विरघळत्या साखरेपासून सावधान

अत्याचारांबाबतीत विश्लेषण करण्यासारखे असंख्य मुद्दे आहेत, पण मला उल्लेख करावासा वाटतो अशा गुन्ह्याबद्दल ज्यामुळे आज लहान मुलांचा बळी जात आहे. आपल्या डोळ्यादेखत शाळेत शिकत असताना मुलांना गायब केले जात आहे. काही लोक म्हणतात, ह्या सत्यघटना आहेत, काहींसाठी अफवा आहेत. पण मुळात प्रश्न असा आहे की हा गुन्हा घडण्याची परिस्थितीच का निर्माण होते?

Story: पालकत्व । पूजा भांडारे कामत- सातोस्कर |
30th September 2022, 10:31 pm
विरघळत्या साखरेपासून सावधान

ज्या प्रमाणे अन्नात, पंचपक्वांत, घरात गोडधोड करताना, जितके जास्त साखरेचे प्रमाण, तितके खाण्यास आणखीन उत्साह येतो. पण कधीकधी हीच साखर मधुमेहाचे कारण बनू शकते. त्याचप्रमाणे कधी कुणी ज्ञानमंदिरात, कोवळ्या फुलांना त्याच्या फांदीपासून तोडताना, आपल्या तोंडात बनावट विरघळलेली साखर घेऊन येतो व मुलाला बिचाऱ्याला आपल्या गोड शब्दांनी फसवतो, ‘’बाळा तुला ना, तुझ्या आईने बोलावले आहे घरी, आज ते तुला कुठेतरी फिरायला घेऊन जाणार आहेत. मला पाठवले आहे तुला आणायला, जाऊया ना घरी? जा वर्गातून तुझी बॅग घेऊन ये. फक्त एक काम कर, तुझ्या शिक्षिकेला सांग, की तू मला ओळखतोस, नाही तर ती तुला माझ्यासोबत पाठवणार नाही’’. अशा गोड गोड शब्दांचा अमृत वर्षाव बिचाऱ्या बालमनावर झाल्यावर मग ते निरागस मन तसेच वळते जशी त्या नराधमाच्या तोंडातली साखर त्याला वळवते. आणि आज काल ह्या घटना जलद गतीने वाढत आहेत. आणि ह्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. असे अपराध आपण काही प्रयत्नांनी थांबवू शकतो. थेंबे थेंबे तळे साचे, ह्या म्हणीप्रमाणे आज संपूर्ण समाजाने, मातापित्याने, गुरुंनी तसेच आपल्यासोबत आपल्या मुलांना सुध्दा घेऊन ह्या गुन्ह्याविरुद्ध लढा देण्याची गरज आहे. 

खालील मुद्द्यांचा जर पालकांनी विचार केला, तर मुलांच्या अपहरणाचे प्रयत्न ते नक्कीच रोखू शकतील. 

मुलांची सावली बनून राहणे

वर्तमानकाळात वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण पाहता, मातापित्याने लहान मुलांची पूर्णत: सावली बनून राहणेच महत्त्वाचे आहे. आईबाबांनी आपल्या दैनंदिन कामातून मुलांसाठी वेळ द्यावा. त्यांना स्वत: शाळेत सोडावे, शाळेतून घरी आणावे. प्राथमिक वयातील टप्पा, या बाबतीत खूप नाजूक असतो. मुले नेहमी आपला शाळेतील प्रत्येक अनुभव मातापित्याला येऊन सांगतात. त्यांचे भाष्य काहीही का असेना,  प्रत्येक आईबाबांनी ते ऐकून घ्यावे. ज्यामुळे मुलांना कुठलीही गोष्ट लपवायला येणार नाही.

मुलांना प्रशिक्षित करणे

मातापित्याने मुलांना निक्षून सांगितले पाहिजे, की जर आई व बाबांशिवाय इतर कुणीही अनोळखी व्यक्ती त्यांना न्यायला किंवा भेटायला आला तर ते त्यांच्या संपर्कात येणार नाहीत. तसेच जर ते एकटे असतील आणि वाटेत कुणीही अनोळखी व्यक्ती त्यांच्याशी बोलायला आला तर त्यांच्याशी बोलायचे नाही.  जर त्यांनी काही खाण्याचा पदार्थ दिला तर ते खायचे नाही. कुठल्याही प्रकारची भेटवस्तू जर कुणी देऊ केली, तर घ्यायची नाही. अशा अनेक सूचना ह्या बाबतीत मदतकारक ठरु शकतात.

मुलांना संघात, कुटुंबात एकत्रित रहाण्याकरीता प्रेरीत करणे 

बालपणापासूनच मुलांना एकाकी न रहाण्याची सवय केली पाहिजे. एकटेपणा हा नेहमीच समस्या निर्माण करतो. शाळेत किंवा शाळेबाहेर कुठेही जाताना मुलांनी नेहमी आपल्या मित्र मैत्रिणींना बरोबर नेले पाहिजे, म्हणजे कुणीही जवळ येण्याचे धाडस करत नाही. 

व्यक्तिगत माहितीची सुरक्षा

ज्या व्यक्तींना अपहरणांसारखे गुन्हे करायचे असतात, ते लोक बहुतेकदा संपूर्ण माहिती मिळवण्याकरीता निरागस मुलांचा उपयोग करतात. त्यामुळे मातापित्याने आपल्या मुलांना नीट समजावले पाहिजे की त्यांनी त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, किंवा इतर कुठलीही व्यक्तिगत माहिती कुणालाही सांगायची नाही. कुणासमोरही स्वत:स व्यक्त करायचे नाही. अशी सक्तीची सूचना मुलांना दिली पाहिजे. 

मुख्य मुद्दा असा की, आजकाल मुलेही इतकी हुशार झाली आहेत की त्यांना अशा अनोळखी गुन्हेगारांना सहज हाताळण्यास जमते. त्याचसोबत आता शाळेतला शिक्षक वर्ग सुध्दा तितकाच तरबेज झाला आहे, जो योग्य माहिती शिवाय कुणालाही शाळेत वा शाळेच्या आवारात प्रवेश देत नाही. तरीसुध्दा प्रत्येक विद्यार्थ्याने, पालकाने अन् शिक्षकाने काळजी घेतलीच पाहिजे.