मलेशियात घरच्या मायेचा स्पर्श

मलेशियाला पोहोचून काही तासंच झाले होते. पण घरापासून फार लांब आल्याचा भास होत होता. त्या ओळखीच्या जेवणाने मायेचा हात फिरवत आम्हाला जणू दिलासा दिला.

Story: प्रवास | भक्ति सरदेसाई |
13th August 2022, 11:23 pm
मलेशियात घरच्या मायेचा स्पर्श

क्वालालंपूर म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते पेट्रोनस टॉवर्स. जगातल्या सर्वात उंच ‘twin towers’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या इमारती का कुणास ठाऊक कुतुबमिनारची आठवण करून देतात. टॅक्सीवाल्याने आम्हाला दूर सोडलं असल्याने ह्या गगनचुंबी इमारतींचं पहिलं दर्शन आम्हाला दुरूनच झालं. पायपीट करत करत आम्ही जसे जसे जवळ जाऊ लागलो तसतश्या ह्या इमारती अधिकाधिक उंच वाटू लागल्या. पायथ्याशी पोहोचून वर पहिलं तर गल्हीवरच्या लिलिपूटमध्ये असल्यागत वाटलं. 

काही फोटोज् काढून आम्ही वर जाऊन शहराचा नजारा पाहण्याऐवजी ह्या इमारतीला प्रदक्षिणा घालायचं ठरवलं. कारण हे की ‘बुर्ज खलिफा’ पाहून झाला होता. मग त्याहून कितीही म्हटलं तरी बुटकी इमारत ही. उगीच ‘been there, done that’ करण्याच्या नादात ३-३ असे तब्बल सहा हजार रुपयांचा तिकिटांच्या नावाखाली फटका बसवून घेण्यात काहीच अर्थ नव्हता. 

प्रदक्षिणा घालताना अनेक hawkers अगदी गळ घालायला आले. “सकाळपासून अजून पर्यंत आपली बोणी झाली नाही, तुम्ही आमच्याकडच्या वस्तू विकत घ्या” असा प्रत्येकाचा अट्टाहास. शेवटी मी एकाकडून selfie stick घेतली. तेव्हा ह्या अगदी नवीनच आल्या होत्या. बहुदा भारतात अजून सेल्फी स्टीक्सचा शिरकाव झाला नसल्याने मी पहिल्यांदाच हा आविष्कार पाहत होते. त्याच्याकडून ती selfie stick विकत घेऊन मी माझ्या फोनला जोडली. आणि आता काय? ना त्या सोबत रिमोट मिळाला होता ना त्याच्या हॅंडलला कोणतं बटन होतं. फोटो घ्यायचे तरी कसे ? प्रश्नच पडला! शेवटी युक्ती सुचली, आणि आम्ही टायमर लावून फोटोज काढू लागलो. 

थोडं पुढे गेलो आणि आम्हाला तिथली खाऊ गल्ली सापडली. पोटपूजा करायची म्हटलं तर धडातलं काही दिसेना. सगळ्या पदार्थांमध्ये मांस (आणि तेही कोणतं?) असेल अशी शंका वाटू लागली. मग शेवटी एक बेकरी दिसली जिथून आम्ही दोन डोनट घेतले आणि खात खात पुढे सरलो. 

एव्हाना सूर्य पूर्णपणे अस्ताला गेला होता. रात्र तरुण होती. पूर्ण शहरात झगमगाट झाला होता. अशा वेळेला ‘सिम्फोनी लेक’ नावाचा बोर्ड दिसला. नाव ऐकताच इथे काहीतरी मस्त पाहायला मिळेल अशी आशा वाटली. पुढे जाऊन विचारपूस केली असता कळलं की इथे दर रात्री light and sound show होतो. लॉटरी लागल्यासारखी वाटली. त्या रात्री आम्ही त्या ताळ्याकाठी बसून तो शो पाहिला. आमच्या शेजारी बसलेल्या इतर पर्यटकांशी मनसोक्त गप्पा मारल्या. आमच्या देशाबद्दल सांगितलं, इथल्या लोकांबद्दल सांगितलं. कितीतरी गैरसमज दूर केले. वरून त्यांना “भारतात नक्की या” असं गोड आमंत्रणही दिलं. कोणत्याही जागे विषयी, स्वतः जाऊन न पाहता, पूर्वग्रह करणं चूक. हेच लॉजिक व्यक्तींबद्दल केलेल्या पूर्वग्रहासही लागू पडतं, पण हे खूप कमी लोकांना कळतं. असो. 

पेट्रोनास आणि सिम्फोनी पाहून आम्ही टॅक्सी घेऊन परत निघालो. वाटेत कुठे भारतीय भोजनालय दिसतं काय ह्याचा शोध सुरू होता. शेवटी एक साऊथ इंडियन रेस्तराँ दिसलं तसं आम्ही उतरून इडली डोस्यावर ताव मारला. मलेशियाला पोहोचून काही तासंच झाले होते. पण घरापासून फार लांब आल्याचा भास होत होता. त्या ओळखीच्या जेवणाने मायेचा हात फिरवत आम्हाला जणू दिलासा दिला. हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत मूड सुधारला होता. निदान मनाला एका प्रकारचं समाधान होतं की हा दिवस आम्ही वाया नाही घालवला. क्रमशः