तिघांना भोपळे; १८७ जण दहाच्या आत!

पंचायत निवडणुकांत १४ उमेदवारांना केवळ एक मत

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th August 2022, 12:11 am
तिघांना भोपळे; १८७ जण दहाच्या आत!

पणजी : पंचायत निवडणुका मतपत्रिकांद्वारे होऊनही तीन उमेदवारांना शून्य मते पडल्याचे समोर आले आहे. निवडणुकांच्या रिंगणात असलेल्या १४ उमेदवारांना केवळ एक मत, १८७ जणांना दहापेक्षा कमी मते पडल्याचे निकालातून उघड झाले आहे.
विधानसभा, लोकसभांच्या निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारे होत असतात. त्यात घोळ घालता येतो असा दावा करीत गोव्यासह देशभरातील विरोधी पक्षांकडून या निवडणुकाही मतपत्रिकेद्वारे घेण्याच्या मागण्या होत आहेत. परंतु, राज्यात नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकांसाठी उभ्या असलेल्या तीन उमेदवारांना भोपळा मिळालेला आहे. यातून त्या उमेदवाराने स्वत:चे मतही स्वत:ला दिलेले नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निकालानुसार, बार्देश तालुक्यातील हणजुण पंचायतीतील प्रभाग क्रमांक ८, सासष्टीतील वार्का पंचायतीतील प्रभाग ७ आणि पेडणे तालुक्यातील वारखंड पंचायतीच्या प्रभाग १ मधून निवडणुकीला सामोरे गेलेल्या प्रत्येकी एका उमेदवाराला शून्य मते मिळाली आहेत.
केवळ एक मत मिळालेल्या उमेदवारांची संख्या १४ आहे. डिचोलीतील आमोणा पंचायतीचा प्रभाग ४ व शिरगाव पंचायतीचा प्रभाग ५, बार्देशातील कोलवाळ पंचायतीचा प्रभाग ९ आणि पर्रा पंचायतीचा प्रभाग ४, सासष्टीतील सारझोरा पंचायतीचा प्रभाग २, सत्तरीतील मोर्ले पंचायतीचा प्रभाग १, तिसवाडीतील करमळी पंचायतीचा प्रभाग १, फोंड्यातील मडकई पंचायतीचा प्रभाग ७, पेडणेतील धारगळ पंचायतीचा प्रभाग ३ व पालयेतील प्रभाग १, मुरगावातील सांकवाळ पंचायतीचा प्रभाग ५, केपेतील बाळ्ळी पंचायतीचा प्रभाग ६ तसेच फातर्पा व नाकेरी येथील प्रभाग एकमधील प्रत्येकी एका उमेदवाराला केवळ एकच मत पडल्याचे निकालातून दिसून आले आहे.

कोणत्या तालुक्यात किती जणांना दहापेक्षा कमी मते?
पेडणे : १५
डिचोली : १४
बार्देश : ५६
तिसवाडी : २२
सत्तरी : ८
फोंडा : १६
सासष्टी : २७
मुरगाव : १०
धारबांदोडा : २
सांगे : ३
केपे : १२
काणकोण : २
एकूण : १८७

हेही वाचा