पीएफआयचा हस्तक गोव्यातून पळाला, केरळात सापडला

एनआयएचा बायणात छापा; आईवडिलांना घेऊन झाला होता पसार; बहीण-भावोजींची चौकशी

Story: प्रसाद शेट काणकोणकर |
23rd September 2022, 01:08 Hrs
पीएफआयचा हस्तक गोव्यातून पळाला, केरळात सापडला

पणजी : दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी मध्यरात्रीपासून गोव्यासह १३ राज्यांमध्ये छापे टाकून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेशी निगडित १०६ सदस्यांना अटक केली आहे. यामध्ये संघटनेचा प्रमुख ओमा सालम याचाही समावेश आहे. याच कारवाईत गोव्याच्या बायणा (वास्को) भागातून पळालेल्या संघटनेचा राष्ट्रीय सरचिटणीस अनिश अहमद याला केरळमधून अटक केली आहे.
अनिश दहा वर्षांपूर्वी बायणातील एका घरात राहत होता. नंतर त्याने आईवडिलांना तिथे ठेवले. त्यांना भेटण्यासाठी तो महिन्यातून ८-१० दिवसांसाठी इथे यायचा. तो गोव्यासह बंगळुरू किंवा केरळमध्ये फिरत राहायचा. त्याचा एक निश्चित ठावठिकाणा नाही, याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यानुसार एनआयएच्या पथकाने गुरुवारी पहाटे ४ वाजता बायणातील त्याच्या घरावर छापा टाकला, पण आठ दिवसांपूर्वीच तो आईवडिलांना घेऊन पसार झाल्याचे आढळून आले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तो गोव्यात आला होता.
दरम्यान, एनआयएने मागील आठवड्यापासून देशभरात पीएफआयच्या केंद्रांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर अनिश बायणात येण्याची शक्यता लक्षात घेऊन एक पथक दोन दिवसांपूर्वीच गोव्यात दाखल झाले होते. या पथकाला सहकार्य करण्यासाठी तसेच आवश्यकता भासल्यास काही अडचण येऊ नये म्हणून आयकर विभाग, केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग (सीबीआय), केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय), नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) या यंत्रणांचे अधिकारीही तयारीत होते. शिवाय सुरक्षा व इतर मदतसाठी गोवा पोलिसांचे सहकार्य पथकाने घेतले होते.
देशभरात कारवाई सुरू झाल्यानंतर अनिश गुरुवारी पहाटे गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोव्यातील पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने गुरुवारी पहाटे ४ वाजता वरील ठिकाणी छापा टाकला असता, त्याच्या घरात बायणा येथील मदरशाचा शिक्षक आणि त्याची पत्नी राहत असल्याचे दिसून आले. तसेच त्याच परिसरात अनिशची बहीण व भावोजी राहत असल्याचेही त्यांना समजले. त्यांची पथकाने चौकशी केली. त्यावेळी अनिश आईवडिलांना घेऊन केरळ येथील अज्ञात ठिकाणी गेल्याचे पथकाला समजले. दरम्यान, केरळमधून अनिशला अटक केल्यानंतर एनआयएचे पथक गुरुवारी रात्रीच गोव्यातून दिल्ली रवाना झाले.