स्वातंत्र्याचा सोहळा की ?

आपल्या कर्तव्याप्रति, इतिहासाप्रति, सांस्कृतिक प्रतीकांप्रति आपली सजगता वाढणार नाही तो पर्यंत स्वतंत्रता एक सरकारी सोहळा बनून राहील यात शंका नाही.

Story: आसावरी कुलकर्णी |
13th August 2022, 11:15 pm
स्वातंत्र्याचा सोहळा की ?

आसेतु हिमालय भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. आपण भारतीय तसेही उत्सवप्रेमी आणि १५ ऑगस्ट हा तर आपला स्वातंत्र्य दिवस, म्हणजे उत्साहाला उधाण येणं सहाजिकच आहे. देशाविषयी असलेली आस्था, प्रेम याच दिवशी उतू जात. केजी ते पीजीमध्ये शिकणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी झेंडावंदन दिवस, सरकारी कार्यालये, सचिवालयातील अधिकारी वर्गाला हल्लीच्या काळातली कटकट, आणि खाजगी कामगारांना मिळालेली अजून एक सुट्टी. दुर्दैवाने ४० टक्के जनता हा असा "साजरा" करते स्वातंत्र्य दिवस. काही शाळा, संस्था, सरकारी कार्यालय उत्स्फूर्तपणे स्वातंत्र्य दिवस करतात. 

या वर्षी तर अमृत महोत्सव. सरकारी फर्मानानुसार हर घर तिरंगा फडकंवायला हवा म्हणे. बरं ते झेंडे लावायला आम्ही का २० रुपये द्यायचे? आधीच महागाई त्यात सरकार लुटायला उठलंय. ते चतुर्थीला सामान देतात तसं  सरकारने फुकट झेंडे वाटावेत. वगैरे अशा प्रकारचे फुकट सल्ले, अखिल भारतीय आम्ही फुकटच खाणार समितीचे अध्यक्ष सदाच फुकटे यांनी अनाहूतपणे देऊन झालाय. आमच्या गावात एक वयस्कर बाई रहातात, पर्वा त्या मला विचारत होत्या, बाय मला एक झेंडा हवा आहे कुठे मिळतो? हे घे वीस रुपये असे म्हणून आपल्या चांचितले साठवलेले सुट्टे वीस रुपये तिने माझ्याकडे दिले. ती एक, दोन रुपयांची नाणी मला सोन्यासारखी भासली.  तर आपल्या स्वातंत्र्य दिनाबद्दल आपल्याला इतकीच आस्था आहे. 

अमृत महोत्सव म्हणजे अनुभवाने परिपक्व झाल्याचा अनुभव. हे स्वातंत्र्य फार किंमती आहे, महाग आहे. लाखो करोडो लोकांनी आपला वेळ, कुटुंब, स्वसुख, स्वतःचा जीव ओवाळून टाकलाय या दिवसासाठी. तिरंगा ध्वज स्तंभावर चढताना, हसत हसत फासावर चढणारे क्रांतिवीर, अंगावर लाठ्या झेलणारे स्वातंत्र्यवीर, डोळ्यासमोरून झर्रकन जातात फिल्म पहिल्यासारखे. अमृतसरला जाताना भगतसिंग यांचे जन्मगाव आणि संग्रहालय बघण्याचा योग आला. ज्यांनी ते  बनवलंय ते अगदी वास्तव समोर ठेवलंय, भगतसिंग यांच्या वस्तू पाहताना डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा येतो. जालियनवाला बाग बघतानाही हाच अनुभव येतो. संग्रहालय अशा पद्धतीने बनवलेली आहेत की या शूर क्रांतिकारकांना आपण विसरूच शकत नाही. एवढे किंमती असलेले हे स्वतंत्र साजरे करण्यासाठी आम्ही वीस रुपये खर्च करू शकत नाही? घरा घरात तिरंगा कदाचित प्रत्येकाला पटणारी गोष्ट नाही. पण आपल्या घरात आपण पणत्या तर लावू शकतो. जवळ साजरा होत असलेल्या ठिकाणी जाऊन झेंड्याला नमन तर करू शकतो? हल्लीच कॉमनवेल्थ खेळामध्ये २२ वेळा आपले राष्ट्रगीत वाजले. खेळाडूंना विचारा त्यावेळी त्यांच्या मनात किती भावना उचंबळून येतात. 

आपल्याला स्वातंत्र्य फुकट मिळालेलं नाही हे आपण लक्षात घेत नाही. देशाचा एक मोठा तुकडा, कितीतरी संपत्ती आणि पिढ्यानपिढ्या चालू असलेली गुलामीची मानसिकता, स्वतंत्र राष्ट्र म्हणवून घेण्यासाठी हे एवढं दिलंय आपण.  सोशल मीडियामुळे आपल्याला व्यक्त होण्यासाठी  मिळालेलं एक सोपं व्यासपीठ. झेंड्याचं चित्र घातलं, काही भाड्याने घेऊन चिकटवलेली वाक्य फेकली की आपलं स्वातंत्र्य प्रेम जाहीर होतं. मग आपण सुट्टी साजरी करायला मोकळे.

आजची पिढी संवेदनशील नाहीये याचे कारण आपल्या पिढीने ती संवेदना त्यांच्यापर्यंत पोहचवलीच नाही. देश स्वतंत्र होतो, म्हणजे तो आपला होतो. आपलं घर उभं राहिल्यावर जसं त्याची जबाबदारी आपल्यावर असते, तसंच देश आपला आहे म्हणजे त्याच्या चांगल्या वाईटाची जबाबदारी आपली आहे हे आपण विसरत चाललो आहे. पोलिटिक्स मला आवडत नाही, मी मतदान करत नाही, या देशात काहीही होणं शक्य नाही अशी डायलॉग बाजी करून आपण मोकळे होतो फुकटच खायला. सरकार नावाचे केंयर टेकर आपण  नेमला आहे आणि आतून पोखरत चाललेल्या आपल्याच घरात आपण सुखाची झोप घेतोय किंवा निदान मगरीचे अश्रू ढाळत बसलो आहोत. ७५ वर्षांनी आपल्याला  वेगळ्या आझादीची स्वप्न पडताहेत. आपल्या सांस्कृतिक प्रतीकांची, राष्ट्र गानाची लाज वाटू लागली आहे. भूक, दारिद्र्य, बेरोजगारी  आजही ज्वलंत प्रश्न आहेत. बॉलिवूडच्या बाहुल्यांचा संसार आपल्याला जास्त जवळचा वाटतो आहे. गावच्या शाळेत मूल शिकताहेत की नाही हेही आपल्याले माहीत नाही. इंग्रज गेले पण त्यांनी गुलाम बनविणाऱ्या शिक्षणाचा जो पाया घातला त्यावर आपण कळस चढवतो आहे. टॅक्सची चोरी आणि सुविधा मात्र फुकट हव्यात अशी आपली मानसिकता झालेली आहे.

आपले अधिकार जसे संविधानात दिलेले आहेत तशीच कर्तव्यही दिलेली आहेत जी आपण वाचतच नाही.  संविधानाची ओळख तरी आपण कधी करून घेतो? पर्यावरण हानी इतक्या प्रमाणात झाली आहे की आपल्या मुलांना पुढे काय वाढून ठेवलंय याची भीती वाटू लागली आहे. स्त्री स्वातंत्र्य तर अजूनही विसाव्या शतकात आहे. पंचाहत्तर वर्षात फक्त दोन स्त्रिया राष्ट्रपती पदापर्यंत पोहचल्या आहेत. ज्या जाती प्रथा संपविण्यासाठी थोर नेत्यांनी आयुष्य खर्ची घातले ते आरक्षणाच्या नावाखाली सरार्स अजून टोकदार झालेले आहेत.  आपल्या धर्म, जाती संप्रदाय या सगळ्या संवेदना टोकदार होऊन एकमेकालाच टोचू लागल्या आहेत.  या सगळ्यांची उत्तर, उपाय सापडतील तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ.

आपल्या कर्तव्याप्रति, इतिहासाप्रति, सांस्कृतिक प्रतीकांप्रति आपली सजगता वाढणार नाही तो पर्यंत स्वतंत्रता एक सरकारी सोहळा बनून राहील यात शंका नाही.