दुर्लभं भारते जन्म: ...

सृजनशीलतेला सामाजिक अधिष्ठान देणारा हिंदुस्थान या सृजनत्वाचा हर्षोल्लासाने सोहळा साजरा करतो हे अखंड मानवजातीसाठी पथदर्शक ठरावे. अद्भुत कौशल्याच्या बळावर जगासमोर उत्तमोत्तम उदाहरणे ठेवणारा आपला देश जागतिक पटलावर प्रखरतेने उजळणारा, उजळलेला देश म्हणून ख्यातकीर्त आहे.

Story: संतोष काशीद |
13th August 2022, 11:16 pm
दुर्लभं भारते जन्म: ...

दुर्लभं भारते जन्म: मानुष्यम तत्र दुर्लभं असं म्हटलं जातं. या संस्कृत सुभाषिताचा रचयिता कोण आहे याच्या खोलात न शिरता याचं विमोचनात्मक विश्लेषण अत्यंत महत्त्वाचे आहे. हे विश्लेषण महत्त्वाचे आहेच पण त्याहूनही त्याचा गर्भितार्थ महनीय आहे. हे सुभाषित सांगते की 'भारत या देशात जन्माला येणं हेच मुळी अत्यंत दुर्लभ आहे. अन त्याहीपेक्षा दुर्लभ म्हणजे इथला मनुष्यजन्म.' किती सुंदर अर्थाने ओतप्रोत भरलेले हे सुभाषित आहे. सजीव म्हणून तुम्ही भलेही भारतासारख्या महान देशात जन्म घ्याल पण मनुष्यजन्म मात्र दुर्लभ असेल अर्थात तुमची पूर्वपुण्याई तेवढी काठोकाठ भरलेली असली तरच या देशात मनुष्यजन्म तुम्हाला मिळेल. जागतिक नकाशावर परंपरा, इतिहास, महाकाव्ये, समाजजीवन, चालीरिती, कमालीचं बदलतं जीवनमान या सगळ्या बाबी ठळकपणे प्रदर्शित होणारे फार कमी देश आहेत. ज्या देशांना हे सगळे कंगोरे आहेत ते देश जगावर आपल्या प्रतिभेची छाप सोडतात. कधीकाळी साप-गारुड्यांचा देश म्हणून हिणवले गेलेल्या भारताने आज केलेली चौफेर प्रगती ही वरील सगळ्या अंगभूत गुणांची देण आहे. अवघ्या वसुंधरेच्या पाठीवर सुजलाम सुफलाम असलेला हिंदुस्थान म्हणजे जागतिक नेतृत्वाचा धनी. आज आपण या नेतृत्व क्षमतेच्या अगदी समीप आहोत अन लवकरच हे कर्तेपण भारताच्या हाती येईल हे निःसंशय.

किती महान आपला देश. हजारो वर्षांची लिखित परंपरा जपणारा देश अशी आपली ख्याती. एका जमान्यात काठीला सोनं बांधून फिरणाऱ्या लोकांचा देश असे प्रतिभावंतांनी उल्लेख केलेला आपला देश. कलेच्या प्रांगणात मनमुराद घौडदौड करणारा आपला देश. सत्तेच्या सारिपाटात एक निर्दोष, उदात्त, प्रगतिशील स्पर्धा जपणारा आपला देश. रामायण-महाभारताच्या कथा कविता ऐकून इथल्या पिढ्या न पिढ्या घडल्या. मानवजातीच्या उत्थानासाठी स्वतःच्या रक्ताचा रणभूमीला अभिषेक घालणारा आपला देश. देशधर्मासाठी, मानवी स्वातंत्र्यासाठी, उमलणाऱ्या कळ्यांसाठी अन कोमेजलेल्या फुलांसाठी, गुलामीच्या बेड्या निखळून दूर भिरकवण्यासाठी प्राणाची पर्वा न करता हसत हसत प्राणार्पण करणाऱ्या असीम धैर्यशाली वीरांचा आपला देश.  भविष्याच्या संस्कारांवर साधूसंतांच्या दोह्यांचं शिंपण करणारा आपला देश, रामप्रहरी ज्ञानोबा-तुकोबांच्या कवित्वाचं सुलेखन-आलेखन करणारा आपला देश. हिमशिखरांची शीतलता मस्तकी धरून हिंद महासागरात मनसोक्त बागडणारा आपला देश. असेतुहिमाचल एकसूत्रतेचा प्रमाणबद्ध आलेख जगासमोर ठेवणारा आपला देश.  प्राचीनत्वाचा दिमाखदार वारसा हृदयात कवटाळून येणाऱ्या पिढ्यांकडे सुपूर्त करणारा आपला देश. खरंतर महानतेची कोणतीही व्याख्या केली तरी ती चपखलपणे हिंदुस्थानला शोभावी अशी या भूमीची पवित्रता, असा तिचा रुबाब अन तसेच तिचे गुणत्वसुद्धा. 

