वालकिनीच्या शाळेत नेमली तात्पुरती इंग्लिश शिक्षिका

शिक्षण खात्याचा कारभार; अन्य विषयांचा प्रश्न कायम

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd September 2022, 01:14 Hrs
वालकिनीच्या शाळेत नेमली तात्पुरती इंग्लिश शिक्षिका

सांगे :‘वालकिनी कॉलनी क्रमांक-१’ येथील सरकारी प्राथमिक शाळेत १५ दिवसांपासून शिक्षक नसल्याने पाहून, १८ विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून गावातील तरुण प्रेमानंद रेकडो हे शिकवत होते. यावर प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर शिक्षण खात्याने गुरुवारी लगेच एका शिक्षिकेचे येथे तात्पुरती नेमणूक केली. मात्र, या शिक्षिकेला इंग्रजी व्यतिरिक्त अन्य कोणताही विषय शिकवता येत नसल्याने मुलांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
शिक्षण खात्याच्या नियमानुसार, तात्पुरती नियुक्त केलेली इंग्रजी विषयाची शिक्षिका संपूर्ण शाळेचा ताबा घेऊ शकत नाही. कारण त्यांच्याकडे आठवड्यातून दोन दिवस अन्य तीन शाळांचीही जबाबदारी आहे. शिवाय ही शिक्षिका इंग्रजीशिवाय अन्य कोणतेच विषय शिकवू शकत नाही. मग, इतर विषय शिकवण्यासाठी खात्याने काय उपाय काढला आहे, असे प्रश्न पालकांतून विचारले जात आहेत.

भागशिक्षण अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे वालकिनीतील या शाळेत आधी नियुक्त केलेला शिक्षक पोहोचलाच नाही. याच कामासाठी भागशिक्षण अधिकारी नियुक्त केलेले असतात. नेमलेला शिक्षक अशाप्रकारे शाळा वाऱ्यावर सोडून जाऊ शकत नाही. - सुरेश केपेकर, जिल्हा पंचायत सदस्य

शिक्षक नसल्याने शाळा बंद पडून मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून, मी शिकवत होते. पत्रकारांनी यावर आवाज उठवल्यानंतर शिक्षण खात्याने गुरुवारी शाळेत शिक्षक पाठवला. पण, तो तात्पुरता आहे. या शाळेत कायमस्वरूपी शिक्षकाची नियुक्ती होणे गरजेचे आहे. - प्रेमानंद रेकडो