भारताची सतर्कता, ड्रॅगनच्या हेरगिरीला चाप

Story: विश्वरंग | संतोष गरुड |
10th August 2022, 12:22 am
भारताची सतर्कता, ड्रॅगनच्या हेरगिरीला चाप

एखादा देश जिंकण्यासाठी रणांगणावर लढवण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा, त्या देशाचे बलाबल लक्षात घेऊन कुटनीतीने वार करणे अधिक हिताचे असते. पण, त्यासाठी गरजेचे असतात ते चाणाक्ष गुप्तहेर. ज्यांच्याकडे गुप्तहेरांची फळी मजबूत असते, त्या देशांना प्रत्यक्ष रणांगणावर लढण्याची आवश्यकता भासत नाहीत. हेच तंत्र भारताविरोधात वापरण्यासाठी चीनने तयारी चालवली होती. मात्र, या कुटनीतीला भारतानेही त्याच भाषेत प्रत्युत्तर देत चिनी ड्रॅगनचे मनसुबे उधळून लावले आहेत.       

दक्षिण चीनसह विविध महासागरांत हेरगिरी करण्यासाठी चीनने ‘युआंग वांग’ नावाची सात शक्तिशाली जहाजे तैनात केली आहेत. यातील ‘युआंग वांग-५’ हे जहाज ११ ते १६ ऑगस्ट या सात दिवसांच्या काळात श्रीलंकेच्या दक्षिणेला असलेल्या हंबनटोटा बंदरावर नांगरून ठेवण्याची तयारी चीनने केली होती. श्रीलंकेला तशा सूचनाही केल्या होत्या. हंबनटोटा हे बंदर ९९ वर्षांसाठी चीनने भाडेकरारावर श्रीलंकेकडून घेतले आहे. त्या बदल्यात श्रीलंकेला मोठे कर्जही त्यांनी दिले आहे. त्यामुळे श्रीलंकेने त्यांना परवानगी दिली. पण, भारताला जेव्हा ही गोष्ट कळाली, तेव्हा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तत्काळ श्रीलंकेला पत्र लिहून त्यास तीव्र आक्षेप घेतला. कोणत्याही स्थितीत हे जहाज श्रीलंकेच्या कुठल्याच बंदरावर थांबता कामा नये, असेही कळवले. आरंभी श्रीलंकेने भारताला नकार दिला. ते जहाज इंधन भरण्यासाठी आणि काही काळ देखभालीसाठी थांबणार आहे, असे भारताला त्यांनी कळवले. पण, भारताने हा विषय गांभीर्याने घेतल्यानंतर श्रीलंकेने शेवटी चीनला हे जहाज हंबनटोटा बंदरावर आणू नये, असे सूचित केले. परिणामी चीनला आपला गाशा गुंडाळावा लागला.       या घटनेनंतर भारताने या जहाजाला नेमका विरोध का केला, असा प्रश्न उपस्थित झाला. याचे मुख्य कारण म्हणजे, हे जहाज अत्यंत घातक होते. हे जहाज बनवताना चीनने असे म्हटले होते की, ‘अवकाशातील उपग्रहांचा ट्रॅक ठेवण्यासाठी हे जहाज बनवण्यात आले आहे.’ पण, या जहाजावर इतकी शक्तिशाली रडार बसवण्यात आले आहेत की, एकाच वेळी अवकाशातील उपग्रहांवर ट्रॅक ठेवण्याबरोबर त्यांच्या परिघातील ७५० किलोमीटरवरील सूक्ष्म ध्वनीदेखील ते सहज पकडू शकतात. त्यापुढील काही अंतरापर्यंत सर्व ‌इंटरनेट, बँकिंग, संरक्षण विभाग आदींमधील डिजिटल बाबींचे कोड जमवू शकतात. या जहाजाचे वैशिष्ट्ये म्हणजे ते ५ हजार २२२ मीटर लांब, २५.२ मीटर रूंद आणि २५ हजार टन वजन पेलवण्याची त्याची क्षमता आहे. यावरून हे जहाजाची हेरगिरी करते, असे मानले जाते. हे जहाज श्रीलंकेत नांगरून ठेवले असते तर, श्रीहरीकोट्टासह संपूर्ण दक्षिण भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती त्यांनी गोळा केली असती. हाच धोका लक्षात घेऊन भारताने श्रीलंकेकडे आक्षेप नोंदवला होता. भारताच्या याच सतर्कतेमुळे ड्रॅगनचे मनसुबे उधळले.