प्रचंड वैभवशाली पुराण कथात्मक इतिहास हा या देशाला एकसूत्रतेत बांधून ठेवण्यास लाभदायी ठरला. साहित्यिकांनी इथल्या बौद्धिक संपदेला हवं तेवढं शब्दखाद्य पुरवले. शब्दांच्या या राशी पुढच्या पिढ्या घडवत राहिल्या. समृद्ध होत गेल्या. अवघ्या जगाचा 'अधिनायक' असलेला भारत उज्ज्वल इतिहासाचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. इथले पहाड, डोंगरदऱ्या, नदीनाले, खाचखळगे, दगडगोटे, वृक्षराजी सगळेच कसे नयनमनोहर. सुंदर, अभिजात सौंदर्याची मोहिनी लेवून बसलेले. इथल्या माणसांमध्ये आपल्या देशाच्या संस्कृतीचा अभिमान अगदी हृदयातून भरलेला, पाहुण्यांना आपलेसे करणारी 'अतिथी देवो भवो..' च्या जीवनशैलीला अपलेसे करणारी, ज्येष्ठांना मान अन लहानांना आशीर्वाद देणारी संस्कृतीची बीजमूल्ये इथल्या समाजाला घडवत राहिली. स्त्री कर्तृत्वाचा महिमा अवघ्या जगासमोर उदारतेने मांडणारा आपला देश. सृजनशीलतेला सामाजिक अधिष्ठान देणारा हिंदुस्थान या सृजनत्वाचा हर्षोल्लासाने सोहळा साजरा करतो हे अखंड मानवजातीसाठी पथदर्शक ठरावे. अद्भुत कौशल्याच्या बळावर जगासमोर उत्तमोत्तम उदाहरणे ठेवणारा आपला देश जागतिक पटलावर प्रखरतेने उजळणारा, उजळलेला देश म्हणून ख्यातकीर्त आहे. 

इथे रामराज्य साकारले, महाभारताच्या संहारक युद्धाने काळवंडलेल्या अवकाशातही अखंड वसुंधरेला उज्ज्वलतेचा, आत्मज्ञानाचा प्रकाश दिला. इथे, मौर्य, यादव, चालुक्य घडले. इथे क्रूर सुलतानी सत्तास्थानांना सुरुंग लावणारे महाराणा घडले तर मोगलांना चारीमुंड्या चित करणारे छत्रपती शिवराय घडले. पाठीवर जीव ठेवून तलवार गाजवणारी वीरांगणा लक्ष्मीबाईही या देशाने पाहिली तर ताराबाई, चेन्नमा सारख्या पराक्रमी योध्या रणांगणात शत्रूला सळो की पळो करत देशाच्या आत्मरक्षेसाठीही धडपडल्या. इथे बुद्ध घडले, इथे कबीर घडले, इथे टागोर घडले इथे महात्मा घडले, पंचशील तत्त्वांचा अंगीकार करणारे नेहरूही इथेच घडले तर सशस्त्र क्रांतीचा उद्घोष करणारे नेताजींसारखे शेकडो धगधगते वीरही इथेच निपजले. देश घडला तो या मनामनात, कणाकणात भारतमाता वसलेल्या वीरांच्या विरत्वाने, आत्मीय शुरत्वाने. छातीवर गोळ्या झेलत मुखातून अंतिम क्षणी 'भारतमाता की जय ....' म्हणणारे पावन जीव या धारित्रीने पाहिले, केवळ पाहिलेच नाहीतर तर ओलावलेल्या डोळ्यांच्या कडांनी त्यांना आपल्यात सामावूनही घेतले. कित्येक वीर मातांनी आपल्या पोटच्या गोळ्यांना याच मातीत एकजीव होताना पाहिलेय. आत्मत्यागाचे असे शौर्यशाली वीर हेच खऱ्या अर्थाने आपल्या अस्मितेची प्रतीके. यांना जपायला हवे, किंबहुना ते आपले कर्तव्यच. 

पूर्वी चवली-पावलीची अर्थव्यवस्था असलेला आपला देश आज जगाच्या अर्थव्यवस्थेतील लक्षणीय वाटा उचलतोय हे आपल्या अर्थसाक्षरतेचं सर्वात मोठं यश. चाणक्यसारख्या तत्त्ववेत्त्याने एके काळी अर्थव्यवस्थेची उत्तम तत्त्वे मांडली होती. चाणक्यसूत्रांचा प्रचलित अर्थव्यवस्थेशी मेळ घालत देशाच्या अर्थतज्ज्ञांनी जगाचं लक्ष वेधून घेण्याचा पराक्रम केला आहे. बहुतांशी स्वयंपूर्णता असल्याने अपवाद वगळता जागतिक अर्थव्यवस्थेतील चढउतार आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकत नाही हे आपल्या याच अर्थसाक्षरतेचं मोठं यश आहे. इथला गरीब श्रीमंत भेद आजही आहेच पण त्यात लक्षणीय घट होतेय ही दिलासादायक बाब नक्कीच सुखावह आहे. औद्योगिक क्षेत्र, शेती क्षेत्र, ग्रामीण क्षेत्र, शिक्षण क्षेत्र अशी असंख्य क्षेत्रे कमीजास्त प्रमाणात का होईना पण आघाडीवर आहेत. देशाची क्षमता पूर्ण करून जगाला जगवण्याचं कार्य करत आहेत. इतकं मोठं यश मिळवत जगाच्या नाकावर टिच्चून उभा राहिलेला आपला देश. अन या महान देशाचे आपण भाग्यवान नागरिक. 

हे इतकं सगळं दिमाखदार असताना, पाठीशी असा जाज्ज्वल्य इतिहास भूगोल असताना आपली म्हणून काहीतरी जबाबदारी आहे ती आपण किती पार पडतोय याचा विचार सर्वांनीच करायला हवा. देश कोणा एका व्यक्तीने, संस्थेने घडत नाही तो घडतो तो त्यातल्या चारित्र्यसंपन्न, धडपड्या देशवासीयांच्या प्रयत्नांनी. आज आपण एकशे पस्तीस करोड लोकसंख्येचा विशालतेचं प्रतिनिधित्व करतो. आपली क्षमता प्रचंड, अतुलनीय अन दुर्दम्य इच्छाशक्तीची धोडही प्रचंडच. भारताच्या युवशक्तीने आपल्या क्षमतेला देशाच्या सर्वांगीण भविष्यासाठी खर्ची घालावे, अर्थव्यवस्थेला सातत्याने हलतं ठेवावं, थोरामोठयांनी वाडिलकीचे सल्ले जरूर द्यावेत, तिरंग्याच्या मध्यावर असलेल्या अशोकचक्रामधील चोवीस आऱ्यांप्रमाणे देशाची प्रगती चोवीस तास वृद्धिंगत होईल याची आस धरावी. देशाच्या उद्धारासाठी जे जे शक्य ते ते नक्की करावे कारण लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण असे भाग्यवान आहोत ज्यांनी भारत नावाच्या महान देशात जन्म घेतला आहे. म्हणूनच तर 'दुर्लभं भारते जन्म:...' ही उक्ती सार्थ वाटते.... सर्वांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.