गर्भावस्थेतील बदल - दुसरी तिमाही

तिचे गरोदरपणाचे तीन महिने संपून चौथा महिना लागला. बारीक अंगाची असल्याने पोट थोडे थोडे दिसू लागले होते. मागचे १-२ महिने होत असलेली मळमळ, अस्वस्थता आता बरीचशी कमी झाली होती…

Story: आरोग्य । डॉ. श्वेता राऊत मुळगावकर |
30th September 2022, 10:23 pm
गर्भावस्थेतील बदल - दुसरी तिमाही

दुसरी तिमाही म्हणजे काय?

गर्भावस्थेतील नऊ महिन्यांच्या कालावधीमधील चौथ्या ते सहाव्या महिन्यापर्यंत म्हणजे १३ ते २८ आठवड्यांचा काळाला दुसरी तिमाही म्हणतात. गर्भावस्थेची पहिली तिमाही जास्तकरून सगळ्याच महिलांसाठी जेवढी हर्षमय तेवढीच शरीरातील बदलांमुळे गोंधळदायक अशी असू शकते. पण चौथ्या महिन्यापासून मळमळ व उलट्या बर्‍याचश्या कमी झाल्यामुळे बरे वाटू लागते. आधी आणि नंतरच्या तिमाहीपेक्षा हा दुसर्‍या तिमाहीचा कालावधी कमी त्रासदायक असतो.

दुसऱ्या तिमाहीतील लक्षणे:

बहुतांश स्त्रियांना गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत त्रास होत नाही, पण पहिल्या तिमाहीतील इतर लक्षणे दुसऱ्या तिमाहीतसुद्धा राहू शकतात. 

धाप लागणे : गर्भाशयाच्या वाढत्या आकारामुळे डायफ्रॅमवर ढकलले जाते, ज्यामुळे फुप्फुसावर दाब पडतो. ताणाचे काम केल्याने लगेच दम लागणे, श्वासोश्वासास त्रास होणे असे त्रास उद्भवू शकतात, अशक्तपणा वाटू लागतो. जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पोटात दुखणे : दुसर्‍या तिमाहीत गर्भाशयाच्या आकारासोबत सभोवतालचे ओटी- पोटीचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे ओटीपोटीत दुखणे व अस्वस्थता जाणवू शकते.

पाठीत दुखणे : ओटी- पोटीचे स्नायू ताणले गेल्याने पाठीवरचा ताण वाढतो व पाठदुखी चालू होऊ शकते. जड वजन उचलल्याने, परत परत वाकल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने झोपल्याने पाठीत दुखू शकते. बसताना किंवा झोपताना आरामदायक कुशन किंवा उशांचा वापर केल्यास आराम मिळतो. आरामदायक चप्पल किंवा शूज घालावे व वजन उचलणे टाळावे.

तीव्र डोकेदुखी : वेगवेगळे शारीरिक बदल होत असल्याने काही जणींना तीव्र डोकेदुखीचा त्रास उद्भवू शकतो.

मानसिक व भावनिक बदल : हॉर्मोनल बदलांमुळे पहिल्या तिमाहीत चालू झालेले  मानसिक व भावनिक बदल पुढे चालू राहतात पण आतापर्यंत त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण आलेले असते.

पोटातील बाळाची नाजूक हालचाल : साधारण सहाव्या महिन्यापासून म्हणजे वीस आठवड्याच्या आसपास गर्भातील नाजूक हालचाली गर्भावती महिलेला जाणवू शकतात. या हालचालींना 'क्विकनिंग' म्हटले जाते. तसेच यादरम्यान गर्भातील बाळाला उचक्या येत असल्यास पोटात थोडे वेगळे वाटत असल्याची जाणीव होत रहाते. 

पहिल्या तीन महिन्यांत गर्भाची वाढ मर्यादित असल्याने झोपेचा फारसा त्रास होत नाही. पण चौथ्या ते पाचव्या महिन्यापासून गर्भवती महिलांच्या पोटाची तसेच गर्भाची वाढ चालू होते. त्यामुळे गर्भवती महिलेच्या हालचालींवर मर्यादा येऊ लागते. पालथे झोपल्याने गर्भाशयावर दाब येऊन तो संकुचित होऊ शकतो व शरीराच्या खालच्या बाजूला म्हणजे गर्भाशय, पाय यांना रक्तपुरवठा कमी होतो. त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो. अशा वेळी पोटावर झोपण्यापेक्षा डाव्या कुशीवर आलटून पालटून झोपण्यास सांगितले जाते, ज्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होतो. 

दुसऱ्या तिमाहीतील गर्भाची वाढ

दुसरी तिमाही गर्भावस्थेचा अर्धा टप्पा असल्याने या टप्प्यात बाळाचे बहुतांश अवयव विकसित होऊ लागतात. गर्भाची वाढ कशी होत आहे हे समजून घेण्यासाठी या कालावधीत  गर्भधारणा अल्ट्रासाउंड स्कॅन (अनोमली स्कॅन) केले जाते. ह्या स्कॅनअंतर्गत गर्भाच्या हालचाली तपासण्यास, अवयवांची वाढ पाहण्यास आणि गर्भामध्ये काही दोष असल्यास ते शोधण्यात मदत होते.

आहार कसा असावा ?

गर्भाची वाढ चालू असल्याने या काळात भूक लागणे अपेक्षित असते. अशा वेळी संतुलित आहार घेणे महत्त्वाचे ठरते, ज्यातून गर्भातील बाळाला वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक तत्त्वे मिळतील. आवश्यक प्रथिनांसाठी मांस, मासे, मसूर आणि अंडी यांसारखे पदार्थाचे सेवन करावे. आहारात वेगवेगळ्या भाज्या व फळांचा समावेश करावा. कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ व पुरेसे कॅल्शियम आहारात असावेत. बाळाच्या मेंदूच्या विकासाठी मासे खावे, ज्यातून ओमेगा ३ मिळते. पीत्त वाढू नये म्हणून जंक फूड खाणे टाळावे.

दुसऱ्या तिमाहीतील तपासणी

गर्भावस्था तपासणी भेटीमध्ये रक्तदाब, वजन आणि ओटीपोट तपासणी यासारख्या नियमित तपासण्या केल्या जातात. त्याचसोबत गर्भावस्था मधुमेह चाचणी, हिमोग्लोबिन चाचणी तपासून लोहपुरक आहार किंवा औषधांमध्ये बदल करण्यात येतो. गर्भावस्थेत धनुर्वात (टिटॅनस) संसर्ग होण्याची शक्यता असल्याने त्याचे लसीकरण तसेच फ्लूचेही लसीकरण दिले जाते.

दुसऱ्या तिमाहीमधून जात असताना पुढे काय होणार याबद्दल चिंता वाटणे साहजिक असते. परंतु जास्त विचार न करता पुरेसा आराम करा, संतुलित आहार घ्या, भरपूर पाणी प्या व नियमित व्यायाम करा. काही शंका असल्यास मनात न ठेवता डॉक्टरकडून त्याचे निरसन करून घ्या.