स्वातंत्र्याचा पहिला धडा

त्यांना मुक्तपणे उडताना पाहून मी मनोमन आनंदले होते. सगळ्यांनी उस्फूर्तपणे टाळ्या वाजवून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. तो क्षण अजून मी जपून ठेवलेला आहे.

Story: गीता नायक |
13th August 2022, 11:19 pm
स्वातंत्र्याचा पहिला धडा

स्वातंत्र्य हा शब्दच मोहिनी घालणारा आहे. स्वातंत्र्य कुणाला नको असते? स्वातंत्र्याचे महत्त्व न जाणणारा करंटाच असायला हवा. असतात काही परधार्जिणी माणसे ज्यांना स्वातंत्र्यापेक्षा कैदेतच राहायला आवडते. हो विनासायास दोन वेळचे जेवण मिळत असते ना. पारतंत्र्यांत सुग्रास जेवायची चटक लागली की घरचे कष्टाचे जेवण निरस वाटू लागते. खूप काळ पारतंत्र्यांत राहिल्यावर माणसाला एवढी सवय होऊन जाते की तेच त्याला आपले भाग्य वाटू लागते. स्वातंत्र्यासाठी पेटून उठणारे मनच मरून जाते .जोपर्यंत दुसरी व्यक्ती येऊन त्याला हलवून जागा करत नाही तोपर्यंत तो हालचालच करत नाही. आपली विजिगिषु वृत्तीच तो विसरून गेलेला असतो. 

पारतंत्र्य म्हणजे काय हे ज्यू लोकांना बरोबर माहीत आहे. स्वत:ची हक्काची भूमी नसल्याने जाईल तिकडे ते उपरेच ठरले. कुठेही काही झाले की पहिला हात त्यांच्यावरच पडायचा. त्यांच्या बाजूने लढणारे होतेच कोण? एवढे धनवान आणि व्यापारीवृत्तीचे असूनही  ते उपरे होते. ना घर का घाटका . त्रिशंकूसारखे अधांतरी लटकणारे अशी त्यांची गत होती.  जर्मनीत 'घेटो' मध्ये राहणारे आणि 'ऑशवित्झच्'या छळछावणीमध्ये हजारो संख्येने प्राण गमावणारे हे ज्यू लोक त्यांना स्वातंत्र्याचे नेमके स्वरूप व महत्त्व समजले होते. म्हणूनच स्वराष्ट्र स्थापनेचे त्यांनी उद्दिष्ट ठेवून मिळेल तिथून ज्यूंना तिथे स्थापित केले होते. स्वतंत्र " इस्राइल" ची स्थापना त्या विस्थापितांनीच केली होती. विस्थापितांचे दु:ख त्यांच्यापेक्षा कोण अधिक जाणणार? 

ब्रिटिशांच्या गुलामगिरीत खितपत पडलेला भारत १५ ऑगस्ट १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. आम्ही विस्थापीत नव्हतो तरी भारतीयांची अवस्था लूत भरलेल्या कुत्र्यापेक्षा कमी नव्हती.  मी भारतीय अशासाठी म्हणाले की मी गोवेकर होते. आमचा गोवा तर अजूनही पोर्तुगालींच्या वरवंट्याखाली चिरडला होता. गोव्यासकट भारताची गुलामगिरी दूर करायचा प्रयत्न आधीच केला असता तर आम्ही गुलामगिरीतून मुक्त झालो असतो असो. १९ डिसेंबर १९६१ ला गोवाही मुक्त झाला आणि स्वातंत्र्यातील पहिला मुक्त श्वास आम्ही घेतला. मी फक्त सात वर्षांची होते त्यावेळी.  मुले नेहमी मुक्तच असतात त्यामुळे आम्हाला त्यातले फारसे काही कळत नव्हते. आहे तशी थोडीशी आठवण आहे म्हणा. गोव्या मुक्तीच्या वेळी मी पहिलीत होते. मोहिनी देवालयाच्या सभामंडपातून आमची शाळा पूर्वीच्या इश्कलांत हलवली होती. शाळे समोर पटांगण होते. तिथे झेंडावंदन व्हायचे. 

ही घटना घडली तेव्हा मी तिसरीत होते. १९६३चे साल असावे ते. १५ ऑगस्ट भारताचा १६ वा स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करणार होतो. आम्ही रांगेत राहून उंच चढणाऱ्या तिरंग्याकडे ताठमानेने पहात होतो. आम्ही राष्ट्रगीत म्हटले आणि तिरंग्याला मानवंदना दिली. गुरूजी आम्हाला स्वातंत्र्याविषयी माहिती देत होते. स्वातंत्र्याच्या कल्पनेने आम्ही भारावलेले होतो. एवढ्यात कुणी तरी "सर,सर," अशी हाक मारली. "काय रे काय झाले?" गुरूजींनी विचारले. 

" सर, हा बेंजीत आहे ना त्याने सर किरांट्यांना ( पोपटासारखे लहान पक्षी)पकडून पिंजऱ्यात ठेवले आहे.

" बेंजीत कुठे आहे तो पिंजरा?" सरांनी दरडावले. "चल आण तो इकडे" . सरांचा हुकूम म्हटल्यावर तो विद्यार्थी तरी काय करणार? झुडुपांत लपवून ठेवलेला पिंजरा तो घेऊन आला. झाडावर पांकाट्या (फणसाचा पाक लावून बनवलेली काठी) लावून त्याने उडत जाणाऱ्या किरांट्या पकडल्या होत्या. चुडतांच्या वीरांनी बनवलेल्या इवल्याशा पिंजऱ्यांत त्याने त्यांना कोंडले होते. त्या कोंडलेल्या पक्ष्यांचा चिवचिवाट चालला होता. 

" काय रे बेंजीत, तुला कैदेत बंद केले तर चालेल का? त्या मुक्या पक्षांना कां पकडलेस तू? चल, तूच सोडून दे त्यांना, तुझ्या हातांनी." सगळ्या पाखरांना त्याने हिरमुसल्या मनाने सोडून दिले. किती सायासपूर्वक पकडले होते ते त्याने. त्याच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडले होते. तो जरी हिरमुसला होता तरी बाकीची पोरे मात्र आनंदली होती.  पक्ष्यांना सोडताच एका मागोमाग ते भुर्रर्रकन उडून गेले. नशीब त्याने त्या किरांट्याचे पंख नव्हते कापले. त्यांना मुक्तपणे उडताना पाहून मी मनोमन आनंदले होते. सगळ्यांनी उस्फूर्तपणे टाळ्या वाजवून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिन साजरा केला होता.  तो क्षण अजून मी जपून ठेवलेला आहे.