ज्यास पाहिजे असेल हित...

Story: अध्यात्म |
10th August 2022, 12:22 am
ज्यास पाहिजे असेल हित...

ज्यास पाहिजे असेल हित । त्याने ऐकावी माझी मात ॥ जो झाला रामभक्त । तेथेच माझा जीव गुंतत ॥ मला रामभक्तावीण काही । सत्य सत्य जगी कोणी नाही ॥ जीवाचे व्हावे हित । हाच मनाचा संकल्प देख ॥ तुम्हास सांगावे काही । ऐसे सत्य माझेजवळ नाही ॥ पण एक सांगावे वाटते चित्ती । रघुपतीवीण शोभा नाही जगती ॥ मुलगी सासरी गेली । तिची काळजी सासरच्याला लागली । तैसे तुम्ही माझे झाला । आता काळजी सोपवावी मला ॥ सदा राखा समाधान माझा आशीर्वाद पूर्ण ॥ मी तुमची वेळ साधली । हा ठेवा मनी विश्वास । आनंदाने राहावे जगात ॥ अंतकाळची काळजी । तुम्ही कशाला करावी ? ॥ व्यवहार मी सांभाळला । तरी पण रामाला नाही दूर केला ॥ राम सखा झाला । नामी धन्य मला केला ॥ मी तुम्हास म्हटले आपले । याचे सार्थक करून घेणे आहे भले ॥ नामापरते न माना सुख । हाच माझा आशीर्वाद ॥ ला माझे बोल सत्य । कृपा करील खास भगवंत ॥मी असो कोठे तरी । मी तुम्हापासून नाही दूर । याला साक्ष रघुवीर ॥ तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण । दुःखी होऊन न करावे अप्रमाण ॥ तुम्ही माझे म्हणविता । मग दुःखी कष्टी का होता ? ॥ उपाधीवेगळे झाला । ऐसे ऐकू द्यावे मला ॥

माझे ज्याने व्हावे । त्याने राम जोडून घ्यावे ॥ दृश्य वस्तूचा होतो नाश । याला मीही अपवाद नाही खास ॥ शेवटी मागणे तुम्हा एकच पाही । नामावाचून दूर कधी न राही ॥ अनुसंधानी चित्त । सर्वांभूती भगवंत । नामी प्रेम फार । त्याला राम नाही दूर ॥ मी सांगितल्याप्रमाणे वागावे । राम कृपा करील हे निश्चित समजावे ॥ आता आनंदाने द्यावा निरोप । हेच तुम्हा सर्वांस माझे सांगणे देख ॥ सदा राहावे समाधानी । नको सुखदुःख काळजीचा लेश । माझा झाला जगदीश । हा भाव ठेवा निरंतर । राम साक्षी, मी तुम्हापासुन नाही दूर ॥ सर्वांचे करावे समाधान । जे माझे प्राणाहून प्राण जाण ॥ सर्वांनी व्हावे रामाचे । हाच माझा आशीर्वाद घेई साचे ॥ जगाचे ओळखावे अंतःकरण । तैसे आपण वागावे जाण ॥ नामापरते दुजे न मानावे । एका प्रभूस शरण जावे ॥ हा करावा उपाय । तोच समाधानाला नेईल खास ॥ विवेक-वैराग्य संपन्न । सदा असो अंतःकरण ॥ अखंड घडो भगवद्भक्ति । आत्मज्ञानप्रतीति । ब्रह्मस्वरूपस्थिती । नामी निरंतर जडो वृत्ती ॥ मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा निर्धार । न सोडावा आता धीर ॥ सुखाने करा नामस्मरण । कृपा करील रघुनंदन ॥