चीन - तैवान संघर्षाचा तंत्रज्ञान क्षेत्रावर परिणाम

Story: विश्वरंग | सुदेश दळवी |
12th August 2022, 10:17 pm
चीन - तैवान संघर्षाचा तंत्रज्ञान क्षेत्रावर परिणाम

अमेरिकेच्या सिनेटच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीन पुरता हादरला असून चीन आणि तैवानमधील तणाव वाढला आहे. तसेच या भेटीचा संपूर्ण जगावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. चीन तैवानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. तैवान आणि चीनमधला तणाव वाढला तर त्याचे जगावर काय परिणाम होतील याचा अंदाज आता जगभरातील तज्ज्ञ लावत आहेत. या तणावाचा भारतासह अन्य देशांच्या तंत्रज्ञान क्षेत्रावर सगळ्यांत जास्त परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. यात सेमीकंडक्टर चिपच्या तंत्रज्ञानाचाही समावेश आहे.       

दरम्यान, यामुळे फक्त मोबाईल कंपन्यांवरच परिणाम होईल असे नाही तर कार कंपन्यांनाही याचा चांगलाच फटका बसू शकतो. तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही जगातील सगळ्यात मोठी सेमीकंडक्टर कंपनी आहे. सेमीकंडक्टरच्या बाबतीत या कंपनीचा प्रचंड दबदबा आहे. जागतिक मार्केटमधील जवळपास ९२ टक्के मागणी हीच कंपनी पूर्ण करते. यावरून तिचे महत्त्व लक्षात येऊ शकते. इलेक्ट्रॉनिक्स, कॉप्युटर्स, स्मार्टफोन, कारच्या सेन्सर्समध्येही मोठ्या प्रमाणावर सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. जगभरातल्या गाड्यांमध्ये सेमीकंडक्टरचा वापर होतो.      

चीन-तैवान दरम्यानचा वाढता तणाव बघता त्याचा भारतावर सगळ्यांत जास्त परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधी रशिया-युक्रेनच्या युद्धाचे परिणाम भोगावे लागले आणि त्यात आता चीन-तैवानमध्ये युद्ध होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण जगावरच भीतीचे सावट आहे. जर असे झाले तर सेमीकंडक्टरच्या कमतरतेचा धोका पुन्हा एकदा निर्माण होईल. जर चीनबरोबरचा तणाव आणि संघर्ष आणखी वाढला तर तैवानच्या चिप निर्मात्यांना ‘नॉन ऑपरेट’ केले जाईल, असे तैवानच्या सेमीकंडक्टचर चिप निर्माताचे म्हणणे आहे, साहजिकच याचा परिणाम आपल्यावरही होईल, असे इंडियन फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले.      

२०२०ची आकडेवारी पाहिली तर जगभरातील एकूण सेमीकंडक्टर चिपच्या उत्पादनात ६३ टक्के उत्पादन एकट्या तैवानमधून होते. म्हणजेच जगभरातील १० सेमीकंडक्टर चिपमधील ६ किंवा ७ चिप तैवानच्या कंपनीचे असतात. भारताबद्दल बोलायचे झाल्यास २०२२मध्ये वार्षिक आकडेवारीनुसार तर ऑटोमोबाईल विक्रीमध्ये ८ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली, असे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.      

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनद्वारा जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सध्याच्या परिस्थितीत ही घसरण सातत्याने पाहायला मिळत आहे. आता नॅन्सी पेलॉसी यांच्या या दौऱ्यामुळे संतापलेला चीन तैवानची समस्या कशी हाताळतो, हे पाहणे आपल्यासाठीही महत्त्वाचे आहे. जर चीनने तैवानवर हल्ला केला तर सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत अन्य देशांचे होईल तितकेच नुकसान चीनचेही होणार आहे. तैवानमधून सेमीकंडक्टर्सची कमतरता निर्माण झाली तर संपूर्ण उद्योग क्षेत्रच ठप्प होऊ शकते.