पुण्यातील ठकसेनाला कळंगुटमध्ये बेड्या

हर्षद कोकीळला अटक : ३.७० कोटींच्या मालमत्ता हडप प्रकरणी कारवाई

Story: उमेश झर्मेकर। गोवन वार्ता |
01st October 2022, 12:36 Hrs
पुण्यातील ठकसेनाला कळंगुटमध्ये बेड्या

म्हापसा : कोंढवा पुणे येथील नंदवन इमारतीतील चार फ्लॅट बनावट कागदपत्रांद्वारे आपल्या नावे करून ३.७० कोटी रूपयांना गंडा घालण्यासह मुळ मालक आणि सरकारी यंत्रणेची फसवणूक प्रकरणातील फरारी हर्षद सतीश कोकीळ (पुणे) या मुख्य सूत्रधार ठगाला कळंगुट पोलिसांनी पकडून अटक केली. संशयित संदीप योगेश पाटील या बनावट नावाद्वारे कळंगुटमध्ये वास्तव्यास होता.

संशयितांनी मुळ मालकांचे बनावट पॅन कार्ड, आधारकार्ड तयार करून पुणे महापालिकेकडून बांधकाम चालू करण्याचा दाखला व बांधकाम पूर्ण झाल्याचा भोगवटा (ओकुपन्सी) दाखला घेऊन त्याद्वारे निबंधक कार्यालयाकडून कोंढवा पुणे येथील नंदनवन इमारतीमधील फ्लॅट आपल्या नावे करण्याचा प्रयत्न केला होता.

या फसवणूक प्रकरणी गेल्या ६ ऑगस्ट २०२२ रोजी पुणे मार्केट यार्ड पोलीस स्थानकात हवेली पुणे येथील निबंधक कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक निबंधक दत्तात्रेय सातभाई यांनी तक्रार दिली होती.

पोलिसांनी निरू अनिल गुप्ता, सुमन अशोक खंडागळे, किरण देवेंद्र चड्डा व अंजली सत्यदेव गुप्ता या संशयितांविरूद्ध भा.दं.सं.च्या ४१९, ४२०, ४६७, ४६८,, ४७१ व ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला होता.

तक्रारीनुसार नंदवन इमारतीच्या सर्व्हे क्रमांक ३३८ व ३३२ मध्ये उभारण्यात आलेल्या नंदनवन इमारतीमधील दोन फ्लॅट बनावटगिरी व बेकायदेशीररित्या विकले गेल्याचे तेथील वकील अॅड. सिद्धार्थ मोरे यांनी मालमत्तेच्या सदर विक्री पत्राच्या सत्यता पडताळणीवेळी फिर्यादींच्या निदर्शनास आणून दिले होते. या दोन फ्लॅटचे हे विक्री पत्र २४ फेब्रुवारी २०२२ रोजी झाले होते. हा प्रकार फिर्यादींना दि. ४ ऑगस्ट रोजी समजला होता. त्यानंतर दि. ५ ऑगस्ट रोजी फिर्यादी आपल्या कार्यालयात असताना कामकाज हाताळीत होते. तेव्हा अॅड. गोरख मकासरे वरील संशयित चार लोकांना घेऊन आला. नंदवन इमारतीमधीलच दुसरा व तिसऱ्या मजल्यावरील दोन फ्लॅटची विक्रीपत्र करण्यासाठी ते आले होते. या विक्रीपत्रावरील आणि अॅड. मोरे यांना पडताळणी करून नमूद केलेल्या बनावट विक्री पत्रातील नावे आणि आलेल्या नवीन विक्रीपत्र करण्यासाठी आलेल्या लोकांची नावे समान असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांना संशय येताच त्यांनी अॅड. मकासरे यांना ही माहिती दिली. त्यावेळी अॅड. मकासरे यांनी वरील विक्रीपत्रही बनावट कागदपत्राद्वारे आपणच केले असल्याचे फिर्यादींना सांगितले. त्यानंतर फिर्यादींनी पोलिसांना पाचारण आणि संशयितांविरूद्ध तक्रार दाखल केली होती. तोपर्यंत संशयित फरारी झाले होते. या प्रकरणाच्या चौकशीअंती पुणे मार्केट यार्ड पोलिसांना संशयित हर्षद सतीश कोकीळ हा या फसवणूक प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचे समजले होते. पोलिसांनी कळंगुटमध्ये हर्षद कोकीळ यास पकडून अटक केली व पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विद्यानंद आमोणकर, कॉ. अमिर गरड या कळंगुट पोलीस पथकाने ही कामगिरी केली.

संशयित गोव्यात कळंगुट येथे नाव बदलून राहत असल्याची माहिती मिळाली होती. याबाबतची कल्पना पुणे पोलिसांनी कळंगुट पोलिसांना दिली. शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी कळंगुटमध्ये झाडाझडती घेत संशयित हर्षद कोकीळ यास पकडून अटक केली व पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले.