कॉंग्रेस अध्यक्षपदाचा घोळ

खर्गे यांचे समर्थन करणार्‍यांमध्ये काही जण जी-२३ गटामधील नेते असून, पक्षात बदल करण्यासाठी नेतृत्वाने पुढाकार घ्यावा असे खरमरीत पत्र २०२० साली सोनिया गांधी यांना लिहिणारेही त्यात आहेत.

Story: अग्रलेख |
01st October 2022, 12:28 am
कॉंग्रेस अध्यक्षपदाचा घोळ

देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीचा विरोधकांचा उमेदवार ठरविण्यासाठी जो घोळ कॉंग्रेसने त्यावेळी घातला, त्याच मार्गाने जात आता हा पक्ष आपला नवा अध्यक्ष निवडण्याबाबत गोंधळ निर्माण करीत असल्याचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. आमचाच पक्ष अध्यक्षांची निवडणूक घेतो म्हणजे लोकशाही केवळ आम्हीच मानतो, असा दावा करणाऱ्या पक्षात गेला आठवडाभर ज्या घडामोडी घडल्या, त्या पाहाता, कॉंग्रेसची राहिलेली प्रतिष्ठाही धुळीस मिळते की काय असे वाटू लागले आहे. राजस्थानमधील राजकारणात एवढे चढउतार निर्माण झाले की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांच्यातील मतभेदामुळे दिल्लीतील कथित हायकमांडचे पितळ उघडे पडले. दिल्लीहून आलेले पक्षाचे निरीक्षक मल्लीकार्जून खर्गे आणि अजय माकन यांनी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीला गेहलोत यांच्या समर्थक ९० आमदारांनी चक्क पाठ फिरवली. वेगळी बैठक घेत गेहलोत जर अध्यक्षपदी विराजमान होणार असतील, तर त्यांच्याच पसंतीचा आमदार नेता म्हणून निवडावा,अशी स्पष्ट मागणी करीत या आमदारांनी दिल्लीत हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना नेतानिवडीचे सर्वाधिकार देण्याच्या ठरावाकडे अक्षरशः दुर्लक्ष केले. गांधी कुटुंबाचे वजन कमी होत असल्याचा संदेश यामुळे देशात विशेषतः कॉंग्रेस पक्षात जात असल्याचे पाहून सावधगिरी म्हणून अशोक गेहलोत यांची अध्यक्षपदाची उमेदवारीच रद्द करण्यात आली कारण गांधी घराण्याला हा पक्षांतर्गत धक्का पचविणे कठीण गेले. राजस्थानचे मुख्यमंत्रिपद आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद अशी दोन पदे आपल्याकडे ठेवण्याचा गेहलोत यांचा मनसुबा स्वतः राहुल गांधी यांनीच उधळून लावला. दोन पदे एकाच व्यक्तीकडे असू शकत नाहीत, असे त्यांनी केलेले निवेदन अतिशय बोलके होते. त्यामुळे एका बाजूला गेहलोत यांना अध्यक्षपदाची आणि सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपदाची पडणारी स्वप्ने गुरूवारीच भंग पावली. आपल्या समर्थकांनी केलेली कृती चुकीची असल्याची कबुली देत गेहलोत यांनी आपली कातडी वाचवली खरी, पण त्याचवेळी मुख्यमंत्रिपद मात्र अद्याप राखले आहे. गेहलोत या पदावर किती काळ राहातात हे नव्या अध्यक्षांना ठरवावे लागेल, तोपर्यंत सचिन पायलट यांचे भवितव्य अधांतरी राहाते की ते पक्षत्याग करतात, हे लवकरच दिसेल.

दिल्लीत कॉंग्रेस मुख्यालयात शुक्रवारी घडलेल्या घटना पाहाता, त्या पक्षानेही भाजपप्रमाणे धक्कातंत्राचा वापर केलेला दिसला. गेहलोत यांना माघार घ्यावी लागल्यानंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीत जी-२३ गटाचे शशी थरूर रिंगणात राहिले तरी आणखी काही नावे चर्चेत होतीच. ती नावे मागे पडत शुक्रवारी सकाळी ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी आपण उत्सुक असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पक्षाची धुरा त्यांच्याकडे जाते असे वाटत असतानाच, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि कर्नाटकचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव समोर आले. गेहलोत आणि दिग्विजय सिंग यांना गांधी घराण्याचे समर्थन असल्याचे मानले जात असतानाच, खर्गे यांनी उमेदवारी दाखल करावी असे खुद्द सोनिया गांधी यांनीच सुचविल्याचे सांगितले जाते. पक्षाचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी तसा संदेश दिल्यानंतरच खर्गे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला असे सांगितले जात असल्यामुळे आपण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करणार नाही, कुणाची बाजू घेणार नाही अशी ग्वाही देणाऱ्या गांधी कुटुंबाने मात्र उलटीच चाल खेळली आहे. थरूर हे नव्या पिढीचे, नव्या विचारांचे पण स्वतंत्र वृत्तीचे असल्याने ते आपल्या हातचे बाहुले बनणार नाही यांची कल्पना आल्यामुळे खर्गे या ८० वर्षांच्या नेत्याला या पक्षात उत्साह निर्माण करण्याचे काम सोपविले जाईल, अशी चिन्हे दिसतात. कोणाच्या गळ्यात माळ पडेल हा प्रश्‍न आता राहिलेला नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खर्गे यांचे समर्थन करणाऱ्यामध्ये भुपिंदरसिंग हुडा, पृथ्वीराज चव्हाण, अजय माकन, दिग्विजय सिंग आदी ज्येष्ठ नेते आहेत. यापैकी काही जण जी-२३ मधील नेते असून पक्षात बदल करण्यासाठी नेतृत्वाने पुढाकार घ्यावा असे खरमरीत पत्र सोनिया गांधी यांना लिहिणारेही आहेत. शशी थरूर यांच्या शब्दांत सांगायचे तर ज्यांना कॉंग्रेस पक्ष जैसे थे ठेवायचा आहे, असे नेते खर्गे यांच्या समर्थनात उतरले आहेत.  आपला प्रयत्न बदलासाठी असून, जी-२३ ची तीच मागणी होती, हायकमांड संस्कृती पक्षाला पोषक नसून, समाजकार्यातून राजकारणाकडे वाटचाल करायची पद्धत सुरू व्हायला हवी असे थरूर यांना वाटते आहे. अर्थात त्यांना अशी काही संधी मिळेल असे वाटत नाही. त्यांच्या गटाचे नेतेच आता खर्गे यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात १७ रोजी निवडणूक होते की कॉंग्रेसच्या पद्धतीनुसार,गांधीनिष्ठ खर्गे यांनाच हे पद विनाविरोध मिळते हे अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतरच स्पष्ट होईल. गांधी कुटुंबाच्या सांगण्यावरून खर्गे रिंगणात उतरल्याने प्रत्यक्षात ही निवडणूक नसून, ती एक प्रकारची नियुक्तीच ठरेल, असे म्हणता येईल.