक्याची सूचना देणारा हलका साऊन्ड इफेक्टही सुरू होता. त्यामुळे हा मांडलेला सगळा प्रपंच सजीव वाटत होता. मध्येच दूरवरून डायनोची गर्जना ऐकू आली आणि इथून पळ काढू की काय असं वाटू लागलं. जरी मनाला हा देखावा खोटा आहे हे माहीत होतं, तरीही त्यावर विश्वास ठेवणं कठीण जात होतं. इथल्या जुरासिक पार्कमध्ये राईड ऐवजी ‘सिम्युलेशन’ म्हणजे आभासी जग अनुभवायची सोय होती. त्यांचे ते ग्लासेस डोळ्यावर चढवले की आजूबाजूला डायनासोर दिसायचे. खरंच कितीतरी हजारो वर्ष मागे जाऊन पृथ्वीवरची ही जीवसृष्टी 'याची डोळां' पाहून धन्य वाटलं. 

एव्हाना दुपार झाली होती. सूर्य माथ्यावर येऊन तळपत होता. तहान भूक विसरून ह्या स्टुडीओचा आनंद घेणाऱ्या आम्हाला अचानक पोटातल्या कावळ्यांनी साद घातली आणि आम्ही आम्हाला दिलेल्या पॅंफ्लेटच्या साहाय्याने कॅन्टीन शोधून काढलं. इथे जेवण भरपूर महाग वाटलं. म्हणजे अव्वाच्या सव्वा किंमत! लोकांना आणखी दुसरा पर्याय नाही हे माहीत असल्यामुळे मनाला येईल तो दाम सांगावा! आम्हीही नाईलाजास्तव तो पंचतारांकित हॉटेलमधल्या दराचा फराळ विकत घेतला. जेवण जरी धड झालं नसलं तरीही पोटाला दोन घास आणि कोरड्या घशाला थोडंसं पाणी मिळालं. आणि आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओचा पुढचा पल्ला गाठायला निघालो. 

क्रमशः