प्रज्ञा कारो, रिशान शेखला टेबल टेनिसचे अजिंक्यपद


01st October 2022, 11:49 pm
प्रज्ञा कारो, रिशान शेखला टेबल टेनिसचे अजिंक्यपद

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : कबीर पिंटो मखिजा आयोजित चौथ्या डॉ. फिलिप पिंटो मेमोरियल अखिल गोवा मेजर रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत मुलींच्या १३ वर्षांखालील गटात प्रज्ञा कारोने तर मुलांच्या १३ वर्षांखालील गटात रिशान शेखने अजिंक्यपद पटकावले. स्पर्धेचे आयोजन क्लब वास्को द गामाच्या सहकार्याने केले होते.            

मुलींच्या १३ वर्षांखालील गटात प्रज्ञाने रुची कीर्तनीचा ३-०ने पराभव करत विजेतेपद पटकावले तर मुलांच्या १३ वर्षांखालील गटात रिशान शेखने अथर्व धुळापकरचा ३-०ने पराभव करत अजिंक्यपद पटकावले.            

मुलांच्या १५ वर्षांखालील अंतिम सामन्यात रुची कीर्तनीने रिया गोपीचा ३-०ने, मुलांच्या १५ वर्षांखालील गटात आराेन फारियासने कौशन नाईकचा ३-२ने, मुलींच्या १९ वर्षांखालील गटात समीरा सुआरेसने अनुश्री नाईकचा ३-२ने तर मुलांच्या १९ वर्षांखालील गटात अंशुमन अगरवालने आरोन फारियासचा ३-०ने पराभव केला. महिलांच्या गटात पृथा पर्रीकरने अनुश्री नाईकचा ३-१ने तर पुरुषांच्या गटात अंशुमन अगरवालला विजेता घोषित करण्यात आले. त्याचा प्रतिस्पर्धी जी. अरविंद कुमार अंतिम सामन्याला पोहोचू शकला नसल्यामुळे त्याला अखेर विजेता घोषित करण्यात आले.       

अंतिम सामन्याला पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर हर्षवर्धन भाटकुळे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.