नात्याचा गोडवा जात्यासंगे गावा

कुटुंबातील एक स्त्री सुशिक्षित असली तर पूर्ण कुटुंब सुशिक्षित होते. म्हणूनच म्हटलेल आहे की जिच्या हाती पाठल्याची दोरी ती जग उद्धारी.’ मानवी नात्याच्या जाळ्याचा केंद्रबिंदू स्त्री असते. कौटुंबिक नाती टिकवणे, आपल्या वागणूकीतून आपल्या मुलांवर नात्यांविषयी चांगले संस्कार करणे हे स्त्रियांवरच अवलंबून असते. घरामध्ये लहान मुले आपल्या आईचे अनुकरण करत असतात. आईने घरातील वृद्ध माणसाची काळजी घेतली तरच लहान मुलेही त्यांची काळजी घेतील. सुनेला सासू आईसमान वाटली तर सासूला सून मुलीसमान वाटणे साहजिकच कारण टाळी कधीही एका हाताने वाजत नाही. सासू सुनेच्या नात्याचे सुंदर वर्णन जात्यावरील ओव्यातून केले आहे.

Story: जात्या माज्या ईस्वरा | सरोजिनी भिवा गा |
13th August 2022, 11:25 Hrs
नात्याचा गोडवा जात्यासंगे गावा

बया मालनी परास, सासूबाईचा उपकार

दिला पोटीचा चंद्रहार जीव माझा बी 

झाला गार

सासू मालन म्हनीती सून नव्हं 

ती मायबहिन

घरा आली सून सये करावी मालकीन

असं नातं प्रत्येक कुटुंबामध्ये दिसेल तर वृध्दाश्रमाची गरज भासणार नाही आणि कोणत्याही आई बापाच्या डोळ्यात अश्रू दिसणार नाहीत. माणूस विभिन्न जात्याच्या बंधनात बांधलेला असतो म्हणूनच तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असतो. ती नातीच त्याला सामाजिक बनवतात. नणंद-भावजयी म्हटली की त्या नात्यामध्ये समजापेक्षा गैरसमज खूप असतात. कोणतेही नाते कसे हे स्त्रियावरच अवलंबून असतं. प्रत्येक नणंद भावजय बहिणीप्रमाणे राहिली तर जात्यावरील ओव्यांमध्ये व्यक्त झालेल्या भावना प्रत्यक्षात पाहण्यासाठी शोधाशोध करावी लागणार नाही. 

काय सांगू बाई माझ्या माह्याराच्या रीती

सोन्याच्या परातीत भावजय पाय धूती

जाईन माह्यारा माह्याराचा डौल कसा

भावा आदी बोल भाचा आत्याबाई खाली बसा

कुटुंबामध्ये भावंडे आनंदाने, मिळून-मिसळून राहू लागली, घरात जे काही असेल ते वाढून खाऊ लागली की त्यातच आई-वडिलांचे  समाधान असते. तिथेच त्यांना आनंद मिळतो. बहीण भावाचे नाते तर निराळेच असते. लोकसाहित्याच्या प्रत्येक प्रकारातून ते व्यक्त झालेले आहे. दळायला बसल्यावर बहीण ज्यावेळी भावाविषयी गुणगान गाते तेव्हा सूपभर धान्य नकळतपणे दळून होतं हे तिला कळतही नाही. लग्न करून दिलेल्या बहिणी माहेरी येतात आणि आई-वडील, भाव-भावजय यांच्याशी आपले मन मोकळे करतात तेव्हा घरातील वातावरण आपुलकीने भरून जाते. भाऊ हा बहिणीसाठी बऱ्या-वाईट प्रसंगावेळी साथ देणारा पाठीराखा असतो. याचे सुंदर वर्णन बहिणी जात्यावरील गीतातून व्यक्त करतात.

सरलं माझ दळन, माझ्या सूपात पाच गहू ।

देवान दिले भाऊ आम्ही बहिनी ओव्या गावू

 सरल माझं दळण माझ्या सूपात पाच पोशे।

भयनीत भाव बसे सोन्याची रास दिसे

जसे भावा बहिणीची माया, प्रेम आपल्याला विभिन्न साहित्यातून वाचायला मिळते तशीच माया, आपुलकी बहिणी-बहिणीमध्ये सुद्धा असते. लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्री आपआपल्या संसारात गुंतलेली असते मग एकमेकांच्या घरी वारंवार जाणे शक्य होत नाही, पण एकमेकांविषयीचे मनातील प्रेम कमी होत नसते. ते दळायला बसल्यावर जात्याशी व्यक्त होते. ओव्याच्या माध्यमातून सर्व नाती एकमेकांच्या जवळ येतात. विवाहित बहिणी आपले बालपण आठवतात. गाऊ लागतात,

चौघी आमी भयनी, एके न्हाणीचा पाणी न्हाऊ

साखळे शरा जाऊ एका रंगाच्या साड्यो घेऊ

सासरी जावा-जावा बहिणीसमान असतात. प्रत्येक स्त्री तशी वागली तर कोणत्याही स्त्रीला बहिणीची कमतरता भासणार नाही. घरातील वातावरण सुध्दा चांगले राहणार व सर्व मुलांवर चांगले संस्कार होणार.

जावा, नी जावा आमी एका ग चालीच्या।

जन इचारती, सूना कोना ग मालनीच्या