देशभक्ती – दरवळणारे चंदन

‘’देशभक्तीचा उत्साह दरवळतो, जसे सुगंधित ते चंदन, वर्तमानी स्वातंत्र्यसुख ज्यामुळे आम्हा लाभले, त्या स्वातंत्र्यवीरांना शत: शत: वंदन’’ याच भावनेचे असंख्य काजवे लुकलुकत्या प्रकाशाने मनाचा प्रत्येक कोपरा आज देदीप्यमान करत आहेत.

Story: पालकत्व | पूजा भांडारे कामत- सातोस्कर |
12th August 2022, 11:44 pm
देशभक्ती – दरवळणारे चंदन

देशभक्ती ही एक अशी भावना, जिचा वास प्रत्येक प्राणात चंदनाच्या स्वरुपात दरवळतो. आपला जन्म झाल्यानंतर, प्रथमच ज्या दैवीय स्वरुपाचा आपल्या नेत्रचक्षूंना साक्षात्कार होतो, ती आपली जननी, जिच्या उदरात नऊ महिने आपण बागडतो, त्यामुळे आपल्या आयुष्यात त्या मातेचे स्थान कुणी दुसरा व्यक्ती घेऊ शकत नाही. तसेच ज्या भूमीत आपला जन्म होतो ती आपली मातृभूमी, आपली भारतमाता, जिच्या ओंजळीत आपल्या असंख्य सुख स्मृती दडलेल्या असतात. संस्कृतीने, प्रेमाने, वात्सल्याने परिपूर्ण अशा ह्या भारतात आपला जन्म झालेला असून, एक भारतीय असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे असे संस्कार बालपणापासूनच एका मुलावर होत असतात. एकुणच देशभक्तीची भावना लहान वयातच मुलांच्या मनात रुजवणे हे मातापित्याचे, गुरुंचे प्रथम दायित्त्व असते. कारण लहान वयापासूनच समाजाचा एक जबाबदार नागरीक बनण्याच्या दिशेने मुलाची पाऊले पुढे सरसावत असतात.  नागरीकत्त्वाची जाणीव होण्यासाठी देशभक्तीची मुळे सुरुवातीपासूनच अत्यंत मजबूत असणे गरजेचे आहे. आपण विविधांगी मुद्यांच्या अंतर्गत आपल्या भविष्य पिढीला देशभक्तीचे संस्कार देऊ शकतो, जेणेकरुन त्यांच्या माध्यमातून आपल्या देशाचे रक्षण सुनिश्चित होईल व त्यांच्या प्रगतीच्या माध्यमातून आपल्या देशाची प्रगती होईल. ते मुद्दे खालीलप्रमाणे आहेत...

पालक, शिक्षक- मुलांकरीता आदर्श

जसे की आपण जाणतोच की, लहान वयात मुले नेहमीच पालकांचे व गुरुंचे अनुकरण करण्याचा प्रयत्त्न करत असताना, त्यांच्या वर्तनातील प्रत्येक मुद्रेवर ध्यान केंद्रित करतात व त्यांच्यातील स्वभावगुण आत्मसात करतात. म्हणूनच जर आपल्याला आपल्या पाल्याच्या मनात देशभक्ती रुजवायची असेल तर आपण स्वत: आधी देशाप्रती प्रामाणिक असणे गरजेचे आहे. आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या देशाविषयी आधी आपल्या मनात प्रेम आदर असणे महत्त्वाचे आहे. मुलांवर संस्कार करताना आपण या गोष्टीवर ध्यान केंद्रित केले पाहिजे की, आपल्या हातून असे कुठलेच कार्य घडू नये किंवा आपल्या तोंडून असा कुठलाही शब्द निघू नये ज्यामुळे आपल्या देशाचा, मातृभूमीचा अपमान होईल. कारण जर आपल्या मनात देशभक्ती असेल तर ती भावना मुले लगेच आत्मसात करतील.

देशाप्रती प्रेमभावना, त्यागभावना असणे

मातापित्याने, गुरुने आपल्या मुलांना नेहमीच देशप्रेमाचे संस्कार दिले पाहिजे, आपल्या एकतेनेच आपला देश समृध्द आहे ह्याची जाणीव मुलांना होणे गरजेचे आहे. जेव्हा आपण स्वत:ची प्रगती करु, तेव्हा आपल्या देशाचे नाव उज्ज्वल होऊन आपल्या देशाची प्रगती होईल, ह्याची जाणीव मुलांना झाली पाहिजे. त्यामुळेच, देशाच्या तिरंग्याची महत्ता, पवित्र राष्ट्रगीताचे स्तूतीसूर, देशाच्या प्रतिज्ञेतील सुंदरता, मुलांना समजली पाहिजे. देशाशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा त्यांनी सन्मान केला पाहिजे. त्यांचे महत्त्व त्यांना पालकांनी, गुरुंनी समजावून सांगावे, जेणेकरुन मुलांच्या मनावर लहानपणापासूनच देशभक्तीचा प्रभाव पडेल.

स्वातंत्र्य चळवळीबाबत जागृकता

आपला भारत १५ ऑगस्ट १९४७ साली स्वतंत्र्य झाला, पण हे स्वातंत्र्य आपल्याला मोफत मिळाले नाही. ह्या स्वातंत्र्यासाठी कितीतरी स्वातंत्र्यसैनिकांनी भारतमातेच्या चरणावर, आपल्या रक्ताचा अभिषेक केला. ज्या हुतात्म्यांमुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्या सैनिकांनी केलेल्या त्यागाबाबत संपूर्ण माहिती मुलांना आम्ही सांगितली पाहिजे, जेणेकरुन, त्यांना सुध्दा आपल्या देशाच्या प्रगतीत कार्यरत रहाण्याची प्रेरणा मिळत राहील. आपल्या भारतमातेसाठी स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या, आपल्या प्राणांच्या बलिदानाकरीता, आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. स्वातंत्र्य चळवळीत कुणी कुणी काय योगदान दिले, ही गाथा मुलांना माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामुळे त्यांच्या मनात आपल्या मातृभूमीसाठी अतुट प्रेम निर्माण होईल.

सत्याच्या विजयाकरीता धडपड

जरीही आत्ता वर्तमानात आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले असले, तरीही नक्कीच बलिदान दिलेल्या त्या स्वातंत्र्यवीरांचे आत्मे आज ओक्साबोक्सी रडत असतील. स्वतंत्र्य असून सुध्दा आपण अनेक अत्याचारांच्या आहारी जात आहोत. पोर्तुगीजांपासून देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु आपल्या समाजात दिवसेंदिवस अनेक अत्याचार, समुद्र मंथनाच्या विषाप्रमाणे सर्वत्र पसरत आहेत. आज आपल्या समाजात वाढत्या गुन्ह्यांमुळे, एक स्त्री मोकळा श्वास घेऊ शकत नाही. कितीतरी कोवळ्या कळ्यांना अमानुष वर्तन कुस्करुन टाकते, व ह्याच अन्यायाविरुध्द आपण स्वत: लढावे, तसेच मुलांवरही लढायचे व अत्याचाराचा विरोध करण्याचे संस्कार केले पाहिजे. वर्तमानकाळात अत्याचार इतक्या गतीने पसरत आहेत, की दुसरा व्यक्ती आपल्याला वाचवायला येईल, अशी आशा करण्यापुरता वेळ सुध्दा मनुष्याला मिळत नाही. त्यामुळे स्वत:चे रक्षण स्वत: करताना अन्यायाविरुध्द लढून सत्याच्या विजयाकरीता कशी धडपड करायची ह्याचे प्रशिक्षण मुलांना दिले पाहिजे. तरच आपला भारत अत्याचारमुक्त होऊ शकेल.

देशाच्या लोकसंस्कृतीची जाणीव

आपण अशा भारत देशाचा भाग आहोत, ज्या भूमीत मोठमोठ्या, स्वातंत्र्य सैनिकांचा, शास्त्रज्ञांचा जन्म झाला, स्वातंत्र्याकरीता लढताना त्यांच्या शरीरातून ओघळलेला प्रत्येक अमृतस्वरुपी रक्ताचा थेंब भूमातेने स्वत:त सामावून घेतला. भारतात साजरा होणारे विविधांगी उत्सव, त्यातून निर्माण होणारी सकारात्मकता, दिवसेंदिवस आकाशाला स्पर्श करणारी आपल्या देशाची प्रगती, जी सतत आपल्याला प्रेरणा देते, विविधांगी स्थळाप्रमाणे लोकनृत्य आणि खूप काही मंगलमय प्रथा, परंपरा व निसर्ग ऐश्वर्याने नटलेल्या भारताच्या प्रत्येक अंगाबाबत सविस्तर माहिती मुलांना द्यायला हवी. आपल्या देशातील एकता, हेच आपल्या भारतीयांच्या यशाचे खरे रहस्य आहे. विविधांगी धर्म, जाती जरीही असल्या तरीही वेगवेगळ्या उत्सवांसमयी सगळा देश एकत्र येतो, हे संस्कार मुलांवर झाले पाहिजे, तेव्हाच मुले भारतीय असल्याचा अभिमान बाळगतील. 

देशभक्ती जागवणाऱ्या स्पर्धांचे आयोजन

मुलांच्या मनात देशाप्रती भक्ती निर्माण करण्यासाठी, शाळेत शिक्षकांनी देशभक्तीपर स्पर्धा आयोजित करणे गरजेचे आहे. देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा. वेशभुषा, भाषणाच्या स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा कितीतरी स्पर्धा शाळेत आयोजित करुन, त्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मुलांना शिक्षकांनी प्रेरणा देणे गरजेचे आहे. ह्या स्पर्धांच्या माध्यमातून मुलाच्या हृद्यात लहानपणीच देशाच्या प्रेमाचे रोपटे नक्कीच बहरेल.

समानतेची भावना

आपल्या भारतभूमीच्या समृध्दीचे मूळ रहस्य म्हणजेच समानता होय.आपल्या देशाची एकता हीच आम्हा भारतीयांची खरी ओळख आहे. आम्ही भारतीय कधीही कुणासोबतही कोणत्याही मुद्द्यावरुन भेदभाव न करता सर्वांना प्रेमाचा प्रसाद देतो व गुण्यागोविंदाने एकतेने नांदतो. पण जर आम्हा जनतेमधील एकावर जरी संकट आले, तरी त्या संकटाच्या विरोधात पूर्ण देश उभा राहतो. प्रत्येक धर्मातील प्रत्येक सण आम्ही एकमेकांसोबत साजरा करतो, तसेच संकटकाळी एकत्र येऊन त्याच्या निवारणाकरीता उपाय शोधतो. आणि ह्याबाबत लहानवयातच मुलांवर संस्कार होणे गरजेचे आहे. एकता म्हणजे काय व त्याचे महत्त्व काय हे मुलांना समजायला हवे. आपणही भेदभाव करु नये व इतरांनी केलेला भेदभाव सहनही करु नये हे ध्येय उराशी बाळगून आपण भेदभावाविरुध्द लढण्याचे बळ मुलांना दिले पाहिजे.

आपण ज्या समाजाचा भाग आहोत त्या समाजाशी कर्तव्यनिष्ठ राहून कशा पध्दतीने मुलांना सुध्दा एक जबाबदार नागरीक बनवायचे हे तंत्र सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून आहे.