अनैतिक संबंधातून अल्पवयीन मुलगी बनली कुमारीमाता

प्रसुतीनंतर अर्भकाचा मृत्यू : पणजी पोलिसांत गुन्हा दाखल


13th August 2022, 01:49 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता

म्हापसा : एक १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी अनै​तिक संबंधातून कुमारीमाता बनल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रसूतीनंतर या मुलीचे बाळ वारले. बेळगाव पोलिसांकडून आलेल्या हस्तांतरितप्रकरणी पणजी पोलिसांनी संतोष नामक संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित १२ वर्षीय मुलगी बेळगाव जिल्ह्यातील असून तिला एकूण १२ भावंडे आहेत. आई वडिलांच्या रोजच्या जाचामुळे गेल्या वर्षी जून २०२१ मध्ये ती ऊस कामगारांसमवेत पळून गोव्यात आली होती.

ती इतर काही परप्रांतीय कामगारांसमवेत पणजी बस स्थानक आवारातच राहत होती. तेथे तिची संतोष नामक संशयिताशी ओळख झाली. काही महिन्यांनी ती दोघेही महाराष्ट्रात राहायला गेली. तेथे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. भांडणानंतर पीडितेने आपल्या नातेवाईकाला बोलावून घेतले व ती त्यांच्यासमवेत आपल्या घरी गेली.

तेव्हा ती गरोदर होती. त्यानंतर गेल्या ८ जुलै २०२२ रोजी तिची बेळगावमधील एका इस्पितळात प्रसूती झाली. पण २० दिवसांनी दि. २८ जुलै रोजी तिच्या बाळाचे निधन झाले.

त्यानंतर इस्पितळाकडून हा प्रकार बेळगाव एपीएमसी पोलीस स्थानकाला कळविण्यात आला. पीडितेवर हा लैंगिक अत्याचार पणजी बस स्थानकाच्या आवारात घडल्याचे चौकशीवेळी स्पष्ट झाले. त्यानुसार बेळगाव पोलिसांनी हे प्रकरण शून्य कलमाखाली नोंदविले आणि नंतर शहर पोलीस आयुक्तांमार्फत गोवा पोलिसांकडे वर्ग केले.

पणजी पोलिसांनी या प्रकरणी भा.दं.सं.मया ३७६(१)(२)(एन) व पोक्सो कायदा कलम ४ व ६ आणि गोवा बाल कायदा कलम ८(२) खाली गुन्हा नोंद केला आहे.

संशयित संतोष याiच्याशी संपर्क साधण्यासाठी पीडित युवतीकडे कोणताही फोन क्रमांक नाही. त्यामुळे संशयिताचा शोध घेणे कठीण बनले असून पुढील तपास पणजी पोलीस करत आहेत.