बार्देशातील महिलेचा फेसबूकवरील फोटो एडिट करून टाकला पॉर्न साइटवर!

कर्नाटकातील संशयिताला सायबर सेलकडून अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th August 2022, 12:14 am
बार्देशातील महिलेचा फेसबूकवरील फोटो एडिट करून टाकला पॉर्न साइटवर!

महिलेच्या बदनामी प्रकरणी अटक केलेल्या संशयितासोबत सायबर गुन्हे विभाग पथक.

म्हापसा : सोशल साइटवरील फोटोंचा समाजविघातक घटकांकडून अनेकदा दुरुपयोग केला जातो. पण, फेसबूकवर फोटो अपलोड करण्याचा मोह अनेकांना विशेषतः महिलांना आवरत नाही. याच मोहाचा फटका बार्देशमधील एका महिलेला बसला. तिचा फेसबूकवरील फोटो अश्लील संकेतस्थळावर (पॉर्न साइट) टाकून तिची बदनामी करण्यात आली. याप्रकरणी सायबर गुन्हे विभागाने कर्नाटकातील दीपक परशुराम दलवाई (रा. कोप्पाल) यास अटक केली आहे.

पोलिसांच्या सायबर सेलकडून महिलांनी सोशल मीडियावर असे फोटो टाकू नये, असे आवाहन केले जाते. पण, अनेकांना सोशल मीडियावर मिरवण्याचा हव्यास आवरता येत नाही. अशांसाठी बार्देशमधील हा प्रकार डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरला आहे. एक महिला फेसबूकवर आपले फोटो अपलोड करत होती. या महिलेच्या फेसबूक अकाऊंटमधून संशयिताने फोटो डाऊनलोड करून घेतला आणि एडिटींग करून पॉर्न साइटवर टाकला. इतकेच नाही, तर संशयिताने महिलेचा बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून त्यावरही हा फोटो टाकला.
वरील प्रकार महिलेच्या लक्षात येताच तिने सायबर गुन्हे विभागात तत्काळ तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे गतिमान करून दीपक परशुराम दलवाई या संशयिताला शनिवारी गजाआड केले. दरम्यान, या घटनेतून महिलांनी बोध घेऊन फेसबूकवर फोटो टाकताना जपून रहावे, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.
विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिवेंद्र भूषण व निरीक्षक देवेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सर्वेश सावंत, हवालदार योगेश खांडेपारकर, कॉन्स्टेबल संयोग शेट्ये, इब्राहिम करोल व हेमंत गावकर या पथकाने वरील कारवाई केली.

हेही वाचा