आठवणीतले रक्षाबंधन

Story: प्रासंगिक | प्रिया गावकर |
11th August 2022, 12:27 am
आठवणीतले रक्षाबंधन

श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा साजरी केली जाते. रक्षाबंधन व त्याचे बदलते स्वरुप हे हल्ली खूपच जाणवायला लागले आहे. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, स्नेहाचा हा सण. जसजशी परिस्थिती बदलत जावी तशतशी या सणाची महिमा पण बदलत गेली. पूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी चालत किती तरी अंतर कापत भाऊला राखी बांधायला येत असत व सोबत त्याच्या आवडीचा पदार्थ हमखास आणायच्याच. पण आता जाताना बाजारातून मिठाई घेऊन जाणे हेच सोयीस्कर झालं आहे. माझ्या माहेरच एकत्र ७०-८० माणसांच मोठं कुठुंब तेरा भाऊ व २२ बहिणी असा मोठा गट. काही भाऊ कामानिमित्त गावाबाहेर असायचे, काही बहिणी लग्न झालेल्या. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वांनी एकत्र येऊन हा सण साजरा करणे शक्य नव्हते. रक्षाबंधनाच्या दिवशी जो भाऊ सोबत असेल त्याला ओवाळणी करणे व राखी बांधणे होत असे. पण इतर भावांना नंतर बांधणे असा कार्यक्रम असायचा. मग यावर एक रामबाण उपाय शोधला व त्यानुसार हा सण साजरा होऊ लागला. गणेश चतुर्थीच्या सणाला सर्व कुटुंब एकत्र असायचे तर मग दरवर्षी चतुर्थीच्या दिवशी हा योग साधायचा असे आम्ही ठरवलं व त्याप्रमाणे रक्षाबंधन साजरे होऊ लागले. चतुर्थी दिवशी दुपारी गणेश पूजा होताच सर्व मोठी मंडळी अापापल्या कामात व्यस्त असायचे व आम्ही मात्र रक्षाबंधनाच्या तयारीत व्यस्त असायचो. सर्व बहिणी मिळून गोड बनवणे, ओवाळणीची तयारी करणे, राख्या तयार ठेवणे आणि नंतर सर्व भावांना ओवाळणी करुन  राख्या बांधणे व गोड खाऊ देणे असा कार्यक्रम असायचा आणि या सगळ्यात आपल्या हक्काची भेटवस्तू मागण्यात जी मजा असायची ती वेगळीच. त्या जमलेल्या पैशातून नंतर जे एकत्रित खाऊ आणून खायचो, त्याची चव वेगळीच असायची.  जवळ जवळ ५ ते ६ वर्षे हे आगळे वेगळं रक्षाबंधन साजर केल. २०१७ मध्ये गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी साजर केलं ते माझ्या आठवणीतलं शेवटचं एकत्र रक्षाबंधन. 

आता भाऊ ही तेच आहेत आणि बहिणी ही त्याच आहेत. प्रेम, माया, स्नेह एकमेकांची ओढ सर्व तसेच आहे. फक्त वाढलेय ते अंतर. आता प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो. निदान मोबाईल फोनमुळे तरी एकमेकांच्या बातम्या  कळतात आणि संदेश पाठवून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात आणि त्यातच समाधान मानलं जात. एकत्र कुटुंबाची पद्धत ही हल्ली लुप्त होत चालली आहे. जशजशी नाती विभागतात तसतसे अंतर वाढत जाते, पण मनाने मात्र भाऊ बहिण कधीच विभक्त होऊ शकत नाही. आम्हा सर्व भाऊ बहिणांना बघून गावातल्या किती तरी लोकांच्या प्रतिक्रिया असायच्या आणि आम्हीही मोठ्या दिमाखात एकत्र फिरायचो. आता अनेक बहिणी लग्न होऊन गेल्या आणि 

एकत्र जमणे शक्य नसते. त्यामुळे आपापल्या सोयी प्रमाणे रक्षाबंधन साजरे केले जाते. सर्वांच्या नोकऱ्या, कामे, इतर अडचणी, मुलांचे शिक्षण, त्यामुळे ठराविकच दिवशी आता एकत्र येणे शक्य नाही. पण काही आठवणीची शिंदोरी आम्ही जन्मभर जपून ठेवू